जागतिक मराठी भाषा दिन भाषण Marathi Diwas Speech in Marathi

माझ्या मराठी भाषेची काय सांगू महती,

सातासमुद्रापार आहे हो तिची ख्याती!

भाषा वैभवात ती आहे हो जगती महान !”

Marathi Diwas Speech in Marathi Marathi Day Speech in Marathi मराठी भाषा दिन भाषण सौजण्यपूर्ण मराठी महाराष्ट्रात जन्म माझा झाला! सांगावे या विश्वाला! सांगावे या विश्वाला! आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर, आजच्या मनोवेधक कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आयोजक यांचे मी पहिल्यांदा आभार मानते. कारण, या सर्वांमुळे मला याठिकाणी माझ्या मातृभाषेबद्दल बोलण्याची सुवर्णसंधी मिळाली. खरंतर मित्रांनो, कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा आपल्या महाराष्ट्रात ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा होतो. खरंतर, त्याला आता बरीच वर्षे झाली.

आपण सर्व महाराष्ट्रीयन वर्षातून एकदा मराठी भाषा दिवस साजरा करून जगाला हे सांगत असतो की, ‘मराठीचा आम्हाला विसर पडला आहे. इत:पर हिचे पांग आम्ही फेडू शकत नाही. एक जिवंत भाषा म्हणून तिच्या संवर्धनाचा, आधुनिकीकरणाचा वसा आम्ही टाकून दिला आहे. भाषा दिन साजरा करणे, केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे अशा गोष्टी प्रतीकात्मक असल्या तरीदेखील या गोष्टी आमच्या आवाक्यातील आहेत.

 marathi diwas speech in marathi
marathi diwas speech in marathi

जागतिक मराठी भाषा दिन भाषण – Marathi Diwas Speech in Marathi

मराठी भाषा दिन

इंग्रजी भाषेप्रमाणे सर्व प्रकारचे व्यवहार मराठीतून करणे, त्यासाठी मराठी माध्यमातूनच विद्यार्थ्यांनी शिकणे आणि शिक्षकांनी त्यांना शिकवणे हे आम्हाला जमणार नाही. आम्हाला स्वत:ची प्रगती करायची आहे; स्वभाषेची नव्हे. अख्ख्या जगाने समृद्ध केलेली इंग्रजी हीच आमच्यासाठी ज्ञानभाषा व उद्याची लोकभाषा आहे.’

अर्थात, मी जे आता बोलले ते आपण कुणीही बोलून दाखवत नाही. कारण, तसे करणे औचित्याला धरून नाही किंवा पोपट मेला असे सांगण्याचे धैर्य आपणा कुणापाशिही नाही.

त्यापेक्षा एखादा दिवस मराठीच्या विकासासाठी एकमेकांना शुभेच्छा देणे हे आपल्या उत्सवप्रियतेला व दांभिकपणाला शोभणारे आहे. मराठीसंबंधी असे कटू पण स्पष्ट बोलणे अनेकांना आवडणार नाही. पण ते काम कोणीतरी केलेच पाहिजे. अन्यथा, आपला इतिहास आपल्याला माफ करणार नाही.

आजकाल तर, मराठीबाबतचे भ्रम जोपासत आपण येणाऱ्या पिढ्यांचे आणि विशेषत: तळागाळातील समाजाचे अपरिमित नुकसान करीत आहोत. यापुढे ज्यांना मराठीतून आपापली उपजीविका साधायची आहे, त्यांना मराठीचे येत्या ३०-४० वर्षांतले चित्र काय असणार हे स्पष्टपणे सांगायला हवे. मित्रहो, स्वभाषेच्या वापराचा अलिखित करार आम्ही व्यक्तिगत स्वार्थासाठी कधीच मोडला आहे.

त्यामुळे, यापुढे जे लोक त्याचे पालन करतील त्यांना पश्चात्ताप करावा लागेल. रांगेचा फायदा हा सर्वांना होतो. पण कधी? ज्यावेळी सर्वजण रांगेत उभे राहण्याच्या नियमांचे पालन करतात तेंव्हा.

आपल्या मराठी भाषेचेही अगदी तसेच काही आहे. भाषेचा विकास हा सर्वांनी एकत्रितपणे मिळून आणि सातत्याने करण्याने होत असतो. हा दीर्घकालीन आमूलाग्र बदल दोन-चार आपल्या लोकांनी किंवा मनाला वाटले म्हणून कुणीही  कधीतरी करायचा बदल नाही, हे आपण सर्वांनी सगळ्यात आधी ध्यानात घेतले पाहिजेत.

आता आपण सर्वांनी हे जाहीरपणे स्वीकारायला हवे की, मराठी ही आपली मातृभाषा कधीच ज्ञानभाषा होऊ शकणार नाही. जी भाषा शिक्षणाची माध्यमभाषा म्हणून टिकू शकत नाही ती ज्ञानभाषा कशी होणार? आणि जी भाषा ज्ञानभाषा नाही ती भाषा जागतिकीकरणाच्या, भाषिक ध्रुवीकरणाच्या काळात सुरक्षित तरी कशी राहणार?

सर्व प्रकारच्या शिक्षणाचे माध्यम असणे म्हणजे भाषेची मुळे जिवंत, सशक्त असणे होय. पण ती मेली की भाषेचा वृक्ष मग तो कितीही पुरातन असो, तो उन्मळून पडणारच! शेकडो वर्षांची परंपरा असलेली भाषा मरायला अनेक दशके, शतके लागतात.

पण मित्रांनो, आपण हे लक्षात न घेतल्यामुळे आपली मराठी भाषा मृत्युपंथाला लागलेली असतानाही, अनेक  निजभाषकांचा यावर विश्वास बसत नाही. मराठीच्या अस्तित्वाबाबतही मराठी समाजामध्ये भ्रममूलक वातावरण आहे. ते दूर करून आपण नवीन पिढीला मराठी भाषेबद्दलचे सत्य सांगितले पाहिजे आणि मराठीबाबत वास्तववादी व निर्णायक भूमिका घेतली पाहिजेत.

आता हा प्रश्न आपण सर्वांनी भावनिक पातळीवर हाताळण्यात काही एक अर्थ आहे, असे मला मुळीच वाटत नाही. मराठीचा प्रश्न हा भावनात्मक, सांस्कृतिक प्रश्न आहे आणि तो मराठी भाषेविषयी उत्सवी जनजागरण करून सोडवता येईल ही एक अंधश्रद्धा होती हे एव्हाना सिद्ध सुद्धा झाले आहे. मराठी भाषेचा प्रश्न हा मूलत: आर्थिक क्षेत्रातील प्रश्न आहे.

प्रत्येक समाजाला आपल्या स्वभाषेविषयी प्रेम असते. पण, ते प्रेम ती भाषा जगण्याला उपयोगी पडते व भौतिक प्रगतीच्या आड येत नाही तोवरच कार्यरत असते असे आपल्याला म्हणता येईल.

आपण आपली भाषा सोडतो ती अन्य भाषेविषयी प्रेम वाटते म्हणून नव्हे, तर आपली भाषा आपणास समाजामध्ये जगत असताना आर्थिक संधी पुरवण्यात कमी पडते म्हणून. इंग्रजीविषयी आपल्या समाजात प्रेमाऐवजी वासाहतिक द्वेषाची भावना होती,  तरीही आपण सर्वजण तिला शरण गेलो.

कारण, आपले पहिले प्रेम हे तिच्या वापरामुळे मिळणाऱ्या पैशांवर व त्यातून मिळणाऱ्या सामाजिक प्रतिष्ठेवर आहे. उद्या आर्थिक संधी पुरवण्याच्या बाबतीत इंग्रजीची जागा दुसऱ्या एखाद्या भाषेने घेतल्यास आपण तिचा देखील स्वीकार करू; हे तितकेच कटू सत्य आहे. इंग्रजी या भाषेचे वर्चस्व असलेल्या देशांत जाऊन, आपण तेथील भाषा निमूटपणे शिकायला तयार होतो.

कारण, आपल्याला आपल्या भौतिक प्रगतीशी देणेघेणे असते. अशा स्थितीत जिच्याविषयी आपणास आंतरिक प्रेम असते त्या आपल्या निजभाषेला आपण ‘स्लीप मोड’ वरती ठेवून परकीय पण, प्रगतीच्या अशा भाषेला आपण ‘अ‍ॅक्टिव्ह मोड’ वर आणतो.

खरंतर, आपणा सर्वांचे स्वभाषेविषयीचे असणारे आपले प्रेम कधीही मरत नाही; ते फक्त भावनिक, प्रतीकात्मक पातळीवर राहते. पण मित्रांनो, हे सर्व अटळ आहे का? तर अजिबात नाही. आपण आपली मराठी भाषा आर्थिक संधींची, सामाजिक प्रतिष्ठेची करू शकत नाही का? अवश्य करू शकतो.

पण, त्यासाठी आधी सांगितल्याप्रमाणे सर्वांचेच हात या कार्यामध्ये लागले पाहिजेत, जे आता आपण पाहिलं तर शक्य दिसत नाही. मित्रांनो, आपणा सर्वांचा जन्म ज्यादिवशी महाराष्ट्रात झाला त्यावेळीच आपल्या नशिबात मराठी भाषा बोलण्याचे भाग्य हे लिहले गेले. पण, आपल्याला मिळालेल्या या भाग्याचा आपण सर्वजण आदर करतो का? तर, नाही.

आपल्या महाराष्ट्रीयन संतांनी आपल्या मराठी भाषेच्या मधूर वाणीचे महत्व त्यांच्या कित्येक ओव्यांतून, त्यांनी लिहलेल्या अभंगातून आणि भारुडांमधून व्यक्त करून सर्व जणांना ज्ञात केले. ज्ञानेश्वरांनी आपल्या महाराष्ट्रातील लोकांपर्यंत ज्ञानेश्वरीमध्ये लिहलेले विचार पोहोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ मराठी भाषेत लिहला.

याशिवाय, संत तुकाराम महाराजांनी लिहलेली गाथा देखील आपल्याला मराठीमध्ये उपलब्ध असलेली दिसून येते.

मराठी भाषा दिन कविता – Marathi Diwas Poem

ज्ञानेश्वरांनी लिहीली ज्ञानेश्वरी,

तुकोबांनी रचली गाथा.

समृद्ध संपन्न झाली,

माझी मराठी भाषा.”

आपल्या मराठी भाषेला काहीही झालेले नाही आणि भविष्यात देखील मराठी भाषेला काहीही होणार नाही, असा एक भ्रम मराठी भाषा दिनाला हमखास सगळीकडे पसरवला जातो. परंतू, हा भ्रम आपल्या मराठी भाषेच्या विकासासाठी अधिक धोकादायक आहे.

हे खरे आहे की, मराठी भाषेला आज जो दर्जा प्राप्त झाला आहे त्याला मराठी भाषा जबाबदार नाही, तर मराठी भाषा बोलणारे आणि मराठी भाषा ज्ञात असणारे मराठी भाषक जबाबदार आहेत. मित्रांनो, भाषा ही कधीही मरत नाही; फक्त त्या भाषेचे भाषक हे मरत असतात.

गेल्या दोन-तीन दशकांत हजारो-लाखो मराठी ‘भाषक’ मेले; आता तुम्हाला शंका येईल की हे भाषक मेले म्हणजे नेमके काय झाले? तर मित्रांनो, या सर्व भाषकांनी आपल्या मराठीचा त्याग केला. खरंतर, आपल्यापैकी अनेकांना महत्त्वाच्या अशा व्यवहार क्षेत्रांत मराठी भाषा वापरण्याची लाज वाटते. त्यांना ते अपराधीपणाचे वाटते.

आपण सर्वजण  मराठीचा जयजयकार करीत आपल्या नंतरच्या पिढ्यांना मराठीपासून प्रयत्नपूर्वक तोडले आहे. जणू हे पाप लपवण्यासाठीच आज आपण मराठीला काहीही झालेले नाही, हे एकमेकांना सांगत आहोत. मित्रांनो, मराठी ही मृत्युपंथाला लागलेली भाषा आहे असे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी पाऊणशे वर्षांपूर्वी सांगितले होते.

१९६० नंतर म्हणजेच मराठी भाषेचे राज्य स्थापन झाल्यानंतर ती स्थिती बदलण्याची आपल्याला संधी होती; पण मराठी भाषेला काही झालेले नाही या भ्रमात राहणे आपण पसंत केले. हा भ्रम मराठी साहित्यिकांनी विविध वाङ्मयीन व्यासपीठांवरून सर्वदूर पसरवला.

सासवड मुक्कामी नुकत्याच पार पडलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे हे एका मुलाखतीत म्हणाले की, ‘जोवर कीर्तनं रंगतायेत, भजनं घुमतायेत, वारकरी आहेत तोवर तरी मराठीची काळजी करावी असं मला अजिबात वाटत नाही.

पण, इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा उगाच बाऊ करण्यात देखील काही एक अर्थ नाही. आजच्या या तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या काळात आपणा सर्वांना इंग्रजीची उत्तम जाण हवीच आणि शाळा जरी इंग्रजी असली तरी घरी मराठीचे संस्कार करता येतातच की. त्यात काय अडचण आहे?

त्यामुळे मराठीचे भवितव्य उत्तम आहे. त्याबाबत चिंता नसावी.’ व्वा रे व्वा! प्रत्यक्षात स्थिती काय आहे? याकडे मात्र कुणीही पाहत नाही. आज महाराष्ट्रात जास्तीत जास्त ठिकाणच्या मराठी शाळा बंद पडताहेत. या परिस्थितीत ज्या शाळा चालू आहेत त्यांची रवानगी  मराठीकडून सेमी-इंग्रजीकडे आणि कालांतराने पूर्ण इंग्रजी माध्यमाकडे वाटचाल सुरू आहे.

आपल्या मराठी माध्यमाच्या महाविद्यालयांना प्रौढ मुलांच्या पाळणाघरांची किंवा शरणार्थीसाठी बनवलेल्या छावण्यांची अवकळा आली आहे. आज मराठीची बाजारपेठ कुठे आहे? खूप कष्ट करून पैसे मिळवावेत, पण बाजारात खरेदी करायला गेल्यावर ते चालू नयेत अशी स्थिती आज मराठीच्या उच्च शिक्षणाची झाली आहे.

यामध्ये, अभिजन वर्गाने तर मराठी भाषेवर कधीच फुली मारली होती. आता बहुजन वर्गानेही त्याच मार्गाने जायचे ठरवले आहे. परिणामी, भाषावृद्धीसाठी अत्यावश्यक असलेली दोन पिढ्यांमधील भाषिक संक्रमणाची प्रक्रियाच बाधित व अवरुद्ध झाली आहे.

मराठी भाषा ना व्यावहारिक संधी देऊ शकते आणि नाही सामाजिक प्रतिष्ठा, मग ती शिकून करायचे तरी काय? असा प्रश्न जर आजच्या करिअरच्या मागे लागलेल्या युवा पिढीला पडला तर नवलच आहे म्हणा! ज्यांना मराठीची स्थिती वाईट आहे हे मान्य आहे, त्यांच्या मनामध्ये नेमके काय बदल केले म्हणजे ही स्थिती बदलेल याविषयी माझ्या मनात काही भ्रम आहेत.

मराठीच्या ऱ्हासाला आपण सर्वजण  जबाबदार आहोत आणि आपण सर्वांनी मिळून जर मराठी भाषेला प्रथम प्राधान्य द्यायचे ठरवले तर ही स्थिती कुठंतरी बदलू शकते, असे अनेकांना वाटते. परंतु मराठीच्या अशा दुरावस्थेला नेमके कोण, कशा प्रकारे व किती प्रमाणात जबाबदार आहे? याच्या खोलात मात्र आपण कुणीही शिरत नाही.

मराठीचा विकास ही सामूहिक जबाबदारी आहे. परंतू असे असले तरी व्यक्तिगत व संस्थात्मक पातळीवर तिचे उत्तरदायित्व आपण कधी निश्चित केले आहे काय? मुळात भाषेचा ‘विकास’ म्हणजे काय? हेच आपल्याला माहीत नसेल तर आपण भाषेची प्रगती करणार म्हणजे आपण नेमकं काय करणार?

शिवाय, भाषाविकासाच्या कामात सरकारला काही भूमिका असते काय? रस्ते, पाणी, वीज यांचे नियोजन, नियंत्रण हे सरकारचे काम आहे हे आपणास पटते. पण सार्वजनिक भाषेची दुरावस्था झाली तर तो राजकीय मुद्दा होत नाही असे आपले सरकार मानते. उलट अशाप्रकारे जर एखाद्या भाषेची दुरावस्था झाली तर ही दुरावस्था म्हणजे सामूहिक आत्मक्लेश ठरू शकते.

वास्तविक पाहता, भाषेबाबत लोकभावना लक्षात घेऊन तिच्या वापराबाबत धोरण ठरवणे, तिची वापरक्षेत्रे निश्चित करणे, सक्ती आणि संधी यांच्याद्वारा तिच्या वापराच्या प्रेरणा निर्माण करणे, तिचे नियोजन व नियमन करणे हे आपल्या देशाच्या सरकारचे काम आहे.

सरकारने स्वत: उद्योग करू नयेत हे खरे, पण लोकांनी उद्योग करावेत म्हणून जशा पायाभूत सुविधा पुरवल्या पाहिजेत तशाच भाषेच्या वाढीसाठी आणि तिच्या प्रगतीसाठी, भाषिक यंत्रणा देखील प्रस्थापित केल्या पाहिजेत. याशिवाय, आपल्या भारत सरकारने  कोणी काय करायला पाहिजे हे देखील निश्चित करायला हवे.

भाषेचा विकास ही व्यक्तिगत किंवा स्वेच्छाधीन बाब असू शकत नाही, म्हणूनच तर सरकारनामक शिखर संस्थेला त्या कामी प्रमुख भूमिका पार पाडावी लागते हे जगात इतरत्र घडताना आपण पाहतो, परंतु आपले सरकार मात्र याबाबतीत  स्वतःची भूमिका टाळताना आपल्याला दिसत आहे.

शिवाय, आपल्या भारतीय लोकांनाही भाषानिवडीचे स्वातंत्र्य हवे असते. खरंतर, स्वभाषा हे अनेकांच्या बाबतीत आता मूल्यच राहिलेले नाही. जे लोक मराठीच्या प्रेमापोटी, निष्ठेपायी कर्तव्यभावनेने मराठीचा वापर करताहेत, इतरांकडेही आग्रह धरताहेत त्यांना संकुचित, प्रतिगामी, फुटीरतावादी ठरवले जात आहे.

आपल्या समाजामध्ये काही थोडे लोक असे आहेत जे मराठी बाबतच्या आपल्या निष्ठा, वाटेल ती व्यावहारिक किंमत मोजून शाबूत ठेवून आहेत. परंतू, अशा लोकांना पुढच्या काळात मात्र मराठी भाषेपासून दूर जावे लागेल हे तितकेच खरे. कारण अशा लोकांना मराठी भाषेच्या वापरासाठी समाजातून तर पाठिंबा मिळणार नाहीच, पण त्यांच्या घरातूनही त्यांना पाठिंबा मिळणार नाही.

मित्रांनो, नग्न लोकांच्या वसाहतीत जेव्हा चार-दोनच लोक कपडे घालतात, तेंव्हा त्यांना समाजाकडून वेड्यात काढले जाते. अशा वेळी या लोकांना स्वत:चे देखील वस्त्रहरण करून घेण्याशिवाय त्यांच्यापुढे कोणताही पर्याय नाही उरत.

अशाचप्रकारे, आज आपल्या समाजात देखील जेंव्हा बोटांना मोजण्यायोगी लोक मराठी भाषेच्या विकासासाठी, तिला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आणि तिचा सर्व भाषांमधील दर्जा राखून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात, तेंव्हा समाजातील विकृत प्रवृत्तीची लोक त्यांना त्यांच्या कामापासून परावृत्त करतात आणि नाईलाजाने भाषेच्या जतनासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना देखील आपले हे भाषेबद्दलचे कार्य थांबवावे लागते.

खरंतर मित्रांनो, मराठी भाषा गौरव दिन हा महाराष्ट्रात सगळीकडे ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आपल्या मराठी भाषेचा हा उत्सव  दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. प्रसिद्ध आणि नामांकित असे कवी कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम देखील घेतले आहेत.

आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा आपल्या भारत सरकारने दिनांक २१ जानेवारी २०१३ रोजी निर्णय घेतला होता.

याशिवाय मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की १ मे १९६० ला आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या कालावधीत यशवंतराव चव्हाण हे स्वतंत्र महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री होते.

मित्रहो, आपल्या महाराष्ट्र राज्याची अधिकृत राजभाषा ही  मराठी असेल असे जाहीर करणारा ‘मराठी राजभाषा अधिनियम १९६४’ सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आणि १ मे १९६६ पासून तो अंमलात आणण्यात आला.

प्रत्येक माणसाच्या घरामध्ये बोलली जाणारी भाषा अथवा कोणत्याही व्यक्तीच्या जन्मापासून त्या व्यक्तीला प्राप्त झालेली प्रथम भाषा म्हणजे आपली मातृभाषा होय. मित्रांनो, आपली मातृभाषा ही प्रत्येक व्यक्तीच्या जन्मापासून उघड झालेली भाषा आहे. आपल्या भारत देशातील मातृभाषांची संख्या ही जवळपास १६५२ इतकी आहे.

त्यातील आपली मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी भाषा ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी भाषा ही आपल्या   महाराष्ट्र राज्याची अधिकृत अशी भाषा, तर गोवा या   राज्याची सहअधिकृत भाषा आहे.

आपल्या भारत देशाच्या २०११ च्या जनगणनेनुसार, भारत देशात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी इतकी आहे. यामध्ये, मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी तर, भारतातील तिसरी भाषा आहे.

मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे ते एक  आधुनिक रूप आहे. आपल्या मराठी भाषेचा गौरव  संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्यातून ही केलेला दिसून येतो. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून त्याला वेगळे असे महत्त्व प्राप्त झालेले आहे.

त्याचबरोबर, आजतागायत आपल्या मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामध्ये सातत्यपूर्ण रीतीने रोज भर देखील पडत आहे. मराठी भाषा ही मुख्यत्वे भारताच्या महाराष्ट्र राज्यात सर्वांत जास्त बोलली जाते.

त्याचबरोबर गोवा, उत्तर कर्नाटक (बेळगांव, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, बिदर, कारवार), गुजरात (दक्षिण गुजरात, सुरत, बडोदा व अहमदाबाद), आंध्रप्रदेश (हैदराबाद), मध्यप्रदेश (इंदूर, ग्वाल्हेर), तामिळनाडू (तंजावर) व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागांमध्ये देखील आपली मराठी भाषा बोलली जाते.

भारत देशातील ३६ राज्ये आणि जगातील ७२ देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. इतरही अनेक देशांमध्ये मराठी भाषा बोलण्याचे प्रमाण नियमितपणे  वाढत आहे. मराठी भाषा ही आपल्या भारत देशासह फिजी, मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते.

त्याचबरोबर, जगभरात विखुरलेल्या मराठी भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर जर्मनी, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांतही आपली मराठी भाषा ही बऱ्यापैकी बोलली जाते. मित्रांनो, आपल्या मराठी भाषेचे वय हे साधारणपणे १५०० वर्ष इतके मानले जाते.

या काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा सतत बदलत राहिली. शिवाजी महाराजांचा काळ इ.स. १६०० ते इ.स. १७०० असा आहे. या काळात मराठी स्वराज्याची स्थापना झाल्याने, मराठी भाषेवरील फारसी शब्दांचे आक्रमण हे यावेळी थंडावले गेले.

असे मानले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांस राज्यव्यवहार कोश बनवताना, फारसी भाषेऐवजी संस्कृत शब्द वापरण्याची योजना करण्यास सांगितले. याच काळात मराठी भाषेला राज्य मान्यतेसोबत संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्यामुळे महाराष्ट्रात लोकमान्यताही मिळू लागली.

मुक्तेश्वर, वामन पंडित यांनीही मराठी काव्य विकसित केले. याशिवाय शिवकल्याण, रमावल्लभदास, मोरया गोसावी, संत महिपती यांनी संत चरित्रे लिहुन संतविजय, भक्तिविजय आदि ग्रंथांद्वारे मराठी भाषेत मोलाची भर घातली. अशा प्रकारे, आपल्या मराठी भाषेची गोडी ही अमृतातही पैजा जिंकते.

– तेजल तानाजी पाटील

                       बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या marathi diwas speech in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “जागतिक मराठी भाषा दिन भाषण” marathi day speech in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या speech on marathi diwas in marathi या marathi bhasha din speech in marathi article मध्ये upadate करू, मित्रांनो हि marathi bhasha diwas information माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर marathi diwas speech in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!