दिवाळी सणाची माहिती 2023 Diwali Information in Marathi

Diwali Information in Marathi दिवाळी माहिती मराठी दिवाळी म्हणजेच दीपावली हा एक प्रमुख हिंदू  सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. या सणाला आपल्या घरामध्ये तसेच, घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. त्याचबरोबर, घराच्या बाहेरील उंच जागी आकाशदिवा म्हणजेच आकाशकंदिल लावला जातो. घराबाहेर सुंदर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. खरंतर, पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर, शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी असलेल्या आश्विन आणि कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो.

आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या दीपावली सणाचे असतात. हा सण साधारणपणे ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान येत असतो. शिवाय, या सणाला भारतात बहुतांश ठिकाणी अनेक स्पर्धा आणि कार्यक्रम देखील आयोजित केले जातात.

हा एक पवित्र असा हिंदु सण आहे, जो समाजातील वाईट गोष्टींवर मात करून चांगल्‍या गोष्टींच्या विजयाचे प्रतिक निर्माण करतो. दीपावलीच्या सणाला आपल्या भारतातील बहुतांश शाळांना, कंपन्यांना सुट्ट्या दिल्या जातात.

diwali information in marathi
diwali information in marathi

दिवाळी सणाची माहिती – Diwali Information in Marathi

सणदिवाळी, दीपावली
एकादशी, वसुबारससोमवार, १ नोव्हेंबर २०२१
द्वादशी, धनत्रयोदशीमंगळवार, २ नोव्हेंबर २०२१
त्रयोदशी, हनुमान पूजा बुधवार, ३ नोव्हेंबर २०२१
अमावस्या, लक्ष्मी पूजन गुरुवार, ४ नोव्हेंबर २०२१
प्रतिपदा, गोवर्धन पूजा शुक्रवार, ५ नोव्हेंबर २०२१
द्वितीया, भाऊबीज शनिवार, ६ नोव्हेंबर २०२१

इतिहास

Diwali Festival Information in Marathi लिखित स्वरूपातील उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. या सणाचा उगम फार प्राचीन काळी म्हणजे जेंव्हा आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असा समज आहे. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रयण यांसारखे यज्ञ केले जात असत, ज्यांचा समावेश सात पाकयज्ञांमध्ये होतो.

परंतु, या धार्मिक आचारात आपल्याला दिवाळीचे प्राचीन संदर्भ सापडतात, असे नेमके आपल्याला म्हणता येणार नाही, असे मत बी. के. गुप्ते यांनी आपल्या ‘फोकलोअर ऑफ दिवाली’ या पुस्तकात मांडले आहे.

याशिवाय भारतातील काही लोकांची अशी श्रद्धा आहे की, चौदा वर्षांचा उपवास संपवून जेंव्हा रामचंद्र हे सीतेसह अयोध्येला परत आले तो दिवस म्हणजे दिवाळी होय. खरंतर, त्यावेळी दिवाळीचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा.

आपल्या भारताच्या प्राचीन इतिहासामध्ये दिवाळी हा सण सगळ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणारा सण आहे, असे म्हटले आहे. त्याकाळी, दिपावलीतील प्रकाशमय असणारा दीप हा मांगल्याचे प्रतीक मानला जात होता. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा, म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.

पावसाळ्यातील समृद्धीचा, आनंद उत्सवाचा आणि कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी घरातील स्त्रिया दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात तर, पुरुष मंडळी घरांच्या दारात आकाशदिवे लावतात. दिवाळीमध्ये महाराष्ट्रात आणि इतर काही ठिकाणी लहान मुले आपल्या घराजवळ मातीचा किल्ला तयार करतात आणि त्यावर मातीची खेळणी मांडतात तसेच, त्यावर धान्य देखील पेरतात.

दीपावलीचे मूळचे नाव ‘यक्षरात्री’ असे होते असा उल्लेख हेमचंद्राने नोंदवला आहे, तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही दिवाळीचे हेच नाव नोंदलेले आहे.

‘नीलमत पुराण’ या ग्रंथात या सणास “दीपमाला” असे म्हटले आहे. कनोजचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नाटकात या सणाला “दीपप्रतिपदुत्सव” असे नाव दिले आहे. त्याचबरोबर, ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात “दिवाळी” हा शब्द वापरला गेला आहे.

