गणेश चतुर्थी ची माहिती मराठीत 2023 Ganesh Chaturthi Information in Marathi

Ganesh Chaturthi Information in Marathi – Ganesh Utsav in Marathi गणेश चतुर्थी ची माहिती मराठीत 2022 भाद्रपद महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला महासिद्धीविनायकी चतुर्थी असे म्हणतात. हिलाच ‘शिवा’ असेही म्हटले जाते. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे व्रत मानले जाते. खरंतर, माघ महिन्यातील चतुर्थीला माघी चतुर्थी असे म्हटले जाते. या चतुर्थीला आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचा जन्म झाला होता. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय अशा एकूण चार अवस्था मानल्या गेल्या आहेत. चतुर्थी ही तुरीयावास्था म्हणजे आत्मिक साधनेची एक अवस्था मानली गेली आहे, असे भारतीय तत्वज्ञान मानते. भारतीय शिल्प आणि चित्रकलेत गणेश एक अत्यंत महत्त्वपूर्ण व लोकप्रिय मूर्तीविषय आहे.

ganesh chaturthi information in marathi
ganesh chaturthi information in marathi

गणेश चतुर्थी ची माहिती मराठीत 2022 – Ganesh Chaturthi Information in Marathi

सणगणेश चतुर्थी ,गणेश उत्सव 
तारीख बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२ 
पूजा मुहूर्त सकाळी ११ वा. २४ मि. ते दुपारी १ वा. ५४ मि. 
चतुर्थी तिथी मंगळवार ३० ऑगस्ट दुपारी ३ वा. ३३ मि. ते बुधवार, ३१ ऑगस्ट दुपारी ३ वा. २२ मि. 
गणेश विसर्जन शुक्रवार, ९ सप्टेंबर २०२२ 
गणेश विसर्जन मुहूर्तसकाळी  वा.  मि. ते रात्री  वा.  मि.

गणपतीची माहिती

गणपतीच्या नाना रूपांचे वर्णन जे पुराण व इतिहासात मिळते, ते भारतीय उपखंडात व भारताबाहेरही विविध रूपात आविष्कृत झाले आहे. गणेशाच्या विविधरूपातील मूर्ती आज सगळीकडे उपलब्ध आहेत. हिंदू दिनदर्शिके प्रमाणे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करतात.

गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी सगळीकडे साजरी केली जाते. असं मानलं जातं की, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपती म्हणजेच गण+पती = गणपती, अशा प्रकारे गणपती देवाचा जन्म झाला होता. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा दिवस ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो.

खरंतर, हा दिवस चार्तुमासात येतो. चार्तुमास हे अनेक सणांनी भरलेले महिने आहेत. आपल्या सर्वांच्या आवडत्य बाप्पांच्या जन्माची एक विशेष आख्यायिका आहे. एकदा माता पार्वतीला स्नानासाठी जावयाचे होते. पण आसपास लक्ष ठेवण्याकरता तिथे कोणीच नव्हते. तेव्हा पार्वती देवीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवली आणि ती जिवंत केली.

या मूर्तीला पहारेकरी नेमलं आणि सांगितलं की, कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस; असे सांगून पार्वतीमाता स्नानासाठी आत गेली. भगवान शंकर काही वेळाने तिथे आले आणि ते आत जाऊ लागले. तोच त्या पहारेकऱ्याने त्यांना अडवले. त्यामुळे, भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्या पहारेकऱ्याचं शिर धडावेगळं केलं.

पार्वतीदेवी जेंव्हा स्नान करून बाहेर आली तेंव्हा त्यांनी हा प्रकार पाहिला आणि त्या संतापल्या. ते धडावेगळं शिर पाहून तिने पूर्ण ब्रम्हांड हादरवून सोडलं. सर्व देव अगदी ब्रम्हदेवापासून सगळे देव पार्वतीची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात. पण पार्वती माता कोणाचं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात.

तेंव्हा शंकर देव आपल्या गणाला आदेश देतात की, पृथ्वीतलावर जाऊन पूर्व दिशेला सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचं शिर कापून घेऊन ये. गण बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्याला हत्ती दिसला. तो त्याचं शिर घेऊन आला. भगवान शंकरांनी ते शिर पुतळ्याला लावले आणि त्या मूर्तीला जिवंत केले.

हा पार्वतीचा मानस पुत्र गज (हत्ती) अन् आनन (मुख) म्हणजेच गजानन होय. शंकर देवाने त्याला गणाचा ईश देव म्हणून गणेश असे नाव ठेवलं. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे.

आपल्याला गणपती बाप्पा कोठे उभा, कोठे नृत्यरत, कोठे असुरवधकारी वीर युवक या रूपांमध्ये दिसतो. तर काही ठिकाणी शिशु म्हणून, तसेच कोठे पूजक रूपातील गणपती बाप्पा आपल्याला सगळीकडे दिसतो. आपल्याला भारतीय शिल्पकलेमध्ये सप्त मातूकांच्या जोडीने गणपतीचे शिल्प अंकित केलेले दिसते.

