Me Chitrakar Zalo Tar Nibandh in Marathi – If I Were a Painter Essay in Marathi मी चित्रकार झाले तर सर्वप्रथम आई- बाबांचे सुंदर चित्र काढीन. कारण, आई – बाबाने मला या सुंदर जगात आणले व हे सुंदर जग दाखवलं. कदाचित, आई – बाबामुळे चित्रकला हा गूण माझ्याात आला असावा. एका उत्कृष्ट चित्रकारामध्ये तर्कशुद्ध बुद्धी आणि बारीक निरीक्षण हे गुण अति महत्त्वाचे असतात, त्यामुळे मी माझ्यातील या गुणांची चांगली जोपासना करेन. माझ्या आयुष्यातील कुठलाही प्रवास असू दे मी त्या प्रवासाच्या वेळी बारकाईने निरीक्षण करून सर्व प्रवास एका चित्रामध्ये कैद करेन.
तसेच निसर्गातील विविध प्राण्यांचे हुबेहूब चित्र काढणे आणि म्हाताऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरील सुरकुत्याचे हुबेहूब चित्रामध्ये निरीक्षण काढणे हा चित्रकलेतील जरा कठीण टप्पा असतो, त्यामुळे मी विविध चित्रकारांच्या कला जोपासेन , तरी सुद्धा जर मला तसे चित्र काढायला जमले नाही, तर मी त्यासाठी चित्रकलेचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी उत्तम चित्रकाराचे मार्गदर्शन घेऊन, अतिशय उत्कृष्ट चित्रे काढण्याचा प्रयत्न करीन.
” पुरे जाहले तुझे तापणे,
जरा उमाळा उमळू दे.
नजर घनाला वर्षून हृदयी
तृणतृणाला उमलू दे! “
मी चित्रकार झालो तर निबंध मराठी – Me Chitrakar Zalo Tar Nibandh in Marathi
चित्रकला निबंध मराठी – Essay On Drawing in Marathi
पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर मानवाचे जीवन अस्तित्वात आहे. या ग्रहावर मानवाला आपले जीवन जगण्यासाठी विविध गोष्टी उपलब्ध आहेत. मानव आणि निसर्ग (पर्यावरण) या दोघांचा खूप जुना संबंध आहे. या निसर्गातून मानवाला बऱ्याच गोष्टी मिळतात. त्या सर्व गोष्टींचा उपयोग मानव आपल्या जीवनामध्ये करतो.
ईश्वराने या निसर्गाची रचना अत्यंत चांगल्या प्रकारे केली आहे. निसर्ग मानवाला खूप काही देतो. पण त्या बदल्यात मानवाकडे काहीही मागत नाही. निसर्ग हा मानवाचा सोबती, गुरु आणि मित्र असतो. त्याचबरोबर, निसर्ग हा आपला डॉक्टर सुद्धा असतो. जसे गुरु आपल्या शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे आणतो, त्याला एक आदर्श व्यक्ती घडवतो.
तसेच , निसर्ग सुद्धा आपल्याला ज्ञान देतो, शिकवण देतो आणि बोधप्रद धडे देतो. निसर्ग जरी बोलत किंवा काही सांगत नसला तरी तो आपल्या कृतीतून बरेच काही शिकवत असतो.
निसर्ग हा आपल्यासाठी खूप मोठ वरदान आहे. या निसर्गातून मानवाला शुद्ध हवा मिळते. तसेच या निसर्गातून मानवाला फळ, फुल, भोजन आणि इंधन प्राप्त होते. या निसर्गाने झाड, नदी, समुद्र, पाणी आणि रंग अशी खूप किमया केली आहे.
निसर्ग हा एक चित्रकार आहे. कारण हा निसर्ग दररोज रम्य चित्र रंगवतो आणि सगळ्यांना प्रेरणा देतो. जसे कि खोल दऱ्या, निर्मळ आणि झुळझुळ वाहणारे झरे, अथांग सागर आणि सरोवरे, घनदाट जंगल, बर्फाच्छादित शिखरे, उत्तुंग आणि विशाल पर्वत, कमळांनी भरलेली तळे, वाऱ्याच्या झोक्यावर झुलणारी हिरवीगार शेते, डोंगराआडून उगवणारा सूर्य, सकाळची सूर्याची कोवळी किरणे, संध्याकाळी सूर्य मावळताना तांबूस होत जाणारे आकाश ही सर्व काही निसर्गाची खूप मोठी किमया आहे.
