“युगपरिवर्तन करण्यासाठी,
बाळ जन्मला लोकमान्य!
मातीतला अन् गिरणीतला,
पेटून उठला सामान्य!”
Lokmanya Tilak Speech in Marathi लोकमान्य टिळक माहिती भाषण आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सूत्रसंचालक आणि आयोजक यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच, लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त याठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करते. कारण, ज्याप्रकारे बागेतल्या गुलाबाच्या फुलाला बागेमुळे अजुन शोभा येते, अगदी त्याचप्रमाणे आपल्या रसिक श्रोत्यांमुळे आपल्या कार्यक्रमाला देखील अनोखी शोभा आलेली आहे. मित्रांनो, लोकमान्य टिळक हे भारतीय जनतेच्या मनामध्ये स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणारे थोर स्वातंत्र्यसेनानी होते.
“स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच”, असे इंग्रजांना धाडसाने आणि आत्मविश्वासाने सांगणारे, तसेच स्वराज्याची अशी सिंहगर्जना करत भारतीय जनतेला स्वराज्याचा महान मंत्र देणारे, कुशल आणि सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘लोकमान्य टिळक‘ होय.
थोर भारतीय नेते, पवित्र भगवद्गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडित लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरीस झाला. त्यांचे जन्मनाव केशव होते; परंतु, बाळ हेच नाव पुढे त्यांच्यासाठी रूढ झाले. मित्रांनो, त्याकाळची चिखलगावची खोतीदारी त्यांच्याकडेच होती. टिळकांचे पंजोबा केशवराव यांनी पेशव्यांच्या काळातच आपल्या घराण्याची मानाची जागा मिळवली होती.
लोकमान्य टिळक माहिती भाषण – Lokmanya Tilak Speech in Marathi
लोकमान्य टिळक भाषण
टिळकांचे वडील गंगाधरपंत तर, आई पार्वतीबाई होत्या. गंगाधरपंतांना कौटुंबिक अडचणीमुळे इंग्रजी शिक्षण सोडून पुण्याहून गावी जावे लागले. पुढे त्यांनी मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी केली. त्यामुळे, बाळ टिळकांचे पारंपरिक संस्कृत अध्ययन घरातच झाले.
इसवी सन १८६६ मध्ये गंगाधरपंतांची बदली पुण्यास झाल्यामुळे, टिळक आपल्या मातापित्यांबरोबर पुण्यास आले. पुण्यात आल्यावर थोड्याच दिवसांत टिळकांची आई मरण पावली आणि गंगाधरपंतांची बदलीही ठाण्यास झाली.
तथापि, लोकमान्य टिळक मात्र पुण्यातच राहिले आणि सन १८७२ मध्ये ते मॅट्रिक झाले. मित्रहो, तत्पूर्वी सन १८७१ मध्येच त्यांचा विवाह कोकणातील लाडघर नावाच्या गावच्या एका बल्लाळ बाळ कुटुंबातील सत्यभामाबाई यांच्याशी झाला. लग्नानंतर टिळकांना तीन मुली आणि विश्वनाथ, रामभाऊ व श्रीधर असे तीन मुलगे होते.
- नक्की वाचा: छत्रपती शिवाजी महाराज भाषण
काही काळातच टिळकांचे वडील गंगाधरपंत हे सन १८७२ मध्ये निधन पावले. पण मित्रांनो, आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी गंगाधरपंतांनी काही रक्कम आधीच बाजूला काढून ठेवली होती. त्यामुळे, टिळकांनी डेक्कन कॉलेजमध्ये आपले नाव नोंदवले आणि महाविद्यालयातील पहिल्या वर्षी नियमित व्यायाम करून स्वतःची प्रकृती सुदृढ व निकोप राखण्यावर त्यांनी भर दिला.
या कमावलेल्या शरीराचा पुढे दगदगीच्या राजकीय जीवनात व कारावासात त्यांना फार मोठा उपयोग झाला हे मात्र खरं! यानंतर, सन १८७६ मध्ये लोकमान्य टिळक बी.ए. पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले.
परंतू मित्रांनो, टिळक एम्. ए. मात्र होऊ शकले नाहीत. डेक्कन कॉलेजमध्ये असताना टिळक आणि आगरकर यांचा स्नेह जमला. याच महाविद्यालयात दोघांनी देशकार्याला वाहून घेण्याचा संकल्प केला. याच सुमारास निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून सर्वांसाठी शाळा काढण्याचे ठरविले होते; तेंव्हा टिळक व आगरकर हे दोघेही त्यांना मिळाले आणि शेवटी दिनांक १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली.
मित्रहो, या शाळेत काम करण्यासाठी टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला. चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी सन १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला आणि त्यांनी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली.
प्रारंभी आगरकर हे केसरीचे तर, टिळक हे मराठ्याचे संपादक होते. वृत्तपत्रांच्याद्वारे लोकशिक्षण, राजकीय जागृती व शासकीय अन्यायाचा प्रतिकार हे त्यांचे ऐतिहासिक कार्य खऱ्या अर्थाने इथूनच सुरू झाले होते.
- नक्की वाचा: राजमाता जिजाऊ भाषण मराठी
वृत्तपत्रीय जीवनाच्या प्रारंभीच कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधवराव बर्वे यांच्यावर केसरी व मराठ्यातून अनेक लेख प्रसिद्ध झाले. माधवराव बर्वे यांच्या गैरकारभारावर तसेच, इंग्रज सरकारच्या छत्रपती शिवाजींसंबंधीच्या गैरवर्तवणुकीवर त्यांनी कडाडून अशी टीका केली. खरंतर, त्याबद्दल टिळक आणि आगरकर या दोघांनाही चार महिन्यांची शिक्षा होऊन, त्यांना डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले.
काही काळानंतर म्हणजेच इसवी सन २६ ऑक्टोबर १८८२ रोजी त्यांची तुरूंगातून सुटका करण्यात आली. या कालावधीतच विष्णुशास्त्री सन १८८२ मध्ये मरण पावले; तथापि १८८४ मध्ये वेडरबर्न, वर्ड्स्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, य.मो. केळकर, भांडारकर वगैरे प्रभृतींच्या मदतीने टिळक–आरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे सन १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची देखील स्थापना केली.
मित्रांनो, लोकमान्य टिळक गणित व संस्कृत विषय विद्यार्थ्यांना खूप आवडीने शिकवत असत. पुढे टिळकांचे संस्थेतील एकंदर धोरणासंबंधी अनेक मतभेद झाले आणि त्यामुळे, आपल्या चाळीस पानी राजीनाम्यात टिळकांनी ‘निर्वाहापुरते वेतन’ या तत्त्वाऐवजी ‘सांपत्तिक स्थितीनुसार वेतन’ तसेच ‘राष्ट्रीय शिक्षण संस्था’ या उद्दिष्टाविरुद्ध ‘सरकारच्या मदतीवर चालणारी संस्था’ हे धोरण आपल्या संस्थेच्या मूळ धोरणाला धक्के देणारे आहे, असे आग्रहाने सांगितले.
त्यामुळे, टिळकांच्या या संभाषणावर त्यांचा आगरकरांशी वाद झाला. याशिवाय, या दोघांचा दुसरा वाद ‘आधी कोण? राजकीय की सामाजिक?’ या विषयावर देखील झाला होता. या वादाचे मुख्य कारण असे होते की, आगरकरांना सामाजिक सुधारणा महत्त्वाच्या वाटत होत्या आणि देश सुधारण्यासाठी किंवा स्वातंत्र्यासाठी ते सामाजिक सुधारणांना प्राधान्य देत होते.
परंतु, दुसरीकडे स्वतंत्रतेचा किंवा राष्ट्रीयत्वाचा अभिमान म्हणून जो काही जोम आहे, तो जोपर्यंत जाज्वल्य व जागृत आहे; तोपर्यंतच आहे, अशी टिळकांची भूमिका होती.
- नक्की वाचा: शिक्षक दिनाचे भाषण
स्वाभिमान, उत्साह, स्वराज्यनिष्ठा हाच राष्ट्राचा खरा आत्मा किंवा जीव आहे आणि हा जिवंतपणा जेथे वसत आहे, त्या ठिकाणी सुईच्या मागोमाग जसा दोरा असतो, त्याचप्रकारे सामाजिक सुधारणाही मागोमाग येत असतात, अशी इतिहासाची साक्ष आहे; असे लोकमान्य टिळक आग्रहपूर्वक सांगत असत.
राष्ट्राची सामाजिक प्रगती होऊ नये, असे त्यांचे म्हणणे नव्हते; पण, ही सामाजिक प्रगती केवळ राजकीय प्रगतीच्या आणि स्वाभिमानाच्या अनुषंगानेच झाली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते.
मात्र, आगरकरांची भूमिका याच्या बरोबर विरुद्ध होती. सामाजिक सुधारणेशिवाय देश स्वातंत्र्याला पात्र होणार नाही, म्हणून प्रथम समाजातील रूढी, अज्ञान, अंधश्रद्धा, पाप-पुण्याच्या कल्पना यांच्या पाशांतून समाजाची मुक्तता झाली पाहिजेत, समाजातील जातिभेद नष्ट झाले पाहिजेत, तसेच परकीय सरकारने लोकमताची पर्वा न करता सुधारणेसाठी योग्य ते कायदे करावेत, असे आगरकरांचे मत होते.
टिळकांचे म्हणणे असे होते की, ‘आमच्या सुधारणा आम्हीच करू, परकीय सत्तेची ढवळाढवळ आमच्या सामाजिक अथवा धार्मिक बाबतीत होऊ नये. मात्र लोकमत अनुकूल असेल आणि धर्मवचनांच्या बाबतींत तडजोड होत असेल, तर असा कायदा करण्यास आमची काही हरकत नाही’.
या व अशा अनेक प्रकारच्या वर्णव्यवस्था, वेदोक्त प्रकरण आदी धार्मिक बाबींशी संबंध येणाऱ्या गोष्टींवर जे वाद झाले, त्यांसंबंधी टिळकांची भूमिका ही त्यांच्या धर्मविषयक श्रद्धेतून घडविली गेली होती, असे दिसते. टिळकांना राष्ट्राइतकाच हिंदू धर्माचाही जाज्वल्य अभिमान होता.
धर्म हा त्यांच्या व्यासंगाचा विषय होता. त्यांनी वेद, उपनिषदे, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्रे, गीता व आचार्याची भाष्ये यांचा गाढा अभ्यास केला होता. लोकमान्य टिळक हे हिंदुत्व म्हणजे स्वत्वाचे फळ आहे असे मानत असत. ज्या व्यक्तीला हिंदुत्वाचा अथवा हिंदू धर्माचा अभिमान नाही, त्या व्यक्तीला हिंदू लोकांनी काय समाजसुधारणा कराव्यात ते सांगण्याचा अधिकार नाही, असे ते ठामपणे म्हणत.
मित्रहो, स्वराज्य हा त्यांचा प्रधान हेतू होता. याकरिता, ब्रिटिश सरकारच्या राज्यकारभारातील दोष व अन्याय यांवर लोकमान्य टिळकांनी वृत्तपत्रांतून उघड टीका करून त्यांनी कायद्याची मर्यादा प्रथम सांभाळली.
तसेच, प्रांतिक परिषदा व काँग्रेसच्या कार्यात भाग घेऊन त्याचे स्वरूप जहाल राष्ट्रवादी बनविले व जनतेच्या मनात ज्वलंत देशाभिमान व स्वातंत्र्यप्रेम चेतवून, स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष संघर्ष करण्यास लोकांची मनोभूमिका तयार करण्याचा प्रयत्न देखील केला.
मित्रहो याशिवाय, लोकांच्या मनातील स्वातंत्र्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी लोकमान्य टिळकांना अर्ज विनंत्यांचे राजकारण करणाऱ्या नेमस्त पक्षांविरुद्ध सुद्धा सतत संघर्ष करावा लागला होता. ब्रिटिश सत्ता म्हणजे ईश्वरी अंश आहे आणि हे उदारमतवादी इंग्रज हळूहळू भारताचे राजकीय हक्क मान्य करतील, त्यांच्या सदिच्छेवर अवलंबून राहणे, हीच उत्तम नीती होय;
अशी त्याकाळी अनेक नेमस्त पक्षांची असलेली भूमिका सोडून, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, या भूमिकेपर्यंत आपण लोकांना नेण्याचे कार्य केले पाहिजेत, असा लोकमान्य टिळकांचा संकल्प होता.
त्याचबरोबरीने, केसरी आणि मराठ्यातील तेजस्वी लेखांनी तसेच प्रसंगोपात्त प्रखर भाषणांनी लोकजागृतीचे कार्य देखील टिळकांनी प्रभावीपणे केले. त्याकाळी, संमतिवयाच्या कायद्यावरून आपल्या भारत देशामध्ये जी धामधूम माजली होती, या धामधुमीत कायदयाविरोधी असलेल्या पक्षाचे अग्रेसरत्व टिळकांकडे सोपवले होते.
भारतीय समाजात सुधारणा पाहिजेत, परंतु ही सुधारणा सरकारी कायद्याने होणे योग्य नाही,अशी विचारसरणी टिळकांनी पुरस्कारली होती. खरंतर, या वादात धर्मशास्त्राची गुंतागुंत खूप होती, म्हणून डॉ. भांडारकरांनी कायद्याला पुष्टी देणारा एक लेख लिहिला. त्यावेळी टिळकांनी त्याचा निकराने प्रतिवाद केला.
टिळकांनी जरी कायद्याविरुद्ध आंदोलन आरंभिले असले, तरी काही सुधारणा अंमलात याव्यात यासाठी टिळक एक संस्था स्थापण्याचा विचार करीत होते आणि त्या संस्थेतर्फे काही मौलिक सुधारणांची वाच्यता देखील झाली होती. उदा., वयाच्या सोळा वर्षांच्या आतमध्ये मुलींची व वीस वर्षांच्या आतमध्ये मुलांची लग्नं करू नयेत; कोणी कुणास हुंडा वगैरे देऊ नये; विधवांचे वपन करू नये इत्यादी.
यानंतरच्या काळात पुणे जिल्ह्यातील पंचहौद मिशनच्या चालकांनी सन १८९० मध्ये पुणे शहरातील काही प्रतिष्ठितांना व्याख्यानाच्या निमित्ताने पाचारण केले. व्याख्यानाच्या वेळी उपस्थित असलेल्या सर्व गृहस्थांसाठी चहा-बिस्किटांचा पाहुणचार ठेवण्यात आला होता.
मित्रांनो, हा सर्व समारंभ गोपाळराव जोशी यांनी घडवून आणला होता आणि पुणे वैभव या पत्रात यासंबंधीची सविस्तर हकीकत सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली होती. काहींनी तर अब्रुनुकसानीचा दावा पुणे वैभववर लावला. आपल्या लोकमान्य टिळकांनी तेथे चहा घेतला असल्यामुळे, पुढे प्रायश्चित्ताचा विषय निघाला.
या सर्व पापी लोकांना कुणी शिक्षा द्यायची? हा प्रश्न उपस्थित होऊन शेवटी शंकराचार्यांकडे वादी या एका नात्याने काहींनी फिर्याद केली. खरंतर, अशा प्रसंगी अनेक कारणांवरून बाकीचे लोक सुटले. परंतू, टिळकांनी मात्र काशीक्षेत्रात सर्व प्रायश्चित्त केल्याचा दाखला दाखविला; यामुळे ते सुद्धा या प्रकरणातून मुक्त झाले.
- नक्की वाचा: स्वातंत्र्य दिनाचे भाषण
यानंतर, इसवी सन १८९३ मध्ये हिंदु आणि मुसलमानांचे अनेक ठिकाणी दंगे झाले. या संघर्षात हिंदू आणि मुसलमान असे दोनच पक्ष नसून, भारतीय सरकार हा एक तिसरा पक्ष आहे, हे लक्षात घेतल्याशिवाय दंग्यांच्या कारणांची उपपत्ती लागणार नाही, असे टिळकांचे मत होते. खरंतर, सरकारचे पक्षपाती धोरण म्हणजेच ‘फोडा आणि राज्य करा’ ही राजनीती, या दंग्यांस कारणीभूत होती;
अशी टीका लोकमान्य टिळक या संघर्षाच्या वेळी सतत करत होते. नेहमी सर्वांनी सुख-संतोषाने राहून एकमेकांच्या हक्कांस जपावे, असे त्यांचे म्हणणे होते. मित्रांनो, हिंदू आणि मुसलमानी लोकांच्या या दंग्यांनंतरच टिळकांनी लोकजागृतीची साधने म्हणून गणपती व शिवजयंती या उत्सवांना सार्वजनिक स्वरूप द्यायचे मनात ठसवले.
दिनांक १८ सप्टेंबर १८९४ आणि १५ एप्रिल १८९६ या अनुक्रमे केसरीच्या दोन अंकांत टिळकांनी या उत्सवांचे उद्देश सुद्धा स्पष्ट केले, यामध्ये: राष्ट्रीय जागृती करणे, स्वातंत्र्याकांक्षा वृद्धिंगत करणे, महापुरुषांचे स्मरण करणे आणि धर्म व संस्कृती यांचे ज्ञान सामान्य जनांस करून देणे, असे उद्देश होते.
पुण्यात प्रतिष्ठित झालेली सार्वजनिक सभा त्यांनी नेमस्तांचा पराभव करून आपल्या ताब्यात घेतली आणि दुष्काळ निवारणाचे महत्त्वाचे कार्य सुरू केले. इसवी सन १८९६ च्या दुष्काळात शेतकऱ्यांना त्यांनी सांगितले की, पीक कमी असेल तर सारामाफी हा तुमचा हक्क आहे, तो तुम्ही हक्काने मागून घ्या. काही वर्षातच मित्रहो, दुष्काळाच्या पाठोपाठ प्लेग हा रोग आला.
त्यावेळी, प्लेग प्रतिबंधासाठी नेमलेल्या कमिशनर रँड याच्या हाताखालील गोऱ्या अधिकाऱ्यांनी धुमाकूळ घातला, तेंव्हा त्यावर टिळकांनी टीकेची झोड उठविली आणि आपद्ग्रस्तांसाठी स्वस्त धान्य दुकाने काढली तसेच, लोकांच्या सेवेसाठी सार्वजनिक रुग्णालये देखील उघडली. यानंतर, दिनांक २२ जून १८९७ रोजी चाफेकरबंधूंनी रँडचा खून केला. त्यावेळी सरकारने पुण्यावर अनन्वित जुलूम केला.
त्यामुळे, लोकमान्य टिळकांनी ‘राज्य करणे म्हणजे सूड उगविणे नव्हे’, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे एकापाठोपाठ एक प्रखर लेख लिहिले.
परिणामतः त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप लावण्यात आला आणि त्यांच्यावर खटला भरण्यात आला. अशा रीतीने, टिळकांना अठरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. परंतू, टिळक मोठे विद्वान असल्याने त्यांना शिक्षा करणे बरे नव्हे, असे माक्स म्यूलर यांनी सरकारला सांगितले; त्यामुळे टिळकांना दिलेल्या शिक्षेतील सहा महिने सरकारने कमी केले आणि खरंतर त्यामुळेच दिनांक ६ सप्टेंबर १८९८ रोजी टिळक तुरुंगातून लवकर मुक्त झाले.
टिळकांच्या खऱ्या कारकीर्दीला आणि अखेरपर्यंत चालविलेल्या त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामाला इसवी सन १८९९ नंतरच अधिक वेग आला , अस आपल्याला म्हणावं लागेल. कारण, यावर्षी टिळक एकतर राजद्रोहाची शिक्षा भोगून परत आले होते आणि त्यांची लोकप्रियता देखील वाढली होती.
शिवाय मित्रहो, शिक्षा भोगूनही टिळकांच्या ध्येयधोरणांत तीळमात्रही बदल झाला नाही, हे त्यांच्या ४ जुलै १८९९ रोजी लिहिलेल्या ‘पुनश्च हरिः ॐ!’ या केसरीतील अग्रलेखावरून आपल्याला स्पष्ट होते.
टिळकांनी लॉर्ड कर्झन याच्या कारकीर्दीवर, विशेषतः त्याने लादलेल्या शिक्षणसंस्थांवरील बंधनांवर कडाडून टीका केली. शिवाय, वसाहतवादाच्या धोरणावर सुद्धा त्यांनी जोरदार हल्ला केला आणि केसरीच्या अग्रलेखात इंग्लंडचा नैतिक व बौद्धिक अधःपात होत आहे, असे सर्वांना निक्षून सांगितले.
याचवेळी टिळकांनी राष्ट्रसभेच्या कार्याविषयी नवीन विचार देखील मांडले. जनतेत प्रचंड चळवळ उभारून सर्व राष्ट्राची शक्ती राष्ट्रसभेच्या मागण्यांच्या मागे उभी केली पाहिजे, असे त्यांचे एकच ठाम मत होते. काही वर्षातच लॉर्ड कर्झन याने दिनांक २० जुलै १९०५ रोजी बंगालची फाळणी जाहीर केली.
या फाळणीमुळे सर्व भारत देशभर प्रक्षोभ उसळला आणि सगळीकडे उग्र आंदोलन सुरू झाले. लोकमान्य टिळकांनी बंगालमधील चळवळीला पाठिंबा दिला आणि स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुःसूत्रीचा त्यांनी हिरिरीने पुरस्कार केला.
आपली उन्नती करून घ्यावयाची असेल तर, ती स्वदेशी आणि बहिष्कार यांसारख्या मार्गांनीच! याशिवाय, स्वदेशी हतभागी झालेल्या आमच्या लोकांस वर येण्याचा जर काही मार्ग असला, तर तो स्वावलंबन व स्वार्थत्याग हाच होय; असा संदेश जनतेला देऊन लोकमान्य टिळक लोकांना प्रतिकाराचे आवाहन करू लागले.
अशा प्रकारे, लोकमान्य टिळकांनी आपले तन, मन, धन प्रामुख्याने राजकीय चळवळीकडे लावलेले असले, तरी त्यांनी ज्या इतर काही कार्यांत लक्ष पुरविले; ती कार्यही मित्रांनो तितकीच महत्त्वाची आहेत हे खरं! राजकीय कार्याबरोबरच टिळकांची अनेकविध सामाजिक कार्ये देखील चालू होती.
यामध्ये, सुरत काँग्रेसनंतर टिळकांनी दारूबंदीची चळवळ सुरू केली आणि त्यावर लेख लिहून त्यांनी जनतेला व्याख्यानेही दिली. लोकमान्य टिळकांनी पैसाफंड ही संस्था वृद्धिंगत करून, लाखो रुपयांचा निधी सामाजिक हितासाठी जमा केला होता.
मित्रांनो, लोकमान्य टिळकांची आक्रमकता आणि सरकारला थेट भिडण्याची वृत्ती हे गुण सर्वांना आश्चर्य करणारे होते. भगवदगीता पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी टिळकांनीच अहोरात्र प्रयत्न केले होते.
स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक या दोघांचे स्वातंत्र्योत्तर भारताबद्दलचे चिंतन एकाच दिशेने जाणारे होते. सावरकरांनी जी क्रांती केली, तिची पायाभरणी लोकमान्यांनीचं केली. शिवाय, लोकमान्य टिळक आणि योगी अरविंद हे दोघेही आपल्या भारतीय इतिहासातील दोन दिग्गज होते.
कलकत्ता येथील एका ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशनासाठी अध्यक्ष म्हणून लोकमान्य टिळकांचे नाव पं. मालवीय यांनी सुचविले होते; पण मित्रहो, तत्पूर्वीच टिळकांचे मुंबईस काही दिवसांच्या आजारानंतर सरदारगृहात देहावसान झाले. खरंतर, लोकमान्य टिळकांना जवळजवळ १५ वर्षे मधुमेहाचा विकार होता. अखेरीस मलेरियाचा ताप व अतिश्रम यांमुळे त्यांना खूप थकवा आला.
परंतू, अशावेळी देखील आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याची त्यांना खूप तळमळ होती. मृत्यूसमयी त्यांच्याजवळ त्यांचे मुलगे, मुली व इतर आप्तेष्ट, तसेच न. चिं. केळकर, डॉ. साठे, डॉ. देशमुख, कृ. प्र. खाडिलकर वगैरे मित्रमंडळी होती. जेंव्हा लोकमान्य टिळकांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी मुंबईत व देशभर पसरली, तेंव्हा सारा भारत देश दुःखाच्या सागरात लोटला गेला. शिवाय, महात्मा गांधींनी देखील दिनांक १ ऑगस्ट हा दिवस असहकाराच्या चळवळीचा शुभारंभ म्हणून मुक्रर केला.
महात्मा गांधीजींनी टिळकांना श्रद्धांजली वाहताना सांगितले की, ‘टिळकांची राष्ट्रभक्ती म्हणजे आसक्त्ती होती. त्यांचा धर्म म्हणजे देशप्रेम होते. ते जन्मतःच लोकशाहीवादी होते. खरंतर, त्यांचे जीवन म्हणजे ग्रंथच म्हणावा लागेल. त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांनी देशहितासाठी खर्ची घातली आणि स्वतःचे खाजगी जीवन मात्र धुतलेल्या तांदळासारखे स्वच्छ ठेवले.
लोकमान्य टिळकांनी आपली प्रखर बुद्धिमत्ता देशकार्यासाठी समर्पित केली. शिवाय, लोकमान्य टिळकांइतके सातत्याने कोणत्याही व्यक्तीने स्वराज्याचे तत्त्व आतापर्यंत सांगितले नव्हते. इतिहासामध्ये त्यांचे नाव आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून नोंदवले जाईल आणि भावी पिढी लोकमान्य नेता म्हणून आदराने त्यांचे स्मरण करील.’
टिळकांनी केसरीतून एकापेक्षा एक असे अनेक सरस अग्रलेख लिहिले होते. त्यांच्या या प्रखर आणि ब्रिटिशांविरुद्ध लिहिलेल्या लेखांबद्दलच्या राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना तीन वेळा कारावास सुद्धा भोगावा लागला होता. तथापि, त्यांनी आपल्या लेखनविषयक धोरणात किंचितही बदल केला नाही. त्यामुळे केसरीचा खप पुढे झपाट्याने वाढला व तो लोकप्रिय सुद्धा झाला.
अशा रीतीने, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वाभिमानासाठी अहोरात्र झगडणाऱ्या एका थोर स्वातंत्र्यसेन्याचा अंत झाला. पण, आजही त्यांची महिमा, कर्तृत्व आणि विचार आपणा सर्वांमध्ये जिवंत आहेत, जे आपल्याला सतत त्यांची आठवण करून देतात. अशा या माझ्या थोर आणि महान नेत्याला माझा कोटी कोटी प्रणाम!
– तेजल तानाजी पाटील
बागीलगे, चंदगड.
आम्ही दिलेल्या lokmanya tilak speech in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “लोकमान्य टिळक माहिती भाषण” lokmanya tilak bhashan in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या lokmanya tilak speech in marathi for child या lokmanya tilak speech in marathi language article मध्ये upadate करू, मित्रांनो हि short speech on lokmanya tilak in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण short speech on lokmanya tilak punyatithi in marathi या लेखाचा वापर lokmanya tilak marathi speech असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट