Essay On Elephant in Marathi – Essay on My Favourite Animal Elephant in Marathi माझा आवडता प्राणी हत्ती, हत्ती निबंध मराठी मित्रहो, हत्ती म्हटलं की आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर बलाढ्य आकाराचा आणि काळपट अथवा राखाडी अशा रंगाचा जाडसर प्राणी लगेच उभा राहतो. शिवाय, आपण अगदी लहान मुलाला जरी विचारलं की हत्ती कसा असतो? तर मित्रांनो, ते लहान मुलंदेखील आपल्याला अगदी अशाच प्रकारचं हत्तीचं वर्णन सांगेल, हे मात्र नक्की ! अशा प्रकारे, हत्ती हा जमिनीवर वास्तव्य करणारा, सर्वांत मोठा आणि शक्तिशाली असा प्राणी आहे. तसं पहायला गेलं तर संपूर्ण प्राणिसृष्टीत केवळ काही देवमासे हे हत्तीपेक्षा मोठे आहेत.
याखेरीज, हत्ती हा प्राणी आपल्या एकूण प्राणिसृष्टीमध्ये सर्वांत उंच असणाऱ्या जिराफानंतर येणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत उंच प्राणी देखील आहे. इतर सर्व प्राण्यांपेक्षा ‘लांब सोंड’ हे हत्तीचे आगळे वेगळे असे वैशिष्ट्य असून तो आपल्या सोंडेचा वापर हातासारखा करतो, म्हणून त्याला संस्कृतमध्ये हस्तिन् असे म्हटले जाते. शिवाय, जसजशी हत्तीच्या शरीराची वाढ होते, त्याप्रमाणे हत्तीचे ओठ आणि नाक पुष्कळ लांबट होते आणि अखेर त्यापासून सोंड तयार होते.
हत्ती निबंध मराठी – Essay On Elephant in Marathi
माझा आवडता प्राणी हत्ती – Essay on My Favourite Animal Elephant in Marathi
खरंतर, हत्तीच्या या अवयवांखेरिज त्याचे सुपासारखे सपाट कान हे सर्व प्राण्यांमध्ये खूप मोठे आहेत. त्याचबरोबर, त्याचे सुळेदेखील सर्व प्राण्यांच्या दातांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक लांब आणि अधिक मजबूत आहेत. मित्रहो, सगळ्यांत महत्वाचा हत्तीचा अवयव म्हणजे संपूर्ण शरीराचे प्रचंड वजन पेलणारे त्याचेे भक्कम पाय होय, जे दिसायला एखादया जाड खांबासारखे असतात.
तसेच, त्याचे डोके सुद्धा प्रचंड मोठ्या अशा आकाराचे असते. परंतू, शरीराच्यामानाने हत्तीच्या डोक्यातील मेंदू मात्र खूप लहान असतो. याखेरीज, हत्तीचा रंग हा करडा, तपकिरी अथवा काळपट असतो आणि त्याच्या शरीरावरील केस हे अत्यंत विरळ व राठ प्रकाराचे असतात.
मित्रांनो, आश्चर्याची बाब म्हणजे आशियाई भागांतील काळपट रंगाचे हत्ती सोडल्यास, थायलंड आणि म्यानमार यांसारख्या प्रदेशांमध्ये अगदी क्वचित प्रमाणात पांढरे हत्ती सापडतात.
तसेच, या हत्तींचा रंग भुरकट पांढरा असून, त्यांच्या कानाकडील भाग तसेच, त्यांची बहुतांश त्वचा ही फिकट गुलाबी अशा रंगाची असते. त्यामुळे, या प्रदेशांतील हत्ती खूप आकर्षक आणि सुंदर दिसतात. यांशिवाय, कित्येक हत्ती अनेक वेळा वने, घनदाट जंगले, गवताळ प्रदेश आणि रुक्षवने म्हणजे सॅव्हाना यांसारख्या ठिकाणी आढळतात.
- नक्की वाचा: हत्तीची संपूर्ण माहिती
पण मित्रहो, जरी त्यांचे अस्तित्व यांसारख्या ठिकाणी जास्त आढळून येत असले तरी, त्यांचे अधिवास म्हणजे स्वाभाविक निवास मात्र वाळवंटे, दलदली तसेच आशिया आणि आफ्रिका खंडांमधील उष्ण व उपोष्ण प्रदेशांतील डोंगराळ प्रदेश अशा वेगवेगळ्या ठिकाणी आढळून येते. अशा प्रकारे, आपल्या पृथ्वीवरील हत्ती हा विशालकाय देह असलेला; एक शाकाहारी प्राणी आहे.
आपल्या भारत देशात उत्तरप्रदेश, आसाम, कर्नाटक, ओरिसा, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये हत्ती हा प्राणी मोठया प्रमाणावर आढळून येतो. याखेरीज, हत्तीची उंची ही साधारणतः सव्वातीन ते साडेतीन मीटर इतकी असते.
एकंदरीत, काळा अथवा करडा रंग, लांब सोंड, भले मोठे व भक्कम असे खांबासारखे पाय, पसरट असे सुपासारखे कान आणि अगदी बारीक डोळे यांवरून हत्ती हा प्राणी सगळीकडे ओळखला जातो. मित्रहो, आपण सर्वांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजेत की भारतीय हत्तींमध्ये फक्त नर हत्तीलाच एवढे मोठमोठे सुळे असतात, तर दुसरीकडे मादी हत्तिणीला अजिबात सुळे नसतात.
प्राण्यांचा सखोल अभ्यास करणाऱ्या अनेक प्राणी अभ्यासकांच्या निरीक्षणावरून असा निष्कर्ष समोर आला आहे की काहीवेळा अगदी कमी प्रमाणात एखाद्या नर हत्तीला सुद्धा सुळे नसतात. त्यामुळे, सुळे नसलेल्या अशा प्रकारच्या नराला ‘माखना’ असे म्हटले जाते.
परंतू, आफ्रिकेत सापडणाऱ्या नर हत्तीला आणि मादी हत्तिणीला मात्र मोठमोठे सुळे असतात. याखेरीज, आपल्या भारतीय हत्तीची पाठ फुगीर असते, तर दुसरीकडे आफ्रिकन हत्तीची पाठ खोलगट असते.
खरंतर, हत्तीचे शरीर हे इतके अवाढव्य असते की त्याच्या शरीराचे वजन जवळजवळ पाच ते सहा टन एवढे असते. हत्ती हा प्राणी पाण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे पोहू शकतो. शिवाय, इतर जंगली प्राण्यांच्या बुद्धीची हत्तीच्या बुद्धिशी तुलना केली तर आपल्याला दिसून येईल की, इतर जंगली जनावरांपेक्षा हत्तींना सर्वांत जास्त बुद्धी असते.
खरंतर, याच कारणामुळे हत्तींना चांगल्या पद्धतीने शिकवले जाते आणि त्यांच्याकडून अनेक प्रकारची कामे करवून घेतली जातात. परंतू, यासाठी हत्तीचे छोटे बछडे पकडून त्या बछड्याला त्याच्या लहानपणापासूनच शिक्षण द्यावे लागते.
मित्रहो, आपल्याला माहीत आहे की जंगलामध्ये लाकडे कापण्याच्या अनेक गिरणी असतात आणि या गिरणींमध्ये मोठमोठी झाडे कापून, त्यांपासून लाकडाचे ओंडके बनवले जातात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या गिरणींचा आणि लाकडाचा हत्तीशी काय संबंध आहे? तर मित्रांनो, शिकवलेले हत्ती हे ओंडके सोंडेत धरून किंवा पायाने ढकलत ढकलत गिरणीपर्यंत वाहून नेतात.
- नक्की वाचा: माझा आवडता पक्षी पोपट निबंध
याशिवाय, काही वेळेला ढकलत आणलेले लाकडाचे ओंडके ते नदीच्या पाण्यामध्ये देखील टाकतात. अशा पद्धतीने ते ओंडके नदीच्या पाण्याबरोबर एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर अथवा पाण्याच्या प्रवाहाबरोबर सलगपणे वाहत जातात. याखेरीज, शिकवलेले हत्ती मोठमोठ्या साहित्यांच्या किंवा जड वजनाच्या गाड्या सुद्धा ओढतात.
विशेष म्हणजे पूर्वीच्या काळी हत्तींचा उपयोग युद्धांमध्ये तसेच, मोठमोठ्या लढाईंमध्ये देखील होत असे. पूर्वीच्या काळातील राजे हत्तींवर बसून आपल्या शत्रूंशी युद्ध करायचे.
मित्रहो, आपण आपल्या प्राचीन इतिहासात थोडेसे डोकावून पाहिले तर आपल्या लक्षात येईल की पूर्वीच्या काळी हत्तीच्या पाठीवर अंबारी बांधली जायची आणि त्यात राजे-महाराजे, समाजातील उच्च लोक अथवा श्रीमंत लोक प्रवास करायचे. त्याचबरोबर, तत्कालिन काळात हत्तीच्या अंबारीतून विविध मिरवणुका देखील काढल्या जायच्या.
परंतू, आजच्या विज्ञानाच्या युगात हत्तींना लहानपणापासून शिकवून त्यांना सर्कशीत सामील केले जाते आणि संबंधित सर्कसमध्ये त्यांच्याकडून अनेक प्रकारची कामे करवून घेतली जातात. मित्रहो, आपणा सर्वांना माहीत आहे की हत्तीचे दात हे खूप मौल्यवान आणि बहुमोल समजले जातात. त्यामुळे, हत्तीचा मृत्यू झाल्यावर पहिल्यांदा त्याचे दात काढले जातात, ज्यांना शुद्ध भाषेत ‘हस्तिदंत’ असे म्हटले जाते.
खरंतर, या हस्तिदंताना खूप मागणी असते. कारण, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, दागिने ठेवण्याच्या पेटया, शोभेच्या वस्तू, पेपरवेट, फुलदाण्या, बांगडया, बटने, खेळणी आणि आकर्षक अलंकार अशा अनेक प्रकारच्या वस्तू हत्तीच्या हस्तिदंतापासून तयार करता येतात.
मित्रहो, हत्ती हा प्राणी जंगलामध्ये कळपाने राहतो आणि त्यांच्या एकेका कळपामध्ये साधारणतः सात-आठपासून ते वीस-पंचवीसपर्यंत इतक्या संख्येने हत्ती असतात. शिवाय, एका कळपात प्रामुख्याने दोन ते तीन मोठ्या माद्या आणि त्यांची लहान-लहान पिल्ले असतात. आश्चर्याची बाब म्हणजे या कळपात नर हत्ती अजिबात नसतात.
खासकरून, हत्तींच्या कळपामध्ये मध्यम वयाची जास्त पिल्ले असतात आणि किंबहुना कधीतरी अगदी लहान बछडे देखील या कळपात असते. शिवाय, या कळपाचे नेतृत्व म्हाताऱ्या आणि अनुभवी अशा मादीकडे दिलेले असते आणि या मादीच्या आज्ञेत संपूर्ण कळप कार्य करत असतो. दुसरीकडे, जास्तीत जास्त तीन-चार नर एकत्र येऊन कंपू करून राहतात.
- नक्की वाचा: माझा आवडता प्राणी निबंध
शिवाय, वयात आलेले नर आणि वयात आलेली मादी दोघेही ठराविक हंगामात मदावर अथवा माजावर येतात. त्यामुळे, त्यांना ‘मदमस्त’ किंवा ‘मस्त हत्ती’ असे म्हटले जाते. मित्रहो, हा मदमस्त हत्ती यावेळी भरपूर बेभान बनतो. हत्तीच्या डोक्याला दुसऱ्या भाषेत गंडस्थळ असेही म्हटले जाते. अशा प्रकारे, मदमस्त हत्तीच्या गंडस्थळातून पातळ असा द्रवरस वाहू लागतो, ज्याला मद असे म्हटले जाते.
शिवाय, माजावर आलेले हत्ती अनेक वेळा विनाकारण मोठमोठे वृक्ष मुळासकट उपटून जोरात फेकून देतात. त्यामुळे, मित्रहो माजावर आलेल्या हत्तींच्या तावडीत कोणी सापडल्यास त्याची काही धडगत नसते, हे मात्र नक्की! त्यामुळे, अशा हत्तींपासून आपण कायम सावध राहिले पाहिजेत. अशा प्रकारे, मदमस्त असलेला हत्ती काही काळ लोटल्यावर म्हणजेच त्याचा मद ओसरल्यावर अगदी पूर्वीप्रमाणे शांत बनतो.
तेजल तानाजी पाटील
बागीलगे, चंदगड.
आम्ही दिलेल्या essay on elephant in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता प्राणी हत्ती निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या short essay on elephant in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on my favourite animal elephant in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Maza avadta prani Hatti Marathi Nibandh Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट