Chhatrapati Shivaji Maharaj Speech in Marathi – Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Speech in Marathi शिवाजी महाराज भाषण छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील सर्वश्रेष्ठ आणि आदर्श राजा होते. माझ्या थोर महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्हयातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला. त्यांच्या महान मातोश्रींचे नाव ‘जिजाबाई‘ तर, त्यांच्या कर्तृत्ववान वडिलांचे नाव ‘शहाजी‘ असे होते. शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षांपर्यंत आई जिजाऊच्या देखरेखेखाली अनेक संस्कार आत्मसात केले तसेच, शहाजी राजांनी नेमलेल्या नामवंत शिक्षकांकडून माझ्या राजांनी अनेक कला, विद्या आणि भाषा अवगत केल्या.
शिवरायांपूर्वी सुमारे चारशे वर्ष आधी आपल्या महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्राचा बहुतांश भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांच्या सत्तेखाली होता. आपल्या मातीतील यांची सत्ता उधळून लावण्यासाठी आणि जनतेला सुखी तसेच, आनंदी ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे पवित्र असे कार्य हाती घेतले.
छत्रपती शिवाजी महाराज भाषण – Shivaji Maharaj Speech in Marathi
शिवाजी महाराजांचे भाषण – Shivaji Maharaj Bhashan
शिवरायांच्या जन्मानंतर सुमारे दीड वर्ष शिवरायांचे कुटुंब हे शिवनेरी किल्ल्यावर एकत्रितपणे राहत होते. जवळजवळ सात वर्षे राजमाता जिजाऊ आऊसाहेब व बाल शिवाजी शिवनेरी वर होते. बाल शिवाजी जेव्हा एक वर्षाचे झाले, तेव्हा मुलखात दुष्काळाने उग्र स्वरुप धारण केलेले होते.
त्यानंतर सन १६३२ ते १६३६ ह्या दरम्यान छत्रपती शहाजी महाराजांनी निजाम वंशातील लहान पोराला गादीवर बसवून निजामशाही स्वतःच चालवायचा प्रयत्न केला. त्यामुळे १६३२ ते १६३६ मध्ये शहाजी महाराज आणि संभाजीराजे मोघलांशी लढण्यात मग्न होते. पुढे १६३६ च्या उत्तरार्धात निजामशाही बुडाल्यावर शहाजी राजे आदिलशहाकडे बारा हजारी “फर्जंद” वजीर म्हणून गेले.
तिथल्या तहामध्ये नमूद केल्याप्रमाने शहाजी भोसले महाराजांना रानदुल्ला खानाबरोबर कर्नाटकात तुरंत जावे लागले. तहाप्रमाणे गडकोटांचा ताबा मुघल साम्राज्याच्या सरदारांनी घेतला व बादशहाच्या आज्ञेप्रमाणे जिजाऊ महासाहेबांना शिवनेरी वरून आपल्या सर्व जीनगी लोकांसोबत उतरू दिले.
प्रथम जिजाबाईंना “चौलात” ठेवायचा शहाजी महाराजांचा प्रयत्न होता. परंतु पोर्तुगीजांनी जिजाऊ मातेला त्यांच्या हद्दीतून दुसरीकडे नेऊन कुठंही इतरत्र ठेवण्याची शहाजी महाराजांना सूचना केली. तेंव्हा शहाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ मातेला खेडला (शिवापूर) पाठविले. तिथे त्यांचा वर्षभर मुक्काम होता.
(शिवापूर) खेड हे दादाजी कोंडदेवाने शहाजी राजांच्या आज्ञेवरून नुकतेच वसवलेले खेडे होते. पुढे इसवी सन १६३७ च्या अखेर राजमाता जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांसह कर्नाटकात रहायला निघून गेल्या. तिथे शहाजी महाराजांनी शिवाजी महाराज सात वर्षाचे झाल्यावर, अक्षर ओळख व जुजबी गणित त्यावेळच्या पद्धतीने शिकवले.
त्याकाळी एवढेच काय ते शिक्षण “अध्ययना” खाली त्रैवर्णिकांना दिले जात असे. परंतु वडिलांच्या व्यावहारिक अनुभवाचा मुलांना पूर्ण वाटा घेता येत होता. वैश्यांना फक्त आपल्या रोजच्या हिशोबापुरता लेखन वाचनाचा सराव असे.
क्षत्रिय आणि ब्राह्मणांना अक्षर ओळखी नंतर जर त्यात धंदा किंवा रोजगार करावयाचा असेल, तरच ते या संस्कारानंतर अधिक लेखन वाचनाचा सराव करू शकत. अन्यथा आपल्या वंशातील मोठ्या माणसांच्या सान्निध्यात राहून त्यांच्याकडून स्वतःला पारंपारिक कला आणि कौशल्य आत्मसात करावी लागत असत.
- नक्की वाचा: जय जय महाराष्ट्र माझा निबंध
त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी देखील महादेव भटाकडून अक्षर ओळख करून घेतली, तसेच तलवारबाजी, घोडेस्वारी अशा अनेक कला त्या त्या क्षेत्रात माहीर असणाऱ्या व्यक्तींकडून याच काळात त्यांनी शिकून घेतल्या. सगळ्यात महत्वाचे म्हणजे राजनीतीचे डावपेच अथवा राज्यकारभाराची कार्यपद्धती हे सर्व शिवाजी महाराजांनी ह्या काळात आपले वडील शहाजी महाराज व वडील बंधू संभाजी महाराज ह्यांच्याकडून शिकवून घेतले.
याच दरम्यान १६४० च्या अखेरीस शिवाजी महाराज यांचे लग्न निंबाळकर पवार यांच्या “जिऊबाई” नावाच्या मुलीशी झाले. पुढे १६४२ साली शहाजी महाराजांविरुद्ध आदिलशाहीतील कारस्थाने वाढत गेली आणि यातच रन्दुल्लाखान मेल्यावर त्याचा पोरगा कमी कर्तुत्वी निघाल्याने अफजलखानाला त्याची जहागीर मिळाली.
त्याने बाजी घोरपड्या सारखे सरदार गोळा करून शहाजी महाराजांविरुद्ध कारस्थान रचले. त्यानुसार शहाजी महाराजांचा बराच प्रदेश त्यांच्याकडून आदिलशाहने काढून घेतला व त्याने त्यांचेच भाऊबंद असलेले बाजी घोरपडे यांना ते सर्व प्रदेश दिले. शहाजीराजे यांचे मुतालिक दादाजी कोंडदेव ह्यांची बाही बाजी घोरपाड्याने कापली.
हे सर्व बघून आदिलशाहीतील आपली पकड ढिली पडतेय आणि आपल्याविरुद्ध षडयंत्र शिजतेय हे ओळखून शहाजी महाराजांनी शिवाजीराजे आणि जिजाऊ ह्यांना पुणे प्रांतात पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच आपण आदिलशाही सोडू इच्छितो, अश्या आशयाचे बोलणे त्यांनी आदिलाशाहीशी लावून ठेवले.
१६४२ च्या अखेर शिवाजी राजांना शहाजी महाराजांनी पेशवे, मुजुमदार, सबनीस , व सैन्यासह पुणे प्रांती रवाना केले. ह्यामुळे शहाजी राजे मोघलांशी संधान साधतोय कि काय ह्याची भीती आदिलशाहाला झाली. त्यामुळे, आदिलशहाने शहाजींशी चाललेल्या वादावर पडदा टाकला. शहाजी राजांकडून काढून घेतलेल्या जहागिरीपेक्षा जास्त किंमतीचा सन्मान आदिलशहाने दिला.
- नक्की वाचा: छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण माहिती
१६४४ साली आदिलशाहने शहाजी राजांकडून आधीच्या काढून घेतलेल्या चार लक्ष जहागिरीऐवजी पाच लाखाचा सुभा बंगळूरला दिला व तिकडे शहाजी राजांना रवाना केले. इथे शिवाजी महाराजांना पुणे प्रांती पाठवून, शहाजी महाराजांनी मोठी राजकीय खेळी तर खेळलीच पण चालू वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजी राजांकडून त्या प्रकारचे बंडयुक्त कार्य करण्याचे आदेश आपल्या साथीदारांना पाठवले होते.
परिस्थितीचा फायदा उठवण्यात शहाजीराजे पुन्हा एकदा यशस्वी झाले. अवघ्या वयाच्या १२-१३ व्या वर्षी शिवाजी राजांना स्वतंत्रपणे वाटचाल करावी लागली. पण, स्वतः शहाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे बंधू संभाजी महाराजांवर देखील याच वयोमानात अश्या प्रकारची जवाबदारी अंगी पडली होती हे नमूद करण्यासारखे आहे.
छत्रपती शहाजी महाराजांवर देखील त्यांच्या लहानपणी अश्याच प्रकारची जबाबदारी पडली असताना त्यांना त्यांचे थोरले चुलत बंधू संभाजी राजे ह्यांचा आश्रय तसेच, मार्गदर्शन मिळाले होते. तर शिवाजी राजांचे वडील बंधू संभाजी राजे यांना तर वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी साक्षात शहाजी महाराज यांचे मार्गदर्शन घेण्याची संधी मिळाली.
शिवरायांना देखील योग्य ते मार्गदर्शन मिळाले ते फक्त राजमाता जिजाऊंमूळे. राजमाता जिजाऊ या एक आदर्श मातोश्री होत्या, त्यांच्यामुळेच आपल्या राज्याला एक आदर्श राजा मिळाला. शिवाजी महाराजांना घडविण्यात त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे.
छत्रपती शहाजीराजे भोसले हे मालोजीराजे ह्यांचे पुत्र आणि छत्रपती शिवाजीराजे ह्यांचे वडील होते. छत्रपती शहाजी राजे हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन आणि स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुणांना शिवबामध्ये रोपणारे होते. छत्रपती शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते.
- नक्की वाचा: राजमाता जिजाऊ संपूर्ण माहिती
छत्रपती शहाजीराजांनी तुकाबाईंशी दुसरे लग्न केले होते. त्यावेळी लहानग्या शिवरायांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या होत्या. शिवरायांची वयाची सहा वर्षे खूप धावपळीची गेली. या दरम्यान जिजाऊ ह्यांनी छत्रपती शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. परंतू, दिवसभर शिवराय आपल्या सवंगड्यांसह खेळायचे, मोकळ्या रानात फिरायचे, कुस्ती खेळायचे; लाठी चालवणे, तलवारबाजी करणे हे सर्व ते करत रहायचे.
शिवाजी महाराज दिवसभर खेळून दमले की संध्याकाळी जिजाऊ सांजवात करायच्या आणि त्यांना जवळ घेऊन रामाच्या, कृष्णाच्या, अभिमन्यूच्या तर कधी भीमाच्या गोष्टी सांगायच्या. याशिवाय, नामदेव, एकनाथ आणि ज्ञानेश्वरीतील त्या अभंग देखील म्हणून दाखवायच्या. कधी त्या शूरवंताच्या गोष्टी सांगायच्या, तर कधी साधुसंतांच्या थोर विचारांच्या कथा सांगायच्या; जेणेकरून शिवबाच्या मनात या सर्व गोष्टी आदर बनून रहाव्यात.
शिवरायांचे सवंगडी गरीब मावळ्यांची मुले होती. शिवराय त्यांच्याकडची मीठ भाकर त्यांच्यासोबत बसून आनंदाने खायचे. यानंतरच्या काळात शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य उभारले. आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले.
आपल्या वडिलांकडून मिळालेल्या दोन हजार सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून खूप उत्साहाने साजरा होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख ‘शिवशंभू’ असा केला जातो.
सर्वसाधारणपणे शिवाजी महाराजांचा जन्म १६३० ते औरंगजेबाचा मृत्यू १७०७ ह्या ७७ वर्षांच्या काळास इतिहासकार ‘शिवकाल’ असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरू आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया (भारताचा शोध) या ग्रंथात म्हणतात: “छत्रपती शिवाजी महाराज हे प्रतिहल्ला करणाऱ्या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते.
“आपल्या राजांच्या इतिहासातून त्यांनी प्रेरणा मिळविली. महाराज अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारे नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केले, त्यांच्यामागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि या गटास अशी चेतना दिली की या गटाशी धडका घेत मुघल साम्राज्य अखेर मोडकळीस देखील आले.
अशा छत्रपतींचा मृत्यू १६८० मध्ये झाला. पण, त्यांच्यानंतर संपूर्ण भारतावर प्रभुत्व प्रस्थापित होईपर्यंत मराठ्यांचा राज्यविस्तार हा होतच राहिला. इ.स. १६४७ मध्ये सतरा वर्षांच्या शिवबांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि आपल्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. खरंतर, तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले.
त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा (सिंहगड) आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून घेऊन, पुणे प्रांतावर त्यांनी पूर्ण नियंत्रण मिळवले. याशिवाय शिवबांनी तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व मुरुंबदेव गडाचे नवीन नामांकन केले. मुरुंबदेव गडाचे त्यांनी ‘राजगड‘ असे नाव ठेवले.