हे सर्व निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे. मला लहानपणापासून खूप वाटायचं की मी जर चित्रकार झाले तर या भव्य, बलाढ्य आणि सुंदर निसर्गाचं चित्र स्वतःच्या हातांनी वेगवेगळ्या रंगांनी रेखाटेन.
” हिरवळ दाटे चोहीकडे रानात,
सळसळ आवाज येई पानांत.
सार आभाळ झुकलं,
झुळझुळत्या पाण्यात.
वारा छेडतो झाडांना,
सार झाडं कासावीस. “
मी सुट्टीच्या दिवशी मामाच्या गावी जायचे, त्यावेळी आजूबाजूचा परिसर पाहताना मनामध्ये त्याचे चित्र कोरले जायचे. तेंव्हा माझ्यातील चित्रकार जागा होत होता. पण, सुट्टी संपली की परत शाळा सुरू व्हायच्या. मला शाळेमध्ये असताना अभ्यास करायची खूप आवड होती. मी अभ्यास करताना इतकं मग्न होऊन अभ्यास करायची की कधी वेळ सरायचा हे लक्षातच येत नसे.
जसजशी मी हळूहळू मोठी होत गेले तसतशी माझी अभ्यासाबद्दलची आवड वाढत गेली, मी माझा पूर्ण वेळ फक्त अभ्यासालाच देत गेले. त्यामुळे, शाळेपासून ते कॉलेजपर्यंतचा कालावधी कसा निघून गेला हे कळलंच नाही. पण, या दिर्घ कालावधीत मात्र माझ्यातील चित्रकार हरवला होता.
- नक्की वाचा: माझा आवडता छंद निबंध
त्यावेळी चित्र काढायची आवड होती पण सवड नव्हती. पण कुठंतरी चित्र काढायची इच्छा माझ्या मनात आजही जिवंत होती . आज जेंव्हा मी निसर्गाच्या सान्निध्यात निवांत बसलेली असते तेंव्हा, मी सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करत असते. अशावेळी चित्र काढायची आस माझ्या मनात निर्माण होते.
प्राचीन काळापासूनच भारतीयांची चित्रकलेत रुची आहे. आधीच्या काळातील लोकांनी जुन्या गुहांवर, लेण्यांवर, दगडांवर, झाडांवर आणि पानांवर वेगवेगळ्या पद्धतीची चित्रे कोरली होती. त्यांच्यामुळे आपल्याला चित्रकलेची ओळख झाली. काही चित्रकार आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून शिकार करणारे पशु, पक्षी आणि मानव यांच्या मुर्त्या बनवत असत.
माझा आवडता छंद चित्र काढणे
चित्रकला एक महान कला आहे. या कलेच्या माध्यमातून प्रत्येक चित्रकार आपल्या जीवनाचे दर्शन घडवतो. जेंव्हा मानव जंगलात जाऊन शिकार करायचा तेंव्हा त्या प्राण्यांना कशा प्रकारे त्रास व्हायचा, याचे करूनास्पद चित्र चित्रकार काढतो.
आधीच्या काळात राजे लोक चित्रकारांना बोलवून राजदरबाराच्या भिंतींवर निरनिराळ्या प्रकारची चित्रे बनवत असत. त्या चित्रांमध्ये स्त्रिया नृत्य करताना दाखवल्या जायच्या, तर काही चित्रांमध्ये प्रेम प्रसंग देखील उमटले जायचे. राजा सुंदर चित्र काढणाऱ्या चित्रकारांवर खुश होऊन त्यांना बक्षिसे सुद्धा द्यायचा.
प्राचीन काळापासून ते एकविसाव्या शतकापर्यंत चित्रकारांना त्यांच्या कलेबद्दल आणि कामगिरीबद्दल आजही सन्मानित केले जाते. त्यांच्या चित्रकलेची प्रशंसा केली जाते .