सुरुवातीच्या काळापासूनच गणपती एकदंत रूपात शिल्पबद्ध आहे. गुप्तकाळातील गणेश मूर्तीही लंबोदर आहेत. ब्रह्मांड पुराणात या उदरात सारे जग सामावू शकेल असे म्हटले आहे. गणपतीच्या हातांच्या व अस्त्रांच्या संख्येत मतांची विविधता दिसते. गणपती चतुर्भुज, द्बिभुज, षड्भुज अशा अनेक रूपात आपल्याला दिसतो.

हातात साधारणपणे पाश-अंकुश, वरदहस्त व मोदक असे बाप्पांचे मनमोहक रूप असते. मानवगृह्यसूत्र व याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये शाल, कटंकट, उष्मित, कुष्माण्ड राजपुत्र व देवयजन इत्यादीचा विनायक म्हणून उल्लेख केलेला आपल्याला आढळून येतो. खरंतर, महाभारतातील विनायक हाच आहे.

याचे काम विघ्न उत्पादन करणे असे होते. परंतू, पुढे हाच विघ्नकर्ता गणपती विघ्नहर्ता म्हणून मानला जाऊ लागला. याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक हा अम्बिकेचा पुत्र होय. गणेशाचा पार्वतीपुत्र असा उल्लेख येथेच प्रथम होतो. गणरायांचे बंधू मानले जाणारे कार्तिकेयाचे अनेक गण अथवा पार्षदही पशुपक्ष्यांचे मुखधारित असतात.

इसवी सनाच्या सहाव्या शतकातील ‘भूमारा’त या प्रकारच्या अनेक गणांचा उल्लेख देखील आपल्याला सापडतो. गणेश म्हणजेच गण-ईशाचे हत्तीमुख असण्याचे हेही कारण असू शकते. काही ठिकाणी गणेश व नागदेवता यांची वर्णने मिसळल्याचे दिसते. गणपतीच्या हत्तीमुखाचे कदाचित हेही कारण असावे. पुराणांमध्ये हत्तीमुखधारी यक्ष आहेत.

यक्ष हे देखील गणपती बाप्पांप्रमाणे लंबोदर असतात. ‘याज्ञवल्क्य संहिता’ या ग्रंथात विनायक व गणपतीच्या पूजेचे विवरण सापडले आहे. इसवी सनाच्या सातव्या शतकात रचलेल्या ललित माधव ग्रंथात गणपतीचा उल्लेख आहे. अशा अनेक स्त्रोतांच्या आधारे आपण गणेशाचे वर्णन करतो आणि गणेश चतुर्थीला त्यांच्या वर्णनात्मक मूर्तीची प्रतिष्ठापना करून महाराष्ट्रातील आपण सर्वजण बाप्पांची मनोभावे पूजा करतो.

तस आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की गणपती बाप्पांचा पहिला उल्लेख हा प्राचीन हिंदू धर्मग्रंथामध्ये असलेल्या ऋग्वेदात पहावयास मिळतो. दोन ऋक मंत्र, “गणानाम गणपतीम् हवामहे व विषु सीदा गणपते” हे वैदिक गणपतीचा स्पष्टपणे निर्देश करतात. जरी हा वैदिक गणपती व सध्या पूजिला जाणारा पौराणिक गणपती एक नसला तरी वेदोत्तर काळात ऋग्वेदातील गणपती-ब्रह्मणस्पती-वाचस्पती पासूनच पौराणिक गजवदन-गणेश-विघ्नेश्वर हे रूप निर्माण झाल्याचे संशोधक मान्य करतात.

ऋग्वैदिक गणपतीची ही नावे सोडून आणखीन काही दुसरी नावे होती; बृहस्पती, वाचस्पती. ही देवता पूर्वीच्या काळी खूप ज्योतिर्मय मानली जाई. तिचा वर्ण लालसर सोनेरी असा होता. अंकुश, कुऱ्हाड ही या देवतेची अस्रे होती. या देवतेकडून प्राप्त होणाऱ्या आशीर्वादाशिवाय कोणतेही इष्टकाम संभव होणार नाही असे मानले जाई.

ही देवता कायम ‘गण’ नामक एका नृत्यकारी दलासोबत विराजमान असे व ही देवता अन्य देवतांची रक्षकही मानली जाई. परंतू, आपल्याला दुसऱ्या मतानुसार भारतातील अनार्यांच्या हस्तिदेवता व लम्बोदर यांच्या एकत्रिकरणातून गणेश संकल्पना निर्माण केली गेली आहे, असे समजते. गणेश या मूळच्या अनार्य देवतेचे आर्यीकरण झाले असावे हा दुसरा अंदाज आपल्याला लावता येतो.

गणेशाचे वाहन उंदिर याच आदिम संस्कृतीचे प्रतीक म्हणून राहिले असावे. इसवी सनाच्या चौथ्या शतकातील कालिदास, इसवी सनाच्या सहाव्या शतकातील भारवी आणि इसवी सनाच्या पाचव्या शतकातील पंचतंत्र यांमध्ये बाप्पांचे संदर्भ कुठंही आपल्याला आढळून येत नाहीत. तसेच, आपल्या भारत देशातील नाट्यशास्त्रातही गणेश देवतेचा उल्लेख आपल्याला दिसत नाही. गुप्त काळापासूनच या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित झाली असे अनेक अभ्यासक मानतात.

गणेश स्थापना मुहूर्त 2022 – Ganpati Sthapana Time in Marathi

सणगणेश चतुर्थी ,गणेश उत्सव 
तारीख बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२ 
पूजा मुहूर्त सकाळी ११ वा. २४ मि. ते दुपारी १ वा. ५४ मि. 
चतुर्थी तिथी मंगळवार ३० ऑगस्ट दुपारी ३ वा. ३३ मि. ते बुधवार, ३१ ऑगस्ट दुपारी ३ वा. २२ मि. 
गणेश विसर्जन शुक्रवार, ९ सप्टेंबर २०२२ 
गणेश विसर्जन मुहूर्तसकाळी  वा.  मि. ते रात्री  वा.  मि.

मित्रांनो,

आपण गणेश चतुर्थी का साजरी करतो?

असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल.

याशिवाय, गणेश चतुर्थीची सुरूवात कुणी केली आणि कुठून झाली असे अनेक प्रश्न आपल्या मनात तयार होत असताना, लोकमान्य टिळकांचा उल्लेख या संदर्भात झालेला आपल्याला दिसतो. पण मित्रांनो, लोकमान्य टिळकांनी जरी गणेश चतुर्थी सार्वजनिक ठिकाणी साजरी करण्याची कल्पना रुजवली असली तरी, त्यांच्या आधीपासूनच गणेश चतुर्थी ही सगळीकडे साजरी केली जात होती.

खरंतर, महाभारत घडण्याच्या आधीच्या काळापासूनच गणेश चतुर्थी ही साजरी केली जात होती. महाभारताच्या कितीतरी वर्ष आधीच भूतकाळात महर्षी वेदव्यास यांनी महाभारताची घटना पाहून ठेवली होती. परंतू, ही घटना लिहण्यासाठी ते पूर्णपणे असमर्थ होते. त्यावेळी त्यांनी ब्रम्हदेवाचे ध्यान केले आणि साक्षात ब्रह्मदेवाने त्यांना दर्शन दिले.

ब्रह्मदेवाने वेदव्यास मुनीला विचारले, “मला बोलवण्याचे कारण काय आहे? त्यावेळी वेदव्यास मुनी म्हणाले, हे ब्रह्मदेव मी एक अशी घटना पाहिलेली आहे जी भविष्यात घडणार आहे. पण, तिचा विस्तार खूप मोठा असल्याने मी ती घटना लिहण्यासाठी असमर्थ आहे. त्यामुळे, आपण ही घटना लिहण्यासाठी मला कृपया मदत करावी.

पण, यावर ब्रह्मदेव म्हणाले बुद्धीचे देवता अन् रिद्धी सिद्धीचे नाथ श्री. गणेशचं तुमची मदत करतील, तेंव्हा तु त्यांचेच ध्यान कर.” असे सांगून ब्रह्मदेव तिथून अदृश्य झाले.

नंतर महर्षी वेदव्यास ब्रम्हदेवांच्या सूचनेप्रमाणे गणपतींची आराधना करू लागले. आराधना करत असताना मुनींना गणेश बाप्पा प्रसन्न झाले. बाप्पांनी मुनींना त्यांना आवाहन करण्याचे कारण विचारले, तेंव्हा घडलेली सर्व हकिकत वेदव्यास यांनी गणेशांना सांगितली. सर्व ऐकून घेतल्यानंतर बाप्पांनी स्वतः ती घटना लिहण्यासाठी मंजुरी दिली.

परंतू, महर्षींनी त्यांना एक अट घातली की मी महाभारताची पूर्ण घटना सांगून संपेपर्यंत तुम्ही न थांबता, ही घटना लिहायची. अन्यथा तुम्ही लिहताना मध्येच थांबलात किंवा थकलात तर मी ती घटना नव्याने सांगायला सुरुवात करेन आणि तुम्हालाही ही घटना सुरुवातीपासून नव्याने लिहावी लागेल. बाप्पांनी मुनींच्या सर्व अटी मान्य करून महाभारताची घटना लिहण्यासाठी सुरुवात केली.

अशा रीतीने, घटना लिहता लिहता एक दिवस गेला, दोन दिवस गेले, तीन दिवस गेले. मात्र त्यानंतर बाप्पांना लिहताना थकावट येऊ लागली, त्यांना घाम सुटू लागला. हे सर्व वेदव्यास पाहत होते. गणपतींना आपल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे याची त्यांना जाणीव झाली. पण, इकडे बाप्पांच्या शरीराचे तापमान वाढत होते.

बाप्पांच्या शरीराचे वाढणारे हे तापमान कमी करण्यासाठी मुनींनी आपल्या आजूबाजूच्या मातीचा चिखल गोळा केला आणि तो बाप्पांच्या अंगावर लावला. पण, थोड्या वेळाने बाप्पांच्या शरीरावरील मातीचा लेप सुकून खाली पडू लागला. खरंतर, या घटनेमुळे बाप्पांचे ‘पार्थिव गणेश’ असे नामकरण झाले.

अशा पद्धतीने बाप्पांनी दहा दिवस लावून पूर्ण महाभारत मुनींच्या सांगण्याप्रमाणे लिहून काढले. मात्र दहा दिवसांनंतर बाप्पांच्या अंगावर जी माती होती ती वाळून आखडून बसली होती. म्हणून, अकराव्या दिवशी वेदव्यास मुनींनी गणपतींना पाण्यात बसवले. जेणेकरून त्यांच्या अंगावरील सगळी माती निघून जाईल.

ही सर्व घटना भाद्रपद महिन्यात घडली. म्हणूनच आपण सर्वजण भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी साजरी करतो. दहा दिवस बाप्पांनी पुजा करुन, अकराव्या दिवशी त्यांचे विसर्जन करतो.

प्रत्येक दिवसाची माहिती

गणेश चतुर्थीतील प्रत्येक दिवस हा सर्वांसाठी आनंदाचा, विविधतेचा आणि उत्साहाचा असतो. गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी बाप्पांच्या आगमनाची तयारी घरोघरी केली जाते. त्यांच्या निवासासाठी सुंदर आरस बांधले जातात. शिवाय, संपूर्ण घराला चहुबाजूंनी फुलांनी सजवले जाते. एकूण काय तर प्रत्येक घरामध्ये बाप्पांच्या आगमनासाठी उत्सुकता असते.

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचं व्रत केलं जातं. हे व्रत खास करून कुमारिका स्वतःला चांगला पती मिळावा म्हणून, तर सुवासिनी आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य मिळावं म्हणून करतात. यादिवशी शंकर देव आणि पार्वती देवीची स्थापना करून त्यांची पूजा केली जाते.

त्याचबरोबर, यादिवशी कुमारिका आणि पतिव्रता निर्जळ व्रत करून हा उपवास गणेश चतुर्थीला सोडतात आणि शेवटी गणपतीच्या विसर्जनासोबतच या व्रताच्या पूजेचेही विसर्जन करतात. गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी श्रीगणेशाची मूर्ती घरी किंवा सार्वजनिक मंडळाच्या मंडपात आणली जाते. यानंतर पंचांगातील मुहूर्ताप्रमाणे मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.

प्रतिष्ठापना पूजेमध्ये आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुलं, पत्री आणि नेवैद्य इत्यादी सोळा उपचारांनी गणपतीची पूजा केली जाते. गणपतीला आवडणारी लाल जास्वंदीची फुले, शमी आणि दुर्वा तसेच, विविध पत्रीपाने या पूजेमध्ये वापरली जातात. यादिवशी गणपतीची पूजा झाल्यावर उकडीच्या मोदकांचा प्रसाद बाप्पांना दाखवला जातो.

याचदिवशी गणपतीसोबतच त्यांचं वाहन असलेल्या मूषक म्हणजेच उंदराचीही स्थापना केली जाते आणि मुषकालाही गोड प्रसाद दाखवला जातो. बाप्पांची पूजा करताना नेहमी दुर्वांची जुडी बाप्पाला वाहिली जाते. कारण, बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहेत आणि त्यामुळे गणपती बाप्पा आपल्याला प्रसन्न होतो. गणपतीला नेहमी एकवीस दुर्वांची जुडी प्रामुख्याने वाहिली जाते.

प्रामुख्याने, गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहिल्या जातात; त्यामागेही एक आख्यायिका आहे. अनलासूर नावाच्या एका असुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर उच्छाद मांडला होता. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून गणेशाला गाऱ्हाणे घालण्यात आले. गणपतीने त्या अनलासूराला गिळले आणि सर्वांचा त्रास संपवला.

पण त्या राक्षसाला गिळल्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड आग सुरू झाली. काही केल्या ती थांबेना. यावर कश्यप ऋषींनी बाप्पाला दुर्वांचा रस प्यावयास दिला. तो प्राशन केल्यावर गणपतीच्या पोटातील आग थांबली आणि तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडत्या झाल्या. तेव्हापासून, गणपती पूजेत दुर्वा या आवर्जून वाहिल्या जातात.

दुर्वांप्रमाणेच गणपतीला प्रिय आहे ते जास्वंदाचं लाल फूल. कारण गणपतीचा वर्ण शेंदरी किंवा लाल आहे. त्यामुळे गणपती पूजेत जास्वंदाच्या लाल फुलाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे गणपतीला जास्वंदीच्या फुलांचा हार प्रामुख्याने वाहिला जातो.

गणेश चतुर्थीतील दुसरा दिवस हा बाप्पांच्या उंदिर वाहनासाठी विशेष असतो. गावांकडच्या भागात या दिवसाला ‘उंदरुपी’ असे म्हटले जाते. यादिवशी उंदराला प्रिय असणारे धान्य घरी शिकवले जाते. यातील विशेष बाब म्हणजे घरामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन एकत्र शिकवले जाते आणि घराच्या आतील भागातील सर्व कोपऱ्यांमध्ये ते ठेवले जाते.

याचा एकच उद्देश असतो की घरामध्ये जर उंदिर वास करत असतील तर, त्यांना या त्यांच्यासाठी विशेष असणाऱ्या  दिवशी त्यांच्या आवडते पदार्थ खाता यावेत. याशिवाय, यादिवशी घरामध्ये असलेल्या उंदरांना मारले जात नाही. कोकणकडच्या काही भागांमध्ये यादिवशी मुषकाला प्रसाद म्हणून मांसाहारी अन्न देखील अर्पण केले जाते.

गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी गौरी हा उत्सव साजरा केला जातो. यादिवशी सासरी असणाऱ्या मुली माहेरी येतात. त्यांना यादिवशी गौरी म्हणून बोलवलं जात. गणेश चतुर्थीमध्ये गौरी उत्सवाला विशेष असे महत्त्व आहे. खरंतर, गौरी हा उत्सव वेगवेगळ्या ठिकाणी निरनिराळ्या पद्धतीने साजरा केला जातो.

शिवाय, गौरीला काही ठिकाणी गणपती बाप्पांची आई तर, काही ठिकाणी गणपती बाप्पांची बहीण असं संबोधलं जातं. पण, महाराष्ट्रातील बऱ्याचश्या भागांमध्ये गौरी म्हणजे गणपतींची बहिण असेच संबोधले जाते. साधारणतः अनुराधा नक्षत्राच्या दिवशी ज्येष्ठ गौरीचे आवाहन केले जाते. आपल्या घरामध्ये गौराईचे स्वागत हे अनोख्या पद्धतीने केले जाते. घराच्या अंगणामध्ये असणाऱ्या तुळशी कट्ट्यापासून ते दाराच्या उंबरठ्यापर्यंत त्यांना चालत चालत आणले जाते आणि धान्याचे माप ओलांडून घरामध्ये त्यांचा प्रवेश केला जातो.

घरी प्रवेश केल्यानंतर त्यांना औक्षण ओवाळले जाते आणि गणेशांच्या शेजारी त्यांची प्रतिष्ठापना केली जाते. गौरी या आपल्या घरी स्वर्गातून आपल्या भावाला म्हणजेच गणेशांना भेटायला तीन दिवस माहेरवाशिणी म्हणून पृथ्वीवर आल्या आहेत, असे समजले जाते. गौरीचे मुखवटे हे काही ठिकाणी शाडू मातीचे, काही ठिकाणी पितळांचे तर, काही ठिकाणी कापडांचे किंवा फायबरचे तयार केलेले असतात.

गौरी घरी आल्यानंतर त्यांना भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांची पूजा झाल्यानंतर माहेरी आलेल्या सासरवाशिनिंना गौरीचा हा प्रसाद खायला दिला जातो. शिवाय, यादिवशी गौरीसाठी पाच प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या देखील बनवल्या जातात.

गौरीपुजन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या चौथ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रामध्ये महालक्ष्मीचे पूजन केले जाते आणि त्यांना महानैवैद्य देखील दिला जातो. या दिवसाला ओसा असेही म्हटले जाते. यादिवशी गौरींसाठी अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. यादिवशी सोळा भाज्या, कोशिंबिरी, खीर, पापड, भात, आमटी अशा अनेक पक्वानांचा महाप्रसाद गौरींसाठी केला जातो.

गौरी ही माहेरवाशिणी असल्यामुळे तिच्यासाठी चकल्या, करंज्या, लाडू, चिवडा अशा अनेक प्रकारच्या फराळांचा आणि विविध फळांचा नैवैद्य संध्याकाळच्या वेळी दाखवला जातो. तसेच शेजारीपाजारी, नातेवाईक, मैत्रिणी यांना यादिवशी हळदी – कुंकुसाठी आणि गौरीच्या दर्शनासाठी बोलवले जाते.

त्यांना अनेक भेटवस्तू देखील दिल्या जातात. शिवाय, त्यांना गौरीचे ओसे खायला दिले जातात आणि त्यांच्या घरातील गौरीसमोर देखील हे ओसे प्रसाद म्हणून ठेवले जातात. गणपतींचं आणि गौरीच नात हे बहीण भावाच्या नात्याच प्रतीक म्हणून मानलं जात. अशा रीतीने, या गौराईचे विसर्जन हे गणेश मूर्तीच्या विसर्जनासोबतच केले जाते.

गणेश उत्सवातील शेवटचा दिवस हा सगळयांना नाराज करणारा असतो, कारण यादिवशी गणेश बाप्पांचे विसर्जन केले जाते. बाप्पांचा निरोप घ्यायचा हा दिवस सर्वांना रडवणारा असतो. इतके दिवस बाप्पा हे आपल्या घरातील व्यक्तीप्रमाणे आपल्या घरी निवास करीत असताना मध्येच त्यांचा निरोप घेणं सर्वांनाच जड जातं.

परंतू, बाप्पांचे विसर्जन करणे हे शास्त्रामध्ये लिखित असल्यामुळे आपल्याला शास्त्राप्रमाणे जावे लागते. शेवटी, गणपती विसर्जन पूजा करण्यासाठी कमीत कमी वीस मिनिटे इतका वेळ लागतो. विसर्जन पूजा सुरू करण्यापूर्वी त्याचे साहित्य पूजास्थानी आणून ठेवले जाते. पूजा करण्‍यापूर्वी अंघोळ करून नवीन किंवा धुतलेले कपडे परिधान करून, नंतर कपाळावर टिळा लावून आसनावर बसून पूजा केली जाते. खरंतर, ही पुजा पूर्व दिशेला तोंड करून करायची असते.

पूजेच्या विविध वस्तू यावेळी आणल्या जातात. हात धुण्यासाठी किंवा मूर्ती पुसण्यासाठी दोन वेगवेगळे कपडे जवळ ठेवून पूजेसाठी शुद्ध पाणी एका ताब्यांत भरून ठेवले जाते. पूजेसाठी दिलेली प्रत्येक क्रिया वाचून तिचे अनुसरण करून प्रत्येक क्रियेची माहिती व सूचना सर्व उपस्थितांना दिली जाते. यानंतर, दिव्यात तूप घालून कापसाची वात लावली जाते.

दिवा लावल्यानंतर हात स्वच्छ धुवूनच नंतर दिवा हा तांदुळ किंवा फुलाच्या अंथरूणावर मूर्तीच्या उजव्या बाजूला ठेवला जातो. नंतर हातात फुलाच्या पाकळ्या घेऊन ‘हे दीप देवा!’ हा मंत्र म्हटला जातो. आपण मला नेहमी मंगल आणि प्रसन्न ठेवा अशी प्रार्थना बाप्पांना केली जाते. पूजा चालू असेपर्यंत आपण सर्वांनी शांत व स्थिर प्रज्वलित रहायचे असते. अशा पद्धतीने, बाप्पांचा निरोप सगळीकडे घेतला जातो.

महत्त्व

गणपती बाप्पा मोरया! अशा गर्जात आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध भक्तांना खूप आधीपासून लागलेले असतात. गणपतीचं आगमन, त्याची पूजा, गणेशोत्सवाचा सोहळा आणि गणेश विसर्जन या सर्व गोष्टी महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात देखील केल्या जातात. एवढंच नाही तर अगदी परदेशी देखील अगदी धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो.

जितक्या उत्साहाने गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं आगमन होतं, तितक्याच भावनात्मकरित्या गणरायाला निरोपही दिला जातो. भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या चालीरीती प्रमाणे दीड दिवस ते अगदी अकरा दिवसापर्यंत गणपतीची स्थापना करून गणेशोत्सव अगदी आनंदाने साजरा केला जातो. भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती हे बुद्धीचे देवता आहेत.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पूजा केली जाते. तसंच हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे.

कोणतंही कार्य असल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. कारण गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. गणपतीची अनेक नावं आहेत त्यापैकीच हे एक नाव. विघ्नहर्ता अर्थात संकटाचं हरण करणारा असं आहे. म्हणून प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते.

तसंच गणेशोत्सवाचा पहिला दिवस असतो गणेश चतुर्थीचा. या दिवशीच प्रारंभ होतो गणेशोत्सवाला. गणेशाच्या आगमनाने घरामध्ये सगळीकडे भक्तिमय वातावरण तयार होते. बाप्पाच्या आगमनाबरोबर घरातील विघ्न घरातून बाहेर जातात. घरामध्ये आनंद नांदतो. सर्वजण एकत्र येऊन बाप्पांची पुजा करतात आणि एकत्र जेवणही करतात.

त्यामुळे, सगळ्यांमध्ये आपुलकीची भावना वाढते. याशिवाय, सार्वजनिक गणेश उत्सवामुळे गावातील सर्व लोक एकत्र येतात. उत्सवाच्या निमित्ताने सगळ्यात सहभाग घेतात. लोकांमधील दुजभावना, शत्रुत्व, भावकी या गोष्टी नाहीशा होऊन सर्वजण एकत्र नांदतात. त्यामुळे, देशामध्ये एकजूट निर्माण होण्यास मदत होते.

मोदकाचे महत्त्व

गणपती बाप्पांना मोदक हे सगळ्यात जास्त प्रिय आहेत. खरंतर, सगळीकडे गणपतीला साधारणतः अकरा किंवा एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. हे मोदक नारळाचं सारण आणि तांदळाच्या उकडीने तयार केले जातात किंवा तळणीचे ही मोदक काही ठिकाणी केले जातात. आजकाल तर आपल्याला मोदकांमध्ये अनेक प्रकारची विविधता सगळीकडे दिसून येते.

गणेश चतुर्थीच्या प्रचलित आख्यायिकेप्रमाणे, एकदा गणपती बाप्पा चतुर्थीला आवडते मोदक खाऊन आपल्या आवडत्या वाहनावरून उंदराच्या पाठीवरून जात होता. तेव्हा वाटेत साप पाहून उंदीर घाबरला आणि भीतीने थरथरू लागला. यामुळे गणपती बाप्पा उंदरावरून खाली पडला आणि त्याच्या पोटातून मोदक बाहेर आले. गणपतीने सारे मोदक पुन्हा पोटात टाकले आणि पोटावर साप बांधला.

हे दृश्य पाहून चंद्र गणपती बाप्पांवर हसला. हे पाहून गणपतीने चंद्राला शाप दिला की, चतुर्थीला कोणीही तुझे दर्शन घेणार नाही. जो तुला बघेल त्याच्यावर चोरीचा आळ येईल. अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्यामुळे आजही लोकं चतुर्थीला चंद्राकडे पाहत नाहीत.

गणपती बाप्पांनी असा शाप दिल्यामुळे चंद्राला खूप वाईट वाटले. चंद्र देवतेने बाप्पांना हात जोडून त्यांची क्षमा मागितली आणि त्यांनी दिलेला शाप मागे घेण्यास विनंती देखील केली. चंद्राची याचना पाहून बाप्पांना त्याच्यावर दया आली आणि बाप्पांनी त्यावेळी चंद्राला एक वरदान दिले.

ते वरदान म्हणजे, बाप्पांच्या प्रत्येक संकष्टीला जेंव्हा मानवजात उपवास करेल तेंव्हा त्या उपवासाची सांगता ही चंद्राला दूध दाखवूनच पूर्ण होईल. आपल्या समाजामध्ये असे मानले जाते की गणपती बाप्पांना मोदक हे खूप प्रिय आहेत, म्हणूनच गणपती बाप्पांचे भक्त हे गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवतात.

‘मोद’ म्हणजे आनंद आणि ‘क’ म्हणजे लहानसा भाग. अर्थातच मोदक म्हणजे आनंदाचा लहान भाग होय. मोदकाचा आकार नारळासारखा म्हणजे ‘ख’ नामक ब्रह्मरंध्र याच्या आवरणाप्रमाणे असतो आणि कुंडलिनी चे ‘ख’ पर्यंत पोहचण्याने आनंदाची अनुभूती होते.

अशा प्रकारे, हातामध्ये ठेवलेल्या मोदकाचा असा अर्थ आहे की त्या हातात आनंद प्राप्त करण्याची शक्ती आहे. मोदक हा बाप्पांचा आवडता पदार्थ सगळ्या पदार्थांमध्ये मानाचा प्रतीक आहे. म्हणूनच, त्याला ज्ञानमोदक असेही म्हणतात. सुरुवातीला अस वाटतं की ज्ञान थोडेच आहे म्हणजे मोदकाचा वरचा भाग याचा प्रतीक आहे, पण अभ्यास केल्यानंतर समजतं की ज्ञान हे प्रचंड आहे.

कारण मोदकाचा खालील भाग याचा प्रतीक आहे. अर्थातच ज्ञानामुळे प्राप्त झालेलं आनंदही मोदकासारखा गोड असतो. मोदक हा पदार्थ महाराष्ट्रात व दक्षिण भारतात प्रचलित असलेला गोड खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रामध्ये विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो.

उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांखेरीज खवा, सुकामेवा, चॉकोलेट आणि विविध रंगांचा वापर करून तयार केलेल्या पारीचे मोदक असे साहित्य वापरून तयार केलेले मोदक विशेष लोकप्रिय आहेत.

आपण आपल्या भूतकाळात डोकावून पाहिलं, तर आपल्या लक्षात येईल की भगवान शिवाला भांग पसंत आहे, महाकाली देवीला खिचडी, देवी लक्ष्मीला खीर पसंत आहे तर, गणपती बाप्पांना प्रसादाच्या रूपात मोदक प्रिय आहेत. भारतीय पुराणानुसार देवतांनी अमृतापासून तयार करण्यात आलेला एक मोदक पार्वती देवीला भेट दिला होता.

बाप्पांनी जेंव्हा माता पार्वतीकडून मोदकांचे गुण जाणून घेतले, तेंव्हा बाप्पाची मोदक खाण्याची तीव्र इच्छा झाली आणि ते मोदक त्यांनी खाल्ले. हे मोदक खाऊन गणेशजींना अपार संतुष्टी मिळाली. तेव्हापासून गणेशजींना मोदक अधिक प्रिय झाले होते. गनणपत्यथर्वशीर्षमध्ये तर असं म्हटलंय की, “यो मोदकसहस्त्रेण यजति स वांछितफलमवाप्नोति” म्हणजेच एखाद्या भाविकाने बाप्पाला जर एक हजार मोदकांचा प्रसाद चढवला, तर बाप्पा त्या भक्ताची मनोकामना पूर्ण करतो, म्हणजे त्या व्यक्तीच्या मनातील ईच्छा पूर्ण होते.

आपणा सर्वांना माहीत आहे की बाप्पांचा एक दात तुटला आहे. त्यामुळे बाप्पाला एकदंत असं संबोधलं जातं. मोदक तळून आणि वाफवून अशा दोन प्रकारे तयार केले जातात. दोन्ही प्रकारचे मोदक नरम आणि तोंडात सहज मिसळणारे असतात. त्यामुळे एक दात नसतानाही गणेशजी सहजतेने मोदक खाऊ शकतात. त्यामुळे त्यांना मोदक अधिक पसंत असल्याचे मानले जाते.

त्याचबरोबर, मोदक हे शूद्ध पीट, तूप, मैदा, खवा, गूळ आणि नारळापासून तयार केला जातो. त्यामुळे मोदक आरोग्यासाठीही गुणकारी मानला जातो. या पदार्थाला अमृततुल्य मानलं जातं. मोदकामध्ये अमृततुल्य असल्याची कथा पद्म पुराणाच्या सृष्टी खंडात आहे. याशिवाय, यजुर्वेदात गणेशजींना ब्रम्हांडाचा कर्ताधर्ता मानण्यात आलं आहे.

त्यांच्या हातातील मोदकाला ब्रम्हांडाचं स्वरूप आहे. ज्याला गणेशजींनी धारण केलं आहे. प्रलयकाळात गणेशजी ब्रम्हांड रूपी मोदक खाऊन सृष्टीचा अंत करतात आणि पुन्हा सृष्टीच्या आरंभासाठी ब्रम्हांडाची रचना करतात. गणेश पुराणातही आपल्याला याचा उल्लेख मिळतो. बाप्पांचं मोदकावरील प्रेम इतकं आहे की, त्यांच्या प्रत्येक फोटोमध्ये आपल्याला त्यांच्या हातात मोदक दिसतोच. यासोबतच काही फोटोंमध्ये बाप्पाचं वाहन असलेला मूषकही मोदक खाताना अनेकदा बघायला मिळतं.

चालीरिती

आपल्या समाजामध्ये गणेश चतुर्थीचा उत्सव हा अनेक चालीरितींसह वेगवेगळ्या भागांमध्ये साजरा केला जातो. आपली भारतीय संस्कृती ही विविध भाषा, प्रथा व चालीरिती यांनी परिपूर्ण आहे. या विविधतेत आपले देवही येतात. हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत असं सगळीकड मानलं जातं.

वेगवेगळ्या राज्यांत, वेगवेगळ्या देवांची पूजा केली जाते. परंतू, असं असलं तरी आपला गणपती बाप्पा हा सगळ्यांचाच लाडका आहे. इतर देवांवर जरी लोकांची मनापासून श्रद्धा असली तरी बाप्पांकडे मात्र जास्तीत जास्त भक्तांचा ओढा आहे. महाराष्ट्रात तर गणेशोत्सव साजरा करण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त असल्याचं आपल्याला दिसून येत.

घरचा गणपती, सोसायटीचा गणपती, मंडळाचा गणपती असे एक ना अनेक गणपती उत्तम सजावटीसह पुजवले जातात. भारतातील अनेक ठिकाणी बाप्पांच्या पूजेच्या विधीही भिन्न स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात.

खासकरून, कोकणातील गणपतीच्या मूर्तीचे आकार हे खूप रेखीव, मनमोहक, डोळ्यांमध्ये टिपणाऱ्या आणि मनाला भारावून टाकणाऱ्या असतात. अनेक ठिकाणच्या चालीरिती जरी वेगवेगळ्या असल्या तरी बाप्पांचा आवडता पदार्थ मात्र सगळीकडे समान असतो, फक्त बाप्पांचा आवडता पदार्थ मोदक बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात.

गावाकडील भागांमध्ये गणपती बाप्पाचे स्वागत हे साध्या पद्धतीने केले जाते, तर शहरी भागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी बाप्पाचे स्वागत मोठ्या धामधुमीमध्ये आणि जल्लोषात केले जाते. काही ठिकाणी तर गौरी पूजनाच्या पद्धतीतही आपल्याला फरक जाणवतो. शिवाय, वेगवेगळ्या भागांमध्ये गौरीचे स्वागत आणि तिचे विसर्जन ही वेगळ्या पद्धतीने केलेले आपल्याला पाहायला मिळते.

अशा रीतीने, आपल्या गणेश चतुर्थीच्या उत्सवामध्ये आपल्या भारताच्या विविध भागातील चालीरितींत जरी भिन्नता असली तरी, बाप्पाच्या भक्तीची भावना मात्र प्रत्येकाची निर्मळ आणि शुध्द आहे.

                 –  तेजल तानाजी पाटील

                       बागिलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या ganesh chaturthi information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ganesh chaturthi festival information in marathi म्हणजेच गणेश चतुर्थी ची माहिती मराठीत ganpati chi mahiti या सणाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या ganesh chaturthi in marathi language या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि ganesh utsav information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!