नवरात्र उत्सव मराठी माहिती Navratri Information in Marathi

रंग निळा सांगतो ‘निश्चय आणि प्रेरणा’,

लाल देई शक्ती,

पवित्रता सांगे रंग जांभळा,

केशरी रंग धैर्याचा,

हिरवा समृद्धीचा,

पांढरा प्रतीक शांततेचा,

पिवळा कष्टाचा,

करडा रंग इच्छेचा,

गुलाबी शुभारंभाचा,

नवरंग हे सांगती;

अर्थ खरा स्त्रीत्वाचा, अर्थ खरा स्त्रीत्वाचा!”

Navratri Information in Marathi – Ghatasthapana in Marathi नवरात्र उत्सव मराठी माहिती 2021 मित्रांनो, नवरात्र उत्सव म्हणजे नऊ दिवस चालणारा हिंदू धर्मातील देवीचा उत्सव. तसे पाहायला गेले तर, आपल्या लक्षात येईल की हिंदू धर्मामध्ये सर्वच उत्सव हे विविध प्रकारे साजरे केले जातात; पण, नवरात्र हा उत्सव आपल्या समाजात इतक्या विविधरंगी प्रकारे साजरा केला जातो, की ते पाहून सगळयांना अगदी थक्क व्हायला होते. मित्रहो, हिंदू वर्षाप्रमाणे श्रावण महिना सुरू झाला की सुरू होतात ते आपल्या सर्वांचे विविध सण आणि उत्सव! खरंतर, यात विशेष करून गणपती उत्सव संपला की आपणा सर्वांना वेध लागतात ते नवरात्र उत्सवाचे.

या दरम्यान येणारा पित्र पंधरवडा हा नवरात्रीच्या तयारीत कधी संपतो हे आपल्याला समजत देखील नाही. नवरात्र सुरू झाली की जागोजागी चौका-चौकात देवीच्या स्थापनेसाठी मंडप उभारले जातात. पण मित्रांनो, आपल्याकडे गणपतीप्रमाणे नवरात्र उत्सव साजरा करणारी अनेक मंडळे जरी नसली तरी जी काही ठराविक मंडळे आहेत, ती नवरात्र उत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा करत असतात.

navratri information in marathi
navratri information in marathi

नवरात्र उत्सव मराठी माहिती – Navratri Information in Marathi

घटस्थापना – Ghatasthapana in Marathi

सगळ्यांसाठी उत्सुकता निर्माण करणाऱ्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. आता घटस्थापना म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल; तर  मित्रहो, घटस्थापनेमध्ये एका मडक्यामध्ये धान्य पेरले जाते आणि त्यावर अखंड नंदादीप लावला जातो. 

त्याचबरोबर, दररोज घटस्थापनेला फुलांची माळ घातली जाते आणि सकाळ-संध्याकाळ नित्यपणे त्याची आरती केली जाते. शिवाय, सार्वजनिक नवरात्र उत्सवातही या सर्व गोष्टी खूप उत्सुकतेने केल्या जातात. खरंतर, घटस्थापना करण्याची प्रत्येक घराची पद्धत ही निरनिराळी असते.

कुणाकडे उठता बसता सवाषण, कुठे अष्टमीला तर, कुठे नवमीला ब्राह्मण सवाषण जेवू घातले जाते. तर, काही घरांमध्ये कुमारिकांना भोजन जेवू घातले जाते. याशिवाय, नवमीच्या दिवशी होमहवन देखील असते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे यादिवशी आपल्या सर्वांच्या आवडीचा पुरणाचा स्वयंपाक सुद्धा असतो.

नवरात्र सुरू झाली की बरेच जण नऊ दिवस उपवास करत असतात. तर, काहीजण फक्त धान्य आणि फराळ खाऊन उपवास करतात. एकुणच काय तर नवरात्रीचे नऊ दिवस हे धावपळीचेच आसतात. काही घरांमध्ये तसेच, सार्वजनिक मंडळांमध्ये देवीचा गोंधळही घातला जातो आणि त्या गोंधळासाठी गोंधळी बोलवले जातात.

इतिहास

देवीने नवरात्रीचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला आणि महिषासुराचा वध केला; म्हणून या देवीचे नाव महिषासुरमर्दिनी असे रूढ झाले. तेंव्हापासून पृथ्वीवर महिषासुरमर्दिनीच्या शक्ती रूपाची पूजा नवरात्रीत केली जाते.