शिवाय, भविष्योत्तर पुराणात दिवाळीला “दीपालिका” असे म्हटले आहे, तसेच काल्विवेक या ग्रंथात दीपावलीचा उल्लेख हा “सुखरात्रि” असा केलेला दिसतो आणि व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथात “सुख सुप्तिका” म्हणून दिवाळी ओळखली जाते.

आपण जर बाहेरच्या जगामध्ये थोडंसं डोकावून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की दीपावली या सणाला आता जागतिक स्वरूप प्राप्त होत चालले आहे. जगभरातले भारतीय लोक आपापल्या शहरात दिवाळी साजरी करतात. त्यामुळे, अमेरिका येथे देखील न्यू जर्सी भागात भारतासारखी दुकाने सजवलेली आढळतात.

तसेच, लंडन शहरातही दिवाळी खूप मोठ्याने साजरी केली जाते. दिवाळी हा सण प्रामुख्याने हिंदू तसेच, दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे. भारत, गयाना, त्रिनिदाद आणि  टोबॅगो, फिजी, मलेशिया, म्यानमार, मॉरिशस तसेच,  श्रीलंका, सिंगापूर व सुरिनाम या देशांमध्ये दिवाळी  सणानिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.

ऑस्ट्रेलिया या देशातील मेलबर्न याठिकाणी सरकारी खर्चाने दिवाळीचा कार्यक्रम साजरा केला जातो. इ. स. २०१० मध्ये भारत सरकारने या कार्यक्रमाला एक लाख डॉलर हे आनंदाने दिले होते. यामध्ये शहराच्या प्रमुख फेडरेशन चौकात भारतीय संस्कृतीवर आधारीत अनेक कार्यक्रम सादर होतात आणि त्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीचा कार्यक्रम देखील होतो.

दिवाळीनिमित्त प्रतिवर्षी मराठी तसेच अन्य भाषिक साहित्य क्षेत्रात दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. यातील विशेष औचित्यपूर्ण अंकांना पारितोषिकही दिले जाते.

वसुबारस – Vasubaras

आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्स द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) आणि  त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी असा होतो. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हटले जाते. आपल्या भारताची संस्कृती ही कृषिप्रधान असल्याने, या दिवसाचे महत्त्व विशेष आहे.

यादिवशी आपल्या  गावाकडच्या घरांमध्ये संध्याकाळी गाईची तिच्या  पाडसासह पूजा करतात. घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे, या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत सगळीकडे प्रचलित आहे. शिवाय,  ज्यांच्या घरी गुरे, वासरे पाळलेली असतात, त्यांच्याकडे ह्या दिवशी विशेष असा पुरणाचा स्वयंपाक केला जातो.

आपल्या घरातील सवाष्ण बायका या दिवशी गाईच्या पायावर पाणी घालतात, नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात आणि त्यांना नमस्कार करतात.

यानंतर, गाईला आणि तिच्या वासराला निरांजनाने ओवाळून, भारतीय संस्कृतीनुसार केळीच्या पानावर पुरणपोळी, भात, आमटी, पापड असे चविष्ट पदार्थ वाढून, ते गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून महाराष्ट्रातील बहुतांश घरांसमोरच्या अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास देखील असतो.

खासकरून, ह्या दिवशी घरामध्ये कुणी गहू आणि मूग खात नाहीत. संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर घरातील स्त्रिया या बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. खरंतर, ही पुजा आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून केली जाते.

धनत्रयोदशी – Dhanteras Information in Marathi

आश्विन कृष्ण त्रयोदशीस ‘धनत्रयोदशी’ हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक अशी कथा आहे. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये सांगितलेल्या कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा राजपुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने त्याच्या मृत्युआधी जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात.

लग्नानंतरचा चौथा दिवस हा त्याचा मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्‍नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते.

सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी गाऊन आणि गोष्टी सांगून पत्‍नी राजपुत्राला रात्रभर जागे ठेवते. जेव्हा यमराज राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्‍न करतो, तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात.

या कारणास्तव, यमराज आपल्या जगात म्हणजेच यमलोकात परत जातो. अशा प्रकारे, राजकुमाराचे प्राण वाचतात अशी एक आख्यायिका प्रचलित आहे. म्हणूनच या दिवसाला त्या काळापासूनच यमदीपदान असे म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक हे दक्षिण दिशेस करतात आणि त्यानंतर त्या दिव्यास घरातील सर्व माणसे नमस्कार करतात.

असे केल्याने आपल्या घरातील माणसांचा अपमृत्यू टळतो असा यामागे समज आहे. धनत्रयोदशीबद्दल अशीच अजून एक दंतकथा प्रसिद्ध आहे. ती म्हणजे जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली होती आणि त्यावेळी समुद्र मंथनातून धन्वंतरी हा वैद्यराज अमृतकुंभ बाहेर घेऊन आला होता.

म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून, त्याच्या हातातील कमंडलू हा अमृताने भरलेला असतो असा उल्लेख दंतकथेत केला जातो.

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा दिवस मानला गेलेला आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीला देवांचा वैद्य असे मानून त्याची मनोभावे पूजा करतात. यादिवशी घरातील लोकांना प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर देण्याची एक अनोखी  पद्धत आहे.

याला तेलुगूमध्ये गुडोदकम् असे म्हटले जाते. यात खूप मोठा अर्थ दडलेला आहे. धन्वंतरी हा वैद्य अमृतत्व देणारा आहे, हे मुख्यतः त्यातून प्रतीत होते. कडूलिंबाचे पाच-सहा पाने जर रोज खाल्ली, तर व्याधी होण्याचा संभव नाही, अशी काहीजणांची समजूत आहे.

खरंतर, कडूलिंबाचे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्व आहे, म्हणून यादिवशी ‘कडुलिंब आणि साखर’ यांचा एकत्रितपणे केलेला प्रसाद हा धन्वंतरीचा प्रसाद म्हणून सगळयांना देण्यात येतो. यादिवशी सगळीकडे वस्त्रालंकार खरेदी करणे देखील शुभ मानले जाते.

धनत्रयोदशीला उपवास करून घरातले द्रव्य आणि अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ केले जातात आणि कुबेर, विष्णू -लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात. हा दिवस आपल्या भारत देशात ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

जैनधर्मीय लोक या दिवसाला ‘धन्य तेरस’ वा ‘ध्यान तेरस’ असे म्हणतात. भगवान महावीर याच दिवशीच तिसऱ्या आणि चौथ्या ध्यानासाठी  जाण्यासाठी योगनिद्रेत गेले होते. तीन दिवसाच्या योगनिद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या दिवशी निर्वाणप्राप्ती झाली. तेव्हापासून हा दिवस धन्य तेरस या नावाने प्रसिद्ध झाला आहे.

अशा अनेक कथा धनत्रयोदशी या शुभ दिवसामध्ये प्रसिध्द आहेत. खऱ्या अर्थाने, आपल्या भारतीय चालिरितींनुसार यादिवशी घरांघरामध्ये लक्ष्मी देवतेचे पूजन केले जाते आणि आपल्या घरी देवीचा वास कायम रहावा, यासाठी घरातील स्त्रिया उपासना करून देवीला प्रार्थना करतात.

नरक चतुर्दशी – Narak Chaturdashi in Marathi

‘नरक चतुर्दशी’ या सणाशी संबंधित आपल्या भारतामध्ये एका नरकासुर वधाची आख्यायिका प्रचलित आहे. या आख्यायिकेप्रमाणे  यादिवशी श्री. कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले होते आणि त्यांना स्वतंत्र जीवन प्राप्त करून दिले होते. 

खरंतर, श्री. कृष्णाने नरकासुराचा वध करण्याआधी, नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही, असा वर ब्रह्मदेव यांच्याकडून मागून घेतला. त्या वराच्या योगाने नरकासुराने पृथ्वीवरील अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले.

नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याचबरोबर, त्याने सर्व राज्यांतील अगणित संपत्ती लुटली. अश्याच त्याच्या एका हावेपोटी त्याने देवमाता आदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले.

त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व आणि मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी तसेच, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली आणि कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध देखील केला.

नरकासुराच्या वधाने देवादिकांना, तसेच प्रजेला खूप आनंद झाला होता. नरकासुराच्या बंदिवासात असणाऱ्या  कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत स्वतः विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली.

कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस ‘नरक चतुर्दशी’ हा सण साजरा केला जातो. नरक चतुर्दशीच्या यादिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून, आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट केला जातो तर अहंकाराचे उच्चाटन केले जाते.

याशिवाय, आपल्या आत्म्यावरील अहंकाराचा पडदा दूर केला जातो, जेणेकरून मानवांची आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत असतो. यादिवशी अभ्यंगस्नानाचे देखील महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान होय. 

यादिवशी पहाटे यमासाठी नरकात, म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून, पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे. भारतीय वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु इ. ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेऊन त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी.

खरंतर, नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात केली जाते आणि तिचा शेवट सरळ भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्नादिवशी उडवून संपवले जातात.

लक्ष्मीपूजन – Lakshmi Pujan in Marathi

लक्ष्मी पूजन कसे करावे ? खरंतर, आश्विन अमावास्येला दिवाळीच्या सणावेळी भारतात घरोघरी लक्ष्मीपूजन हे केले जाते. यादिवशी प्रदोषकाळी म्हणजेच संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा पूर्वीपासून एक समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे आपल्या घरी लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून स्थिर लग्नावर करतात, जेणेकरून लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते असे मानले जाते.

याशिवाय, अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष ज्याला भारतीय शास्त्राप्रमाणे विक्रमसंवत् असे म्हटले जाते, त्याचेही पूजन लक्ष्मीपूजनानंतर केले जाते.

यादिवशी घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करतात, पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात, त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात आणि त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया तसेच, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे.

हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. यादिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात आणि तिलाच आपल्या घरातील लक्ष्मीचा मान देऊन, तिच्यावर पाणी घालून, हळद-कुंकू वाहून तिला घरात वापरण्यास सुरुवात करतात. केरसुणीने घर स्वच्छ होवून घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्य्र दूर होते असे मानले जाते.

प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु, गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही सगळीकडे पूजा होऊ लागली.

भारतात, विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत, त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत.

काही मूर्तींमध्ये तर कुबेर आणि त्याची पत्‍नी इरिती एकत्र दाखविले आहेत. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्‍नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिस्थापित केले गेले. अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. भारतीय संस्कृतीनुसार तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निर्ऋती या नावांनीही ओळखतात.

निर्ऋती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते, तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे; असे देव मानत असल्याचे उल्लेख आपल्या  दुर्गासप्तशतीमध्ये आहेत. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती’ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्ये आपल्या मनात रुजतात. खरंतर, ही या पूजेची विशेषता आहे.

भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले,  म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी.

गणधर हे यादिवशी त्यांचा दिव्य-ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी आपल्या भारतात पूर्वी जमिनीवर रांगोळी काढली जायची. याशिवाय, पूर्वी भारतातील अनेक ठिकाणी  राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची देखील रांगोळी काढली जायची आणि याच पद्धतीला आज सगळीकडे ‘मांडणे’ असे म्हणतात. या पद्धतीमध्ये घराच्या पूर्व दिशेला किंवा देवघरामध्ये पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात.

बलिप्रतिपदा – Balipratipada in Marathi

आपल्या भारतामध्ये कार्तिक शुद्ध प्रतिपदेस  बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस अनेक भागांमध्ये दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखला जातो. यादिवशी, बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना करतात.

मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. यादिवशी, खासकरून शेतकरी पहाटे स्नान करून,  डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.

आपल्या भारत देशात शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. खरंतर, या शेणाला “शुभा” असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा म्हणजेच बळीराजा ज्याच्या पूजनाचा हा दिवस खूप आनंदाने सगळीकडे साजरा केला जातो.

भारतीय संस्कृतीनुसार खरंतर याचदिवशी ‘विक्रम संवत’ देखील सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा या सणाला नववर्षाची सुरुवात मानतात आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.

व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या, कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी लिहायला सुरू होतात. परंतु, या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा केली जाते. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. प्रत्येकाच्या घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीला औक्षण करते व पती पत्‍नीला ओवाळणी घालतो. 

यामध्ये विशेष म्हणजे नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच “दिवाळसण” असे म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी मुलीकडचे आपल्या जावयास आहेर करतात.

दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. शिवाय, गायी – बैलांना रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणे प्रभू ज्यांना पाठारे प्रभू असेही बोलवले जाते, अशा लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्याभोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल पाळली जाते.

भाऊबीज – Bhau Beej in Marathi

कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भारतीय आख्यायिकेप्रमाणे, यादिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला होता. म्हणून, या दिवसाला “यमद्वितीया” असे नाव मिळाले असे मानले जाते. खरंतर, बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे.

यादिवशी बहिणीच्या घरी तिचा भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. त्यानंतर, भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो.

भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच. याखेरीज, पवित्र भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा देखील होते.  भारतामध्ये हा दिवस कायस्थ समाजाचे लोक  चित्रगुप्ताची जयंती म्हणून खूप उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा करतात.

भाऊबीज हा सण बहीण आणि भावामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, माया आणि जवळीक निर्माण करतो. बहीण-भावांसाठी भाऊबीजेचा हा दिवस खूप विशेष असतो. यादिवशी, प्रत्येक बहीण आपल्या भावाकडून हक्काने भेटवस्तू मागते. खरंतर, प्रत्येक बहिणीसाठी भाऊबीज हा दिवस म्हणजे भावाकडे हट्ट करण्याचा दिवसच असतो.

भावा-बहिणीच्या नात्यासाठी देखील दिवाळीच्या या मोठ्या सणामध्ये एक दिवस असतो तो म्हणजे दिवाळीचा शेवटचा दिवस भाऊबीज. यादिवशी, सगळ्या बहिणी या आपल्या भावाला ओवाळतात व त्याच्या समृद्धीची कामना देवाला करतात. भाऊदेखील आपल्या लाडक्या बहिणीला उपहार देऊन खुश करतात. लग्न झालेल्या मुली देखील या दिवशी आपल्या लाडक्या भावासाठी माहेरी येतात.

जागतिक स्वरूप 

आपण जर जागतिक स्तरावर साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवांकडे पाहिलं तर, आपल्या लक्षात येईल की दिवाळी या सणाला आता जागतिक स्वरूप प्राप्त होत चालले आहे. कारण, जगभरातले भारतीय लोक वेगवेगळ्या देशांतील आपापल्या शहरात दिवाळी सण खूप उत्साहाने आणि अनोख्या पद्धतीने साजरा करतात. 

त्यामुळे, अमेरिका येथे प्रसिध्द असलेल्या न्यू जर्सी या भागात भारतासारखी दुकाने आपल्याला सजवलेली आढळतात. खरंतर, जपान आणि चीन या देशांमध्ये आकर्षक असे दिवाळीच्या उत्साहामध्ये विशेष असणारे आकाशकंदील बनवले जातात, त्याचबरोबर, अन्य देशांमध्येही आकाश कंदिला सोबतच आकर्षक असे वेगवेगळ्या आकाराचे, सुंदर रंगांचे आणि सुरेख नक्षीचे दिवेही बनवले जातात.

दिवाळीच्या दिवशी या देशांमध्ये आकाशकंदील आणि दिवे सगळीकडे लाऊन दिवाळी हा सण साजरा केला जातो. अशा रीतीने, आपल्या अनेक भारतीय सणांना जागतिक पातळीवर उच्च असा दर्जा प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो.

भारतीय दिवाळी – Diwali Chi Mahiti Marathi

खरंतर मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये साजरे केले जाणारे विविध उत्सव आपल्या जीवनात उत्साह घेवून येतात. असाच उत्साह निर्माण करणारा सर्व सणांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला, दिवाळी हा  सण आपल्याला माहितच आहे. हिंदू धर्मामध्ये प्राचीन काळापासून दिवाळी सणाला खूप महत्व आहे.

दिवाळी हा सण हिंदू धर्मामधील जरी प्रमुख सण असला तरी सर्व धर्मातील लोक या सणाला उत्साहाने साजरा करताना आपल्याला दिसतात. कारण, प्रत्येक वयोगटातील व्यक्ती या सणांची आवर्जून वाट पाहत असते. कधी न भेटलेले व्यक्ती दिवाळी या सणाचे अवचित साधून एकमेकांच्या भेटी घेतात.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विचार केल्यास सर्वात जास्त देवाणघेवाण ही दिवाळी सणाच्या काळातच होत असते. या सणात भारतीय लोक हे मोठया प्रमाणात दिवाळीची खरेदी करतात; उदा. सोने, चांदी, मोटार सायकल अशा अनेक गोष्टी खूप उत्साहाने सगळीकडे खरेदी केल्या जातात. एकंदरीत सर्वांसाठीच दिवाळी हा सण एक आनंदचा आणि भरभराटीचा सण असतो.

भारतातील प्राचीन काळापासूनच लोकांचे दिवाळीबद्दल असे मत आहे की, याच दीपावलीच्या  दिवशी भगवान राम यांनी दुष्ट रावणाचा नाश करुन, सीता मातेला त्याच्या तावडीतून सोडून आणले होते व ज्यावेळी त्यांनी अयोध्यामध्ये प्रवेश केला तेंव्हा तेथील जनतेने त्यांचे स्वागत हे दिवे लावून केले होते.

त्यामुळे, त्या काळापासूनच दिवाळीला खरी सुरुवात झाली आहे, असे भारतीय संस्तृतीमध्ये लिखित आहे. शिवाय प्राचीन लोकांचे असे मानने देखील आहे. मित्रहो,  दिवाळीची ओळख ही धर्माचा अधर्मावर विजय अशी केली जाते. दिवाळी निमित्त दरवर्षी मराठी व अन्य भाषाचे साहित्यीक हे आपले नविन आणि विशेष असे  लिखाण सर्वत्र प्रकाशीत करतात.

त्यानिमित्त काही अंकांना पारितोषिक देखील दिले जाते. भारतीय शेयर बाजार हा सोमवार ते शुक्रवार सुरू असतो व इतर सरकारी सुट्टीच्या दिवशी बंद असतो. परंतु, दिवाळीतील लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगसाठी केवळ एका तासासाठी संध्याकाळी शेयर बाजार हा सुरू ठेवला जातो. शिवाय, अनेक विभागातील लोक नव्या उमेदीने या सणानंतर आपल्या कामाला देखील  लागतात.

आपल्या सगळ्यांचा आवडता दिवाळी हा सण एक चैतन्य देणारा सण मानला जातो, ज्या सणाची सुरुवात आपल्या भारतामध्ये झाली होती. या सणाच्या निमित्ताने प्रत्येक भारतीय हा आपापल्या परीने काहीना काही खरेदी करत असतो. खरंतर मित्रांनो, आपण ‍दिवाळीत गोर गरीबांकडून साहित्य खरेदी करुन त्यांना ही दिवाळी आनंदाने साजरी करण्यासाठी मदत केली पाहिजेत.

शिवाय, त्यांच्या आनंदासाठी आपण सर्वांनी एक छोटासा प्रयत्न केला पाहिजेत. महाराष्ट्रातील भाऊबीजेप्रमाणे राजस्थानात आणि भारताच्या उत्तरेकडे राखी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. इकडे आलेल्या जैन समाजातील काहींनी तीच परंपरा कायम ठेवली. काहींनी मात्र इथल्या रीती-रिवाजाप्रमाणे भाऊबीज साजरी करण्यास सुरुवात केली.

त्यातही जैन लोकांच्या काही विशिष्ट समाजांत फक्त भावाकडूनच ओवाळणी ‘वसूल’ केली जात नाही, तर बहीणही भावाला आणि भाऊ विवाहित असेल तर वहिनीलाही भेटवस्तू देत असते. खरंच, दिवाळी सणामध्ये कितीतरी ऐतिहासिक घटना आणि महत्वपूर्ण गोष्टी दडलेल्या आहेत. दिवाळी सण हा  आपणा सर्वांना एकत्र आणतो.

माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून प्रिय वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

– तेजल तानाजी पाटील

बागिलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये diwali information in marathi काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर diwali padwa information in marathi म्हणजेच “दिवाळी” diwali 5 days information in marathi या सणाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा टी योग्य असल्यास आम्ही ते या diwali sanachi mahiti in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि dev diwali information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

4 thoughts on “दिवाळी सणाची माहिती 2023 Diwali Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!