जर, मी चित्रकार झाले असते तर चित्रांमध्ये जिवंतपणा कसा येईल याकडे विशेष लक्ष दिले असते. जेणेकरून चित्र पाहणाऱ्या व्यक्तींना माझ्या चित्रांमध्ये कोणती तरी गोष्ट लपलेली आहे याची जाणीव झाली असती. आजच्या निराश आणि नाउमेद झालेल्या तरुण पिढीला प्रोत्साहित करण्यासाठी मी ‘धावणाऱ्या घोड्याचे‘ चित्र आणि अफाट कष्ट करून ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी नवीन सुरुवात करण्यासाठी त्यांना उत्साहित करायला ‘उगवत्या सूर्याचे’ चित्र मी विविध अंगांनी रेखाटले असते.
आज आपल्या समाजाकडे थोडंसं वळून पाहिलं तर लक्षात येईल की गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये खूप मोठी दरी विस्तारत आहे. या दरीची खोली दिवसेंदिवस वाढत आहे. आजची गरीब व्यक्ती भाकरीसाठी धावताना दिसते तर, दुसरीकडे श्रीमंत व्यक्ती भाकरी पचवण्यासाठी धावताना दिसते.
श्रीमंत पैशांची कोठडी साठविण्यासाठी बँकांचा मार्ग धरतात, पण गरीब मात्र कर्जासाठी कित्येक जणांचे उंबरठे झिजवताना आपल्याला दिसतात. असे भयंकर चित्र मी माझ्या चित्रांच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आणले असते. जेणेकरून, गरीब लोकांबद्दल समाजामध्ये करूनास्पद भावना निर्माण झाली असती आणि त्यांच्या मदतीसाठी दोन हात पुढे आले असते.
काही चित्रकार तर आपल्या कलेचा उपयोग करून प्रदूषण सारख्या गंभीर समस्या देखील लोकांसमोर मांडतात. मी सहावीमध्ये असताना एका प्रसिध्द चित्रकाराची चित्र पाहायला शाळेमार्फत गेले होते. तेंव्हा तेथे चित्राच्या एका भागामध्ये एका व्यक्तीला झाडं तोडताना दाखवले होते तर, दुसऱ्या भागात तिचं व्यक्ती ऑक्सिजन वायूच्या कमतरतेमुळे कशी तडफडत आहे याचे दृष्य अत्यंत जिवंतपणे रेखाटले होते.
जेंव्हा मी हे चित्र पाहिले तेंव्हा माझ्या लक्षात आले की वृक्षतोड करणे आपल्यासाठी जीवघेणे बनू शकते. त्यामुळे, वृक्षतोड थांबवली पाहिजेत आणि वृक्षतोड करणाऱ्यांना रोखायला हवे. चित्रकला पूर्ण जगाला जागृत करते. अन्य सर्व कलांमध्ये चित्रकला ही श्रेष्ठ मानली जाते. मोठमोठ्या लेखकांनी देखील चित्रकलेला श्रेष्ठ मानले आहे.
मी चित्रकार झाले असते, तर त्यामध्ये वेगवेगळ्या रंगांचा वापर केला असता. चित्र व्यक्तीच्या वास्तविकतेला समोर आणत असते. मी माझं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुण्याला आलेली असताना, त्यावेळी पुण्यामध्ये एका चित्रकाराच्या चित्रांचे प्रदर्शन भरले होते. त्यातील एक चित्र माझ्या मनाला खूप भावले गेले. आजही ते चित्र जसच्या तस माझ्या मनामध्ये कोरलेल आहे.
त्या चित्रामध्ये एक व्यक्ती पोपटाला कैद करून पिंजऱ्यात ठेवते, त्या पोपटाला खाण्या – पिण्यासाठी सगळ काही देते. पण, तो पोपट काहीही खात किंवा पीत नाही. त्या पोपटाचा चेहरा पडलेला असतो आणि तो खूप निराश, दुःखी दिसत असतो. दुसऱ्या चित्रात एक व्यक्ती पोपटाला दुःखी अवस्थेत पाहून त्याला बंदिस्त केलेल्या पिंजऱ्यातून त्याची सुटका करते, तेंव्हा तो पक्षी आनंदाने उडून आकाशात विहंग करतो.
जेंव्हा मी ती दोन्ही चित्रे पाहिली होती तेंव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याप्रमाणे सर्व पशु – पक्ष्यांना देखील स्वतंत्रता हवी असते. आपण त्यांना बंदिस्त करून, देवाने त्यांना दिलेल्या हक्कावर निर्बंध आणतो. त्यामुळे, कोणत्याही जीवांना पिंजऱ्यात ठेवणे चुकीचे आहे. त्यांना मोकळ्या हवेत आपले जीवन जगण्याचा अधिकार असतो.
मी चित्रकार झाले तर, मला इतर चित्रकारांकडून मिळालेल्या ज्ञानाचा मी पुरेपूर वापर करेन. याशिवाय, माझ्या देशाला मजबूत आणि आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी मी चित्रकार म्हणून माझ्या स्तरावर सर्वोत्तम प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वांत गरीब आणि निम्नतम व्यक्तींकडे पूर्ण आणि वास्तविक लक्ष देऊन चित्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण करेन.
तिसरी गोष्ट म्हणजे मी सैनिकांचे आयुष्य सगळ्यांसमोर आणेन. आपले सैनिक आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी किती हालअपेष्टा सहन करतात, अनेक गोष्टींचा त्याग ते कसा करतात याचे वास्तव मी जनतेसमोर आणून त्यांच्याबद्दल सगळ्यांच्या मनात आदर निर्माण करेन.
आपल्या भारतीयांना लीहलेल्या सूचनांपेक्षा चित्रांच्या माध्यमातून दिलेल्या सूचना पटकन लक्षात येतात. शिवाय, लहान मुलांना देखील त्याची लगेच उकल होते. त्यामुळे वाईट सवयींचे आणि चांगल्या वर्तवणुकीचे मी फायदे, तोटे चित्रांमध्ये रेखाटून आपल्या देशामध्ये उत्तम नागरिक बनावेत यासाठी प्रयत्न करेन. चौथी गोष्ट म्हणजे मी ज्यासाठी माझी शक्ती समर्पित करीन ती म्हणजे ‘ शिक्षण प्रणाली ‘.
मी शिक्षण प्रणालीचा मानक उंचावेन आणि त्याच्या गुणवत्तेचा फायदा आपल्याला सगळ्या क्षेत्रांमध्ये कसा होतो याचे निदर्शन सगळ्यांसमोर करेन, जेणेकरून जी मुल किंवा मुली शिक्षणापासून वंचित आहेत, ज्यांना शिक्षणाबद्दल आवड नाहीय त्यांना शिक्षणाचे महत्व समजेल आणि कुठंतरी त्यांच्यामध्ये शिकण्याची आवड निर्माण होईल.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या परीक्षेबद्दलाच्या ज्या समस्या आहेत त्यादेखील सरकारसमोर आणेन. आजचा विद्यार्थी परिक्षार्थी कसा बनतोय याची जाणीव मी परीक्षा प्रणालीला चित्राच्या माध्यमातून करून देईन. चित्रकार हा फक्त चित्र काढत नसतो तर चित्राच्या माध्यमातून आपणा सर्वांना तो ज्ञानामृत पाजत असतो.
त्याच्या मनातील पवित्र विचार तो स्वतःच्या कलेच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहचवत असतो. त्यामुळे, मलादेखील चित्रकार व्हायला नेहमी आवडले असते. शेवटी, मी चित्रकार झाले असते तर देशाच्या प्रगतीसाठी आणि लोकांच्या उन्नतीसाठी आवश्यक असे सर्व प्रयत्न केले असते.
” वाटे मजला चित्रकार व्हावे,
वास्तव सर्व गोष्टींचे समोर आणावे.
देशाच्या प्रगतीसाठी,
आपले जीवन चित्ररूपातून सार्थक बनवावे.
नको चिंता व्यर्थ कशाची,
आनंदाने चित्रामध्ये एकरूप होऊन जगावे. “
– तेजल तानाजी पाटील
बागीलगे, चंदगड.
आम्ही दिलेल्या me chitrakar zalo tar nibandh in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “मी चित्रकार झालो तर निबंध मराठी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या If I Were a Painter Essay in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि my favourite hobby drawing essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण essay on drawing in marathi या लेखाचा वापर essay on my favourite hobby drawing in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट