Sant Janardan Information in Marathi संत जनार्दन स्वामी यांची माहिती महराष्ट्रात ज्यांच्यापासून दत्तोपासनेची एक शाखा समृद्ध झाली, जे महान दत्तोपासक म्हणून प्रसिद्ध होते, साक्षात दत्तोत्रयाने ज्यांना दर्शन दिले असे संत एकनाथांचे सद्गुरू, विद्वान आणि सत्शील आचरणाचे ‘संत जनार्दन स्वामी’. राजकारण, परमार्थ व प्रपंच योग्य रीतीने सांभाळणारे उदाहरण म्हणजे संत जनार्दन स्वामी. सदरच्या लेखात आपण संत जनार्दन स्वामी यांची कथा साहित्य अशी माहिती पाहणार आहोत.
जनार्दन स्वामी माहिती – Sant Janardan Information in Marathi
संत जनार्दन स्वामी जीवन परिचय
नाव | जनार्दन स्वामी |
जन्म | फाल्गुन वद्य ६ शके १४२६ (इ.स. १५०४) |
जन्मस्थळ | चाळीसगाव, जळगाव |
समाधी | फाल्गुन ६ शके १४९७ (इ.स. १५७५) |
आई वडील | नोंद नाही |
गुरु | गुरु दत्तात्रय |
कार्यकाळ | इ.स. १५०४ – इ.स. १५७५ |
संप्रदाय | दत्तसंप्रदाय |
पत्नी | सावित्री आणि रमा |
शिष्य | संत एकनाथ(एका जनार्दन), जनी जनार्दन, रामा जनार्दन |
संत जनार्दन स्वामींचा जन्म फाल्गुन वद्य ६ शके १४२६ (इ.स. १५०४) रोजी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील देशपांडे या ब्राम्हण घराण्यात झाला. एका नाथपंथीय साधूने त्यांच्या वडिलांना दिलेला विभूतीचा प्रसाद म्हणजे जनार्दन स्वामी. शके १४४७ मध्ये जनार्दन स्वामिनी एकाच कुळातील दोन मुलींशी लग्न करून गृहस्थाश्रमास प्रारंभ केला. संत जनार्दन स्वामींचा जीवनक्रम भगवदचिंतन, स्नानसंध्याधी कर्मे, अतिथिसेवा, राजकार्य, सावित्री आणि रमा या दोन स्त्रियांशी संसार असा होता.
- नक्की वाचा: संत नरहरी सोनार माहिती
ते राजकारणी असल्यामुळे नित्य दगदग, वसुली, अधिकारी लोकांची ताबेदारी, यवनांची लहर, हीन लोकांशी संबंध यासारख्या गोष्टींतून मार्ग काढणे, स्वधर्मनिष्ठा राखणे, घरातील दत्तोपासना वाढवणे असे त्यांचे कार्य होते. कृष्णातीरी असलेल्या अंकलखोप, कुरवपुर, वाडी, औदुंबर इत्यादी दत्त स्थानांना ते भेटी देत असत. अंकलखोप येथे दत्त मंदिराच्या परिसरात दत्तोत्रयानी त्यांना नुसिहसरस्वतीरुपात दर्शन दिले. याप्रमाणे जनार्दन स्वामींवर प्रत्यक्ष दत्तोत्रयांचा अनुग्रह असल्यानेच नाथानी म्हटले आहे,
‘दत्तात्रयशिष्यपरंपरा | सहस्रार्जुन यदु दुसरा | तेणें जनार्दनु तिसरा | शिष्य केला खरा कलीयुगी ||’
सोळाव्या शतकात अहमदनगरमध्ये असलेल्या निझामाशाहीच्या काळात जनार्दन स्वामी हे दौलताबाद किल्ल्यावर किल्लेदार म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. किल्याच्या प्रशासकीय कामाची जबाबदारी ते सांभाळायचे. जनार्दन स्वामींची श्री गुरुदत्तावर प्रचंड श्रद्धा होती. देवगिरीच्या जवळ शुलभंजन शिखराच्या सपाटीवर शिवमंदिरे आहेत. तेथे सूर्यकुंड नावाचे एक तळे आहे. तिथेच दाट झाडी आणि एकांतात सह्स्रलिंग म्हणून एक स्थान आहे. तिथे जनार्दन स्वामीची एकांतात दत्तात्रयाची ध्यानधारणा चाले.
‘जनार्दनपंत ते अवसरीं, गुरुवारी अखंड जात पर्वतशिखरी | सह्स्रलिंग सरोवर परिसरी, सुलर्भोजन गिरी नेम सत्य’ असे एकनाथ- चरित्रकार केशवाने सांगितले आहे. अनेकांना या ठिकाणी साक्षात्कार होत असे. याच ठिकाणी जनार्दन स्वामींना दत्तांचा साक्षात्कार झाला अशी आख्यायिका सांगितली जाते. या दत्तासाक्षात्काराचे वर्णन एकनाथांनी आपल्या भागवतात केले आहे,
गुरुप्राप्तीलागी सर्वथा | थोर जनार्दनवासी चिंता |
विसरला तिन्ही अवस्था | सद्गुरू चिंतिता चिंतनीं ||
देव भावाचा भोक्ता | दृढ जाणोनि अवस्था |
येणें जालें श्रीदत्ता | तेणें हातु माथां ठेविला ||
हातुठेवितांच तत्काळ। बोधु आकळिला सकळ ।
मिथ्या प्रपंचाचें मूळ । स्वरूप केवळ स्वबोधें ॥
कर्म करूनि अकर्ता । तोचि अकर्तात्मबोधु जाला देता ।
देहीं असोनि विदेहता । तेंही तत्त्वता आकळिली ॥
गृहश्रमु न सांडितां । कर्मरेखा नोलांडतां ।
निजव्यापारीं वर्ततां । बोध सर्वथा न मैळे ॥
तो बोधु आकळितां मना । मन मुकलें मनपणा ।
अवस्था नावरेची जनार्दना । मूर्छापन्न पडियेला ॥
त्यासी सावध करूनि तत्त्वता । म्हणे प्रेमा राहे सत्त्वावस्था ।
तोही गिळोनि सर्वथा । होईं वर्ततां निजबोधे ॥
पूजाविधी करोनियां । तंव जनार्दनु लागला पायां ।
तंव अदृश्य जाला दत्तात्रेया । योगमायेचेनि योगें ॥
दत्तावधुताने कलियुगातील पहिला शिष्य जनार्दन केला असे नाथांनी म्हंटले आहे. संप्रदायामध्ये गुरुपरंपरा अशी सांगितली जाते,
कोणत्या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते ?
आदिनारायण -> अत्री -> दत्तोत्रय -> जनार्दन -> एकनाथ
जनीजनार्दन, रामाजनार्दन, एकाजनार्दन हे त्यांचे शिष्य होते. त्यांच्या शिष्य वर्गात हिंदूंबरोबर मुस्लीम व अरब भक्तांचाही समावेश होता.
- नक्की वाचा: संत रोहिदास माहिती
दत्तोपासक जनार्दन स्वामी
संत जनार्दन स्वामी हे दत्ताचे निस्सीम भक्त होते. जनार्दन स्वामींपासून महाराष्ट्रात दत्तोपासनेची एक शाखा समृद्ध झालेली दिसली. एकनाथांनी दत्तभक्ती विठ्ठलभक्तीत मुरवून टाकली असली तरी जनार्दन स्वामींच्या कृपेने जागृत झालेला दत्तभक्तीचा धागा अतूट होता. ‘धन्य गुरु जनार्दन | स्वानंदाचें जें निधान’ असे नाथानी म्हटले आहे. संत जनार्दन स्वामींनी संत एकनाथांना ज्ञानबोध दिला. याची ग्वाही देताना नाथ म्हणतात,
‘जनार्दनाचा गुरु | स्वामी दत्तात्रय दातारू ||
त्यांनी उपकार केला | स्वानंदाचा बोध दिला ||
सच्चित्सुखाचा अनुभव | दाखवला स्वयमेव ||
एकाजनार्दनी दत्त | वसे माझ्या हृदयांत ||’
संत एकनाथ महाराजांच्या प्रत्येक कवनाशेवटी ‘एका जनार्दनी’ असा स्वतःचा आणि आपले गुरु जनार्दन स्वामी यांचा नामनिर्देश असतो.
कर्मयोगी जनार्दन स्वामी
देवगिरीवर येऊन जनार्दनस्वामिनी यवनसेवा पत्करली. इथेच एका प्रसिद्ध स्थानाभोवती जनार्दनस्वामी व त्यांचे शिष्य संत एकनाथ महाराज यांच्या अनेक रम्य व भावगर्भ स्मृर्ती एकवटलेल्या आहेत. दुर्गातीर्थ व श्रीगोरक्षगुहा हि दोन स्थाने भाविकांना सुखावणारी होती. जनार्दनपंतानी यवनसेवा पत्करूनही आपली परमार्थाची वृत्ती सोडली नाही. ते रोज नित्य नियमाने गुरुचरित्र, ज्ञानेश्वरी, रामायण इत्यादी ग्रंथांची पारायणे, नामस्मरण, ध्यानधारणा करत असत. जनार्दन स्वामींचे नैष्ठिक आचरण व दत्तभक्ती यांचा प्रभाव यवनसत्तेवरही असावा. असे सांगितले जाते कि त्यांना व त्यांच्या परिवारास सोयीस्कर व्हावे म्हणून देवगिरीच्या आसपास शुक्रवारऐवजी गुरुवारी सुट्टी असे.
- नक्की वाचा: संत सेना महाराज माहिती
साहित्य, काव्यरचना आणि मठस्थापना
- जनार्दनस्वामीनी काही स्फुट काव्ये रचली असावीत. ‘आत्मनात्मविवेकसार’ नावाचा ओवीवृत्तात्मक ग्रंथ त्यांनी पंचीकरणावर लिहिलेला आहे.
- ‘उपनिषदवेदान्त’ भावगीता त्यांनी रचली असल्याचे कन्नडकर वि. बा. जोशी आपल्या ‘श्रीमंत जनार्दनस्वामी’ या चरित्रग्रंथात सांगतात.
- पैठण, देवगिरी, काशी इत्यादी ठिकाणी जनार्दनस्वामींचे सबंध आहेत.
- संत एकनाथांनी काशीस ब्रम्हघाटापाशी जनार्दन मठाची स्थापना केली आहे.
- नाशिकच्या तपोवनातील मठात, देवगिरी येथे मानपुरी मठात, बीडपटांगण मठात, परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथील मठात, जनार्दन स्वामींच्या मठांची परंपरा चालू आहे.
- उमरखेड, औरंगाबाद, कमळनुरी तालुक्यातील शेवाळे, देवपैठण, कारंजा अशा अनेक ठिकाणी जनार्दनस्वामींच्या दत्तोपासनेची परंपरा चालू आहेत.
जनार्दन स्वामी समाधी
जनार्दन स्वामीनी (इ.स. १५७५) शके १४९७ च्या फाल्गुन वद्य ६ रोजी आपला अवतार संपविला. काही संशोधकांच्या मते त्यांची समाधी अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडीला नसून देवगिरीला आहे.
त्यांचा जन्म, त्यांना दत्तदर्शन, नाथांना बोधदान आणि समाधियोग यांचा दिवस फाल्गुन वद्य ६ हाच आहे, आणि विशेष म्हणजे संत एकनाथांच्या समाधीचा दिवसही फाल्गुन वद्य ६ असाच आहे.
- नक्की वाचा: संत सेवालाल महाराज माहिती
आम्ही दिलेल्या sant janardan information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर संत जनार्दन स्वामी यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant janardan swami information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about sant janardan in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर sant janardan in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
संत जनार्दन महाराजानी जैन साहित्यावर लिखान ,प्रतिलिपी वर काम केले आहे