वाघावर आरुढ झालेली, हातात तलवार व खडग ही शस्त्रे धारण केलेली, आकर्षक अशी देवीची मूर्ती नवरात्रीत सगळीकडे पूजिली जाते. मित्रांनो, मला चांगलच आठवत आमच्या गावीसुद्धा नवरात्रीचा उत्सव हा खूप मोठ्याने साजरा केला जायचा.

शिवाय, त्यावेळी गावी असताना नवरात्र उत्सवात देवीची आरती झाल्यावर शेवटी खिरापत ओळखण्याची मजा काही वेगळीच होती. दररोज वेगळी खिरापत कुणीतरी डबा वाजवून दाखवत असे, जेणेकरून सगळयांना फक्त आवाजांनी ओळखण्याचा प्रयत्न करता येई. नवरात्र उत्सव चालू झाला की प्रत्येक घरी वेगवेगळे फराळ आणि पदार्थ बनवले जातात.

काही ठिकाणी तर पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन अशा चढत्या क्रमाने खिरापती असतात. खरंतर या खिरापत खाण्याच्या चढाओढीत सगळ्यात जास्त लहान मुलांनाच मजा असते. दसर्‍याच्या दिवशी तर त्यात श्रीखंड, बासुंदी जेलेबी किंवा चिवडा, साखरभात, समोसे यांसारख्या पदार्थांची भर पडत असते.

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ‘ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडुन दे’, ‘करीन तुझी सेव‍ा’ यांसारख्या गाण्यांनी नवरात्रीची सुरूवात होई. नंतर क्रमाक्रमाने बाकीची गाणी गायली जायची.

‘अंबा बैसली सिंहासनी हो प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनी’ ही आरती तर ऐकायला आपल्या कानांना अतिशय मधुर वाटते. त्याचबरोबर ‘उदो बोला, उदो बोला, अंबाबाई माऊलीचा हो आंनदे गर्जती काय वर्णू महिमा’ ही देखील अतिशय प्रसिद्ध व छान आरती आहे. अशा अनेक मधूर आरत्या आणि देवीची गीते या नऊ दिवसात आपल्याला सगळीकडे ऐकायला भेटतील हे मात्र नक्की.

आईचा तुळजा, देवही तुळजा

देवाच्या भगती गोंधुळ घालिती.”

अशा सद्गुणांचा निसंग होण्याचा विकल्प, काम आणि क्रोध सोडून देण्याचा संकल्प तसेच, जन्म आणि मरणाचा फेरा चुकविण्याचा जोगवा नवरात्र उत्सवात अनेक बायका मागतात. खरंतर मित्रांनो, या जोगव्यामध्ये फार मोठा आध्यात्मिक भरलेला आहे.  मात्र तो समजावून घेवून, जोगवा मागितल्यास मनशांती नक्कीच मिळते.

महाराष्ट्रातील विदर्भात ‘भुलाबाई’ हा प्रकार आपणा सर्वांना बघायला मिळतो. भाद्रपद पौर्णिमेला शंकर-पार्वतीच्या मूर्ती स्थापित करून, या मूर्तींच्या समोर अनेक शाळकरी मुली समुहाने टिपर्‍यांच्या तालावर गाणी म्हणतात. शिवाय, शाळेतून घरी आल्यावर या मुलींची हातात टिपऱ्या घेऊन मैत्रिणीच्या घरोघर जाण्याची लगबग खूप मजेची असते.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तर, टिपूर अशा चमचमणाऱ्या चांदण्यात भूलाबाईला मखरात बसवून, तिच्यासाठी आरस मांडुन, तिची मनोभावे पूजा केली जाते.

साधारणतः १० ते १५ वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील विदर्भात अशा विविध परंपरा जपल्या जात होत्या. पण, हल्ली शाळांच्या वेळा व क्लासेस यातून मुलींना वेळ मिळेनासा झाला. त्यामुळे, सध्याच्या काळात फक्त कोजागरीच्या दिवशीच भुलाबाई मांडल्या जातात. मित्रांनो, मगापासून तुम्हाला प्रश्न पडला असेल की भुलाबाई म्हणजे काय?

तर मित्रहो,  भूलाबाई हे देवीचेच रुप असुन तिला गौराई असेही म्हटले जाते. शिवाय, आपल्याला माहीतच आहे की गौराई ही आपणा सर्वांच्या घरची माहेरवाशीण असते. गौराईवरुन एका गाण्याची सुरुवात “पहिली माझी पूजा बाई, देवा देव बाई” अशी होती. पण, नंतर “पहिल्या मासेचा गरवा कधी येशील सरवा, सरता सरता कारागरी नंदनगावच्या तीरावरी आंबे बहुत पिकले भूलाबाई राणीचे डोहाळे”

अशा प्रकारे गौराईवरून भुलाबाई हे नाव प्रचलित झाले. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नऊ महिन्यांची नऊ फळे पिकतात आणि शेवटी गौराईचे डोहाळे “तिला नेहुनी घाला पलंगावरी तेथे शंकर बसले, शंकर आमचे मेहुणे, दीड दिवसाचे पाहुणे” असे गीत गाऊन या उत्सवाची सांगता केली जाते.

याशिवाय मित्रांनो, नवरात्रीत गुजराती महिला गरबा नृत्य करतात. गुजरातमधील अनेक स्त्रिया  सजूनधजून गरब्यासाठी उतरतात आणि रात्री उशिरापर्यंत त्यांची नाचगाणी सुरु असतात. त्याचबरोबर, मंदिरांमध्ये देखील गरबा खेळल‍ा जातो. पण मित्रहो, नवरात्रीतील पूजेचा एक भाग म्हणून, नृत्याच्या माध्यमातून साजरा केला जाणारा हा गरबा हळूहळू व्यावसायिक रूप घेऊ लागला आहे.

हल्ली हजारो रुपयांची तिकिटे लावून, विशेष असे सेलिब्रिटीज बोलावून गरबा खेळला जातो. त्यामध्ये बरेच गैरप्रकारही होतात आणि यामुळे नवरात्र उत्सवाचे पावित्र्य उध्वस्थ होते. आपणा सर्वांना तरुणांचा जोश मान्य आहे. परंतू, त्यांच्या या जोशातून निर्माण होणारे गैरप्रकार कुठंतरी थांबले गेले पाहिजेत.

त्यासाठी मित्रहो, आपण सर्वांनी सण आणि उत्सवांमधील शुद्ध पवित्र भावना मनापासून जपली पाहिजेत. आपल्या हिंदू धर्माच्या ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की परशूरामाची जननी म्हणजे रेणुकामाता माहूरगडवासिनी ही आहे.

देवीच्या साडेतीन पीठापैकी एक कोल्हापुरची अंबाबाई, दुसरी तुळजाभवानी आणि तिसरी रेणुकामाता ही तीन पूर्ण पीठे आणि यानंतर येणारे नाशिकजवळचे वणींचे सप्तशृंगी हे मंदिर अर्धपीठ मानले जाते. या सर्व ठिकाणी नवरात्र उत्सव हा खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.

याठिकाणी दर्शनाला जाण्यासाठी भक्तांची खूप गर्दी असते शिवाय, प्रत्येकजण या देवींचे दर्शन घेण्यासाठी गर्दीमध्ये धडपड करत असतो. काही जणांना जर अशा ठिकाणी येऊन देवीचे दर्शन घेणे शक्य झाले नाही, तर निदान स्वतःच्या गावातल्या किंवा गावा शेजारच्या देवीच्या दर्शनाला आपल्याला आवर्जून जाता आले पाहिजेत.

काही भगिनी तर न चुकता दररोज पहाटे देवीचे दर्शन घेतात. मित्रहो, अलीकडच्या काळामध्ये घरी नंदादीप लावणे शक्य होत नाही, म्हणून मंदिरांमध्ये पैसे देण्याची पद्धत रूढ होत आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे नागपूरच्या जवळील कोराडीच्या मंदिरात असे हजारो दीप लावले जातात.

नवरात्रीमध्ये देवीच्या विविध रूपांची आराधना करताना आपल्या सर्वांच्या मनामध्ये देवीबद्दलचा भक्तीभाव उभारून आला पाहिजे. अशा प्रकारे, मनोविकारांची कुरवंडी करण्याच्या भावनेतून आपण सर्वांनी देवीच्या चरणी लीन झाले पाहिजेत.

मित्रहो, केवळ नऊ दिवसांचा उपवास केला म्हणजे आपले कर्तव्य झाले असे नसून, उपवास म्हणजे दूर जाणे हा अर्थ गृहीत धरून मनोविकार, पापवासना, दुष्टबुद्धी या साऱ्यापासून दूर जाण्याचा निर्धार या नवरात्रीत होणे अपेक्षित असते.

देवीने ज्याप्रकारे अत्यंत  बलाढ्य असलेल्या महिषासुर राक्षसाचा वध करून स्वतःच्या सामर्थ्याचे दर्शन आपणा सर्वांसमोर उभे केले, त्याप्रकारे आपणही हे शक्ती सामर्थ्य आपल्या ठाणी निर्माण व्हावे यासाठी नवरात्र हा उत्सव मनापासून साजरा केला पाहिजेत.

पंचमं स्कंन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च |

सप्तमं कालरात्रीच महागौरी ति चाष्टकम ||

नवमं सिध्दिरात्री च नवदुर्गाः प्रकीर्तीताः |

या भगवतीच्या पहिल्या रूपाला शैलपुत्री असे म्हटले जाते, तर दुसऱ्या रूपाला ब्रह्मचारिणी, तिसऱ्या रूपाला चंद्रघंता, चौथ्याला कृष्मांडा, पाचव्याला स्कंदमाता, सहाव्याला कात्यायनी, सातव्याला कालरात्री, आठव्याला महागौरी आणि नवव्याला सिद्धीदात्री अशा प्रकारे नवरात्रीच्या या नऊ दिवसात निरनिराळ्या नऊ रूपांमध्ये महिषासुरमर्दिनी वावरत असते आणि दहाव्या दिवशी ती शुभनिशुंभ या राक्षसांचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमा उल्लंघन करते.

अशा या देवीची ही नऊ रूपं आपण बघितल्यानंतर तिचे नऊ दिवसांचे आपल्या घरातले जे मंगलमय वास्तव्य असते ते तसेच अखंड रहावे, अशी भावना आपल्या मनात निर्माण होते. शिवाय या नऊ दिवसांमध्ये कोणी उपवास, एकभुक्त व्रत किंवा यापैकी एका व्रताचा नियम करून देवीची आराधना करत असतो.

नऊ कुमारिकेंचे पूजन, सप्तशती पाठ, कुंकुमार्चन, श्रीसुक्त पाठ, ललीतासहस्त्र नामावली आणि आपली जी परंपरागत चालत आलेली कुलदेवता आहे तिचा जप, या सर्व गोष्टी जर योग्य पद्धतीने आणि मनापासून जास्तीत जास्त वेळा केल्यास कोणत्याही व्यक्तीला त्याच्या आयुष्यात श्रेष्ठत्व प्राप्त होऊ शकते.

श्रीकृष्णाने भगवद्गीतेत वर्णन केल्याप्रमाणे यज्ञ केल्यास आणि त्याठिकाणी पर्जन्यवृष्टी झाल्यास त्या यज्ञाचे फळ शतपटाइतके प्राप्त होते. म्हणून या नवरात्रीमध्ये हवन यज्ञाला आपल्या पूर्वजांपासून एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच, ज्या कुमारिकांना भोजन दिले जाते त्यांना सुद्धा त्यांच्या वयानुसार देवीच्या वेगवेगळ्या रूपांनी संबोधिले जाते.

कुमारिका कमीत कमी दोन वर्षांची असली पाहिजे. त्याआधी तिचे पूजन चालत नाही. तीन वर्षाच्या कुमारीला त्रिमूर्ती, चार वर्षाच्या कुमारिकेला कल्याणी, पाच वर्षाच्या कुमारीला रोहिणी, सहा वर्षाच्या कुमारीला कालिका, सात वर्षाच्या कुमारिला चंण्डिका, आठ वर्षाच्या कुमारीला शांभवी, नऊ वर्षाच्या कुमारीला दुर्गा आणि दहा वर्षाच्या कुमारीला सुभद्रा याच्या वरच्या वयाच्या कुमारीचे पूजन करण्याचा हिंदु धर्मामध्ये प्रघात नाही.

कुमारी पूजनाचे फळ असे आहे की, आपल्या आयुष्यातील दुःख आणि दारिद्र्य नाहीसे होऊन आपल्या शत्रूंचा सुद्धा सर्वनाश होणे. यावरून भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचे महत्त्व किती आहे हेदेखील अधोरेखित होते. मित्रहो, फार पूर्वीची गोष्ट आहे, दक्षाच्या यज्ञामध्ये देवी भद्रकालीचा अवतार अष्टमीला प्रकट झाला. तिचा आकार प्रचंड आणि अवाढव्य असा होता.

तिच्याच बरोबर असंख्य योगीनींचाही समावेश होता म्हणून अष्टमीला जो यज्ञ करण्याचा प्रघात आहे, त्यामध्ये हवन, ब्राह्मण भोजन, कुमारिका भोजन फळ, फूल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या दानांनी जगदंबेला प्रसन्न करण्यात येते.

तसेच, ज्यांना नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करणे शक्य होत नाही, त्यांनी तीन दिवस जरी उपवास केला तरी त्यांना यथोचित असे फळ मिळू शकते. तसेच सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तीन रात्री उपाशी राहून देवीची पूजा केली, तर त्यांना फळ प्राप्ती होऊ शकते.

देवीचे पूजन, होम, कुमारी पूजन आणि ब्राह्मण भोजन या चार प्रकारच्या कार्याने यथोचित पूजन केले, तर नवरात्री या मंगलमय उत्सवाचे सांगोपांग व्रतपूर्ण होते, अशी आख्यायिका आहे. मित्रहो, या जगात जे काही अन्य अनेक व्रत किंवा अनेक दान आहेत त्याची तुलना या नवरात्र व्रताशी कधीच होऊ शकत नाही.

कारण हे व्रत धनधान्य, सुखसंपत्ती, पुत्रपौत्र, आरोग्यवर्धक आणि स्वर्ग व मोक्षाची प्राप्ती करून देण्यास समर्थ आहे. ज्यांना विद्या, धन आणि पुत्र मिळवण्याची इच्छा आहे, त्यांनी या सौभाग्यदायी मंगलमय व्रताचे मनापासून अनुष्ठान मांडावे. त्याचबरोबर, विद्येची आवड असणाऱ्या मनुष्याने हे व्रत केल्यास त्याला विद्येची प्राप्ती होते. ज्याचे राज्य नष्ट झाले, त्याला पुन्हा राज्याची प्राप्ती होऊ शकते, असे वर्णन परमपावन अशा श्री देवी भागवतात केले आहे.

श्री सप्तश्तीरचयीला मार्केण्डेय ऋषी म्हणतात की,

सर्वाबाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतन्वितः|

मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः||

याचा अर्थ असा होतो की, “जो कोणी भक्त नवरात्रीमध्ये या भगवतीचे मनापासून उपासना करेल, त्याला कुठलीच बाधा होणार नाही आणि त्याला या जन्मात धनधान्याची प्राप्ती होईल, यात काही संशय नाही. असे म्हणून सकलचराचर अजरामर भगवती देवीला माझे साष्टांग दंडवत असो.”

महत्व

मित्रहो, आपल्या हिंदु संस्कृतीमधील धर्माला अनन्यसाधारण असे महत्व आहे. आजही भारतातील अनेक भागांत हिंदु धर्माच्या  प्रथा, परंपरा आणि सण अतिशय भक्तिभावाने आणि निष्ठेने साजरे होताना आपल्याला दिसतात. नवरात्र हा आपल्या भारतातील अतिशय पवित्र आणि महत्वाचा असा उत्सव आहे. संपुर्ण नऊ दिवस मनोभावे देविची पुजा केली जाते.

तसेच, देवीची आराधना करत मंगलमय अशा वातावरणात भक्तजन देविची अनेक रूपं या नऊ दिवसात पुजली जातात. खरंतर, हिंदु धर्मातील सगळ्यात महत्वाचा उत्सव म्हणुन या सणाकडे पाहिले जाते.

नवरात्र हा पवित्र उत्सव देवी दुर्गेला समर्पित असा उत्सव आहे. संस्कृत भाषेमध्ये नवरात्री या शब्दाचा अर्थ “नऊ रात्री” असा होतो. या नऊ रात्री आणि दहाव्या दिवशी वेगवेगळया नऊ देविंची पुजा अर्चा केली जाते. दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा हा सण असल्याने या दिवसाला साडे तिन मुहूर्तापैकी एक उत्तम मुहूर्त मानला जातो.

अशा प्रकारे, भारतात आणि नेपाळमध्ये साजरा करण्यात येणाऱ्या अन्य सणांपैकी नवरात्र हा एक विशेष असा सण आहे. तसेच, दिवाळी हा सण सुद्धा प्रकाशाचा आणि उत्साहाचा एक सण आहे, जो विजयादशमी नंतर जवळपास वीस दिवसांनी साजरा केला जातो. 

तसं पाहीलं तर एका वर्षात पाच प्रकारच्या नवरात्री येतात, त्यात शारदिय नवरात्र ही प्रसिध्द नवरात्र आहे. बऱ्याच ठिकाणी नवरात्रीचा अर्थ शारदिय नवरात्र असाच असतो. नवरात्रीच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये दुर्गेची पुजा केली जाते, जिला हिंदु धर्मात ऊर्जा आणि शक्तीची देवता मानली जाते.

नवरात्री पूजा – Navratri Puja Information in Marathi

नवरात्रीमध्ये सगळीकडे प्रत्येक दिवसाला आई दुर्गेच्या वेगवेगळया रूपाची पुजा केली जाते. पहिले तीन  दिवस त्यांच्या कुमारी, पार्वती आणि काली रूपाचे पुजन करण्यात येते. परंतु, साधारणतः पाहिल्यास एका लाकडी काडयांपासुन बनविलेल्या नव्या टोपलीत माती भरली जाते आणि त्यात नऊ प्रकारचे धान्य पेरले जातात. 

या टोपलीत जवळजवळ दहा दिवस पुरेशा प्रमाणात पाणी टाकले जाते. दहा दिवसांमध्ये संपुर्ण टोपली तृणाने हिरवीगार झालेली आपल्याला दिसते. यानंतर, या टोपलीच्या अगदी मधोमध मातीचा घट ठेउन त्यात विडयाची पाच पाने ठेवली जातात आणि त्यावर नारळ ठेवला जातो. प्रत्येक दिवशी या घटावर सुंदर फुलांची माळ सोडली जाते. अनेक ठिकाणी तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी विडयाच्या पानांची माळ लावण्याची देखील परंपरा आहे.

नवरात्री या उत्सवाबद्दल अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. त्यातील एक आख्यायिका म्हणजे, रामायणानुसार प्रभु रामचंद्रांनी देवी दुर्गा मातेला रावणासोबत युध्द होत असताना बोलवले होते. परंतू, वसंतऋतुच्या शेवटी दुर्गा देवीची पुजा अर्चना केली जात होती. इकडे युध्दाची शक्यता पाहता प्रभु रामचंद्रांनी दुर्गा देवीला अस्तं महाविद्येने बोलवले होते. 

ज्याला आपण अकाल बोधन या नावाने देखील जाणतो, पण ही पुजा पारंपारिक दुर्गा देवीच्या पुजेपेक्षा थोडी वेगळी असते. त्यामुळे,या पुजेला अकाल बोधन असे म्हटले जाते. या पुजेत पाच प्रकारची फळं ठेवण्यात येतात आणि वर सुंदर असा फुलोरा बांधला जातो. नंतर, गणपतीची, देवीची आणि नवरात्रीची आरती म्हटली जाते.

दररोज नित्यपणे सकाळ-संध्याकाळ आरती म्हटली जाते आणि देवीसमोर धुप पेटवला जातो. त्याचबरोबर देवीच्या घटाजवळ अखंड दिवा दहा दिवसांकरीता लावला जातो. मित्रहो, हा दिवा दहा दिवस अजिबात विझु दिला जात नाही. याशिवाय, या दहा दिवसांमधे नऊ कुमारीकांचे पुजन केले जाते आणि त्यांचे पाय धुवुन त्यांना भेटवस्तु दिल्या जातात. अशा प्रकारे, शेवटी होमहवन करून देवीला नैवेद्य दाखविण्यात येतो.

असा हा विविधरंगी नवरात्र उत्सव आपणा सर्वांनाच प्रिय असतो.

        –  तेजल तानाजी पाटील

                     बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये navratri information in marathi काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर navratri festival information in marathi language म्हणजेच “नवरात्र उत्सव मराठी माहिती” navratri puja information in marathi या सणाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा टी योग्य असल्यास आम्ही ते या navratri utsav mahiti in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि information of navratri in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!