नमस्कार मित्रहो ! आपण या पृष्ठावर आलात म्हणजे नक्कीच आपण Prajasattak Din Nibandh किंवा Bhashan यापैकी काहीतरी सर्च केले असणार… चला तर मग जादा वेळ न घालवता पुढे जाऊयात….
Prajasattak Din Nibandh/Bhashan in Marathi
शनिवार, २६ नोव्हेंबर १९४९ ; भारतीय संविधान सभेचे विशेष अधिवेशन सुरु होते. स्वतंत्र भारताच्या नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून संविधान सभेचे सदस्य एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार झाले होते. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील नागरिकांनी आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याद्वारे ही घोषणा केली होती की,
“आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस :
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय ;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य ;
दर्जाची व संधीची समानता ;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून ;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.”
आणि या अभूतपूर्व राज्यघटनेच्या मसुद्यावर सर्व संविधान सभा सदस्यांनी स्वाक्षऱ्या करून यास मान्यता दिली. या दिवसासाठी कित्येक वर्षांचा संग्राम, अनेकांचे बलिदान आणि अनेक नेत्यांचे कष्ट कारणी लागले होते. प्रत्यक्ष राज्यघटना निर्माण करण्याच्या कार्यासाठी २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस इतका प्रदीर्घ कालावधी लागला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, के. एम. मुन्शी, अल्लादी कृष्णास्वामी अय्यर, जे. बी. कृपलानी, सी. राजगोपालाचारी, श्यामा प्रसाद मुखर्जी, राजकुमारी अमृत कौर, सर्वपल्ली राधाकृष्णन, सर सय्यद मुहम्मद सादुल्ला इत्यादी अनेक नामांकित नेत्यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ३९५ कलमे, ८ अनुसूची व २२ भाग असलेली विस्तृत राज्यघटना तयार केली. यातूनच स्वतंत्र भारताच्या प्रजासत्ताक वाटचालीचा भरभक्कम पाया घातला गेला.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही घटना आहे ती २६ नोव्हेंबर १९४९ची. मात्र आपण आपला प्रजासत्ताक दिन (Prajasattak din) साजरा करतो तो २६ जानेवारी रोजी. हे कसे काय? मग प्रजासत्ताक दिनाची तारीख नेमकी कोणती? तर यामागेही एक अभिमानास्पद कहाणी आहे.
डिसेंबर ३१, १९२९ रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर कॉंग्रेसच्या लाहोर अधिवेशनात पंडित नेहरूंनी तिरंगा फडकवला आणि २६ जानेवारी १९३० हा दिवस पूर्ण स्वराज्याचे ध्येय म्हणून ठरवला गेला. त्यानंतर १७ वर्षे २६ जानेवारी हा दिवस ‘पूर्ण स्वराज्य दिवस’ म्हणून साजरा केला जात असे. पुढे भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले मात्र स्वातंत्र्यचा दिवस ब्रिटिशांनी १५ ऑगस्ट १९४७ हा निश्चित केला. त्यामुळे पूर्ण स्वातंत्र्य दिवसाचे महत्त्व टिकून राहावे, त्याची आठवण सदैव राहावी या हेतूने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या झाल्या असल्या तरी २६ जानेवारी १९५० हा दिवस राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी निवडण्यात आला. म्हणूनच २६ जानेवारी १९५० रोजी भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक देश झाला आणि तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणजेच Republic Day म्हणून साजरा केला जातो.
भारत प्रजासत्ताक झाला म्हणजे नेमकं काय? किंवा हा प्रजासत्ताक दिन (Prajasattak din) म्हणजे काय?
तर हे समजून घेण्यासाठी प्रजासत्ताक अथवा REPUBLIC या शब्दाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख वारसाहक्काने निवडला न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने (प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून) निवडला जातो आणि जेथील सर्व शासकीय कार्यालये, पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात. भारताच्या बाबतीत विचार केला तर आपण हे पडताळून पाहू शकतो. देशाचे सर्वोच्च पद – राष्ट्रपतीपद – भूषवणारी व्यक्ती अप्रत्यक्ष निवडणुकीतून निवडली जाते. तसेच नगरपालिका, जिल्हापरिषद, मंत्रालय, प्रशासकीय कार्यालये इत्यादी ठिकाणी भारतीय नागरिकांस प्रवेश करण्याचा तसेच तेथील पदांसाठी अर्ज करण्याचा हक्क असतो. इतर देशांची तुलना करायची झाल्यास अमेरिका आणि ब्रिटन या दोन देशांशी तुलना करता येईल. हे दोन्ही देश लोकशाही देश आहेत कारण तेथील प्रशासन लोकनिर्वाचित संसद चालविते मात्र अमेरिकेचे अध्यक्ष लोकनिर्वाचित असतात आणि ब्रिटनचे प्रमुखपद तेथील राजसत्तेच्या हाती असते. म्हणूनच अमेरिका हा ‘लोकशाही प्रजासत्ताक’ देश आहे तर ब्रिटन हा केवळ ‘लोकशाही’ देश आहे.
असा हा जनतेला खऱ्या अर्थाने सुस्पष्ट व निश्चित अधिकार बहाल करणारा दिवस सर्वच भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. प्रजासत्ताक दिनाची माहिती (Information of Prajasattak din) सांगायची झाली तर या दिवशी जागोजागी ध्वजवंदन होते, लोकं जिलेबी वाटून आनंद साजरा करतात. मात्र या दिवसाचे मुख्य आकर्षण असते ते प्रजासत्ताक दिन संचलनाचे. तीन दिवस चालणारे हे संचलन राजपथ, दिल्ली येथे मोठ्या दिमाखात संपन्न होते. या संचलनाच्या वर्णनाशिवाय प्रजासत्ताक दिनाबद्दल निबंध पूर्णच होऊ शकत नाही. या समारंभाची सुरुवात अमर जवान ज्योती येथे हुतात्मा जवानांना आदरांजली वाहून करण्यात येते. राष्ट्राचे वैविध्य, कला, संस्कृती याचबरोबर राष्ट्राचे शस्त्रबल, सैन्यबळ यांचेही गौरवशाली प्रदर्शन याठिकाणी केले जाते. भूदल, नौदल आणि हवाईदलाचाही यात समावेश असतो. त्याचबरोबर NCC, NSS व इतर निमलष्करी दलांचाही यात समावेश असतो. भारतातील सर्व घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेशांपैकी काही निवडक राज्यांचे प्रदर्शन रथ आपापल्या राज्यातील संस्कृतीचे वेधक प्रदर्शन घडवत असतात. यामध्ये मंत्रिमंडळातील काही खात्यांचेही प्रदर्शन रथ सामील होतात. संचलनाची सांगता हवाईदलाच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी होते. या सर्व समारंभाचा आस्वाद हजारो-लाखो प्रेक्षक प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रक्षेपणाद्वारे घेत असतात.
या सोहळ्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे अनेक वीरांना या दिवशी गौरवण्यात येते. अशोक चक्र, कीर्ती चक्र राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जाते. तसेच वीरबाला, वीरबालक म्हणून ज्या मुलांचा गौरव झाला आहे अशांना या संचलनात सामील होण्याचा मान मिळतो.
या समारंभासाठी परदेशातील काही विशेष अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण दिले जाते. यामुळे भारताच्या गौरवशाली संपन्नतेचा हा वस्तुपट इतर देशांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताचे स्थान बळकट होण्यास अधिक साहाय्य होते. हा सोहळा अचूक व योजनाबरहुकुम पार पडावा यासाठी दरवर्षी २३ जानेवारी रोजी याची संपूर्ण रंगीत तालीम करण्यात येते. या सर्वांचा परिपाक म्हणून हे संचलन अतिशय शिस्तबद्ध, समन्वय साधणारे आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरते.
इतरत्र राज्यांच्या राजधान्या, जिल्ह्याची ठिकाणे, शाळा, महाविद्यालये आदि ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचे (Prajasattak din) संचालन आणि प्रात्याक्षिके अशाच जोमदारपणे व उत्साहात पार पडतात. आपापल्या शाळेतील प्रजासत्ताक दिन तर बहुतेक सर्वांच्याच चांगला आठवणीत असणार आहे. सर्वत्र देशभक्तीपर गाणी गायली जात असतात, नागरिक शुभ्र पोशाखांत अथवा तिरंगी पोशाखात वावरत असतात. “भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो” असे म्हणत एकमेकांस प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत असतात. एकूण वातावरण देशाच्या प्राचीन इतिहासाप्रती आदर, जगातील सर्वात मोठी आणि सर्वात वैविध्यपूर्ण असलेली लोकशाही असल्याचा गर्व आणि देशाप्रती भक्तीभाव जागवणारे असते.
पण प्रजासत्ताक दिनाचे (Prajasattak din) महत्त्व निव्वळ एका दिवसाच्या समारंभापुरते नक्कीच नाही. या दिवसाच्या आठवणीने एका जबाबदार देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये, निष्ठा यांची जाणीव सतत मनात जागी ठेवणे हे या दिवसाचे मूळ उद्दिष्ट्य आहे. अन्यथा २७ जानेवारी रोजी ठिकठिकाणी पायदळी तुडवले जाणारे तिरंगे, वाहतुकीचे नियम न पाळल्याने होणारे अपघात आणि ट्राफिकजाम, धार्मिक-जातीय दंगे, वाढती बकाली आणि गुन्हेगारी, भ्रष्टाचार करणारे आणि तो सहन करणारे यांचा सुळसुळाट अशा गोष्टी नजरेस पडल्या कि प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अजून लोकांना समजलेच नाही असे खेदाने म्हणावे लागते.
प्रजासत्ताक दिनाच्या मागे लोकांना अधिकार देणारी आणि त्याचवेळी त्यांच्या कर्तव्यांचाही उल्लेख करणारी राज्यघटना आहे हे आपण विसरता कामा नये. आणि त्या राज्यघटनेच्या मूलतत्त्वांशी निष्ठावान राहून वागणे हे भारतीय नागरिक म्हणून आपल्या सर्वांचे – विद्यार्थी, राज्यकर्ते, प्रशासक, सामान्य नागरिक – प्रथम कर्तव्य आहे. स्वच्छतेसारख्या लहानमोठ्या दैनंदिन कामापासून ते मतदानासारख्या राष्ट्रीय कर्तव्यांपर्यंत या अधिकारांची आणि जबाबदारीची जाणीव आपण ठेवली तर आपला देश एक सुसंस्कृत, सूज्ञ प्रजासत्ताक म्हणून जगाच्या नकाश्यावर एक पथदर्शक म्हणून उदयास येईल. या दिशेने आपल्या देशाचा प्रवास मागेच सुरु झालेला आहे, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामांसारख्या दृष्ट्या व्यक्तीनेभारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिलेच आहे. आता ते स्वप्न सत्यात उतरेपर्यंत अविरत प्रयत्नशील राहणे ही आपली जबाबदारी असायला हवी. म्हणूनच साने गुरुजींच्या काव्यपंक्तींचा आधार घेऊन या स्वप्नाला शब्दरूप देऊया आणि म्हणूया,
“ बलसागर भारत होवो
विश्वात शोभूनी राहो! ”