त्यानंतर हा गड याच नावाने सगळीकडे ओळखला जाऊ लागला. छ्त्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले तेंव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे;
संस्कृत : प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते.
मराठी: ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशाच प्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.
शिवाजीराजांच्या यशस्वी स्वाऱ्या बिथरून टाकून शिवबांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली. याशिवाय सुमारे पाच हजार लोकांच्या फौज घेऊन फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ल्यावर फत्तेखानाचा पराभव केला.
त्यावेळी, बाजी पालसकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवड पर्यंत गेला होता. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पालसकरांचा मॄत्यू झाला. शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदारा कडून ‘शहजादा मुरादबक्ष’ हे पत्र पाठवून शहाजीराजांसोबत त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली.
त्याचा परिणाम म्हणून शाहजहानने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजी महाराजांना कोंढाणा किल्ला आणि शहाजी महाराजांना बंगळूर शहर, कंदर्पीचा किल्ला तहानुसार आदिलशहाला द्यावे लागले.
आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी इ.स. १६५६ साली शिवबाने रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे, कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.
इ. स. 1659 पर्यंत महाराजांनी जवळपासचे पश्चिम घाटातील व कोकणातील जवळजवळ ४० किल्ले जिंकले होते. आदिलशहाच्या ताब्यातील किल्ले शिवबा जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने भर दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला.
हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला होता. अफझलखान वाईजवळ आला, तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडावर त्यास तोंड देण्याचे ठरविले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता.
पण शिवाजी महाराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील) अफझलखानाला बोलण्यात गुंतवून प्रतापगडावरच भेट घेण्यास सांगितले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी नि:शस्त्र राहण्याचे ठरले. त्यावेळी, शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना होती.
- नक्की वाचा: शहाजीराजे भोसले संपूर्ण माहिती
त्यामुळे, त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे देखील ठेवली. राजांनी बिचवा चिलखतामध्ये दडविला होता, तर वाघनखे हाताच्या पंज्याच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे कुणालाही सहजपणे दिसणारी नव्हती.
शेवटी प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या, बलदंड अशा अफझलखानाने शिवाजी महाराजांना जोराने आवळत मिठी मारली. त्यावेळी, शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याचवेळी अफझलखानाने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला. परंतु, चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले गेले.
अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची आरोळी चारी बाजू पसरली. सय्यद बंडाने लगेचच महाराजांवर दांडपट्ट्याचा जोरदार हल्ला केला, त्यावेळी तो वार तत्परपणे जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचवले. यामुळेच “होता जिवा म्हणून वाचला शिवा” ही म्हण तेंव्हापासून प्रचलित झाली.
आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले नंतर अफझल खानाच्या छावणीच्या आजूबाजूच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या शिव मावळ्यांनी हल्ला करून अफझल खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली आणि त्यांना पळवून लावले.
खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले होते. त्यांच्या पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी ते खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले.
अफझलखानाच्या मृत्यूनंतर राजांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली. त्यानंतर, स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापुरापर्यंत गेले त्याचबरोबर त्यांनी पन्हाळागड जिंकून घेतला.
मध्यंतरी नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास संपूर्ण विजापुरापर्यंत धडक मारली होती. शिवाजी राजांनी पुण्याजवळील मावळ प्रातांत नियंत्रण मिळवले होते. तेंव्हा हा भाग आदिलशाहीच्या अखत्यारीत येत होता. त्यांच्या दृष्टीने शिवाजी राजांचा बंदोबस्त करणे अत्यंत आवश्यक होते.
विजापूरच्या दरबारात शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याची मोहिम अफजलखानाकडे देण्यात आली होती. अफजलखानाने यापूर्वी शिवबांचे थोरले बंधू संभाजी यांची हत्या केली होती. तसेच, आदिलशाही दरबारात शिवाजी राजांचे वडील शहाजी यांचेही वैर होते. इकडे अफजलखान मोठा फौजफाटा घेऊन विजापूरहून जून १६५९ मध्ये निघाला. वाटेत येताना तो देवळे पाडत व मुर्तीभंग करत आला.
शिवाजी राजांनी खान येत आहे अशी बातमी ऐकल्यावर आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या प्रतापगड येथे हलवला. अफजलखानाने तुळजापूरच्या भवानी मंदीराचा उध्वंस केला व आपली नजर पंढरपूरच्या विठ्ठ्ल मंदीरावर वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदीरे जर अशा प्रकारे उधव्स्त केली तर शिवाजी महाराज चिडून बाहेर येतील आणि युद्ध करतील.
परंतु, शिवाजी महाराजांनी अजूनच बचावाचा ध्यास घेतला. त्यामुळे शेवटी सगळ्याला कंटाळून खानाने आपला मुक्काम वाई येथे टाकला. खान हा पूर्वी वाईचा सुभेदार असल्याने त्याला त्या भागाची चांगली माहिती होती. अफजलखानाच्या सैन्यात अनेक सरदारांचा समावेश होता. त्यातील काही प्रमुख सय्यद बंडा, फाजलखान, अंबरखान, याकुतखान, सिद्दी हिलाल, मुसाखान तसेच काही मराठे सरदार पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे जे आदिलशाहीत चाकरीला होते.
त्याच्या फौजेत १२,००० च्या घोडदळाचा समावेश होता तसेच, १०,००० पायदळ, १५०० बंदूकधारी सैनिक, ८५ हत्ती आणि १२०० ऊंटांचा देखील समावेश होता. अफजलखानाने जंजिऱ्याच्या सिद्दीशी हातमिळवणी करून कोकणच्या बाजूनेही आपले पाश आवळून घेतले. शिवबांनी आपले दूत पाठवून खानाला आपण घाबरलो असल्याचे दाखवले जेणेकरून खान बेसावध होईल आणि राजांना त्यांच्यावर चाल करता येईल.
आपल्याला खानाशी युद्ध करायचे नाही आणि आपण समझोत्यास तयार आहोत असे त्यांनी कळवले. दोन्ही बाजूंकडून घातपाताची शक्यता होती. परंतु शिवबांनी आपण खूपच घाबरलो असल्याचे अफझल खानाला दर्शविले त्यामुळे अफझल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तयार झाला. भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाहीत असे ठरले.
भेटीची वेळ नोव्हेंबर १६५९ रोजी ठरली. शिवाजी राजांनी जाणूनबूजून अतिशय भव्य शामियाना बनवला होता. निःशस्त्र भेटायचे ठरले असले तरी खानाने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता व खानाकडून घातपाताची शक्यता शिवबांनी १०० टक्के धरली होती. त्यामुळे, राजेंनी देखील अंगरख्याखाली चिलखत चढवले होते आणि लपवण्यास अतिशय सोपी वाघनखे हातामध्ये लपवली होती.
भेटीच्या सुरुवातीसच खानाने शिवाजी राजेंना अलिंगन देण्यास बोलवले व उंच अफजलखानाने शिवाजी महाराजांना आपल्या काखेत दाबून बिचव्याचा वार केला. महाराजांजवळ चिलखत असल्याने शिवाजी महाराज बचावले. खानाने दगा केलेला पाहून शिवाजी राजांनी स्वतः लपवलेली वाघनखे काढली व खानाच्या पोटात घुसवून त्याची आतडी बाहेर काढली.
- नक्की वाचा: छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण माहिती
अचानक अनपेक्षित प्रतिवाराने भेदरलेल्या खानाने आपल्या इतर अंगरक्षकांना सावध केले. दुसरीकडे सय्यद बंडाने शिवाजी राजांवर वार केला परंतु तो जिवा महालाने आपल्यावर घेतला व शिवाजी राजेंचा रस्ता मोकळा केला. इकडे खान त्याच्या पालखीत स्वार झाला परंतु संभाजी कावजीने प्रथम पालखी वाहणाऱ्या भोईंचे पाय तोडले व जखमी खानाला मारून त्याचे शीर धडापासून अलग केले.
शिवबांनी हे शीर नंतर आपल्या मातोश्रींना भेटीदाखल पाठवले. यानंतर राजेंनी झपाट्याने किल्ल्यावर प्रयाण केले आणि तोफांनी आपल्या सैन्याला अफजलखानाच्या सैन्यावर आक्रमण करायचे आदेश दिले. आपल्या मराठे सैनिकांच्या टोळ्या प्रतापगडाच्या जंगलामध्ये जागा धरून बसल्या होत्या.
तोफा धडाडताच त्यांनी अफजलखानाच्या सैन्यावर झपाट्याने त्यांना काही कळायच्या आत आक्रमण केले. कान्होजी जेधे याने आपल्या पायदळकडून बंदूकधार्यांवर आक्रमण केले. इकडे बाजी, सर्जेराव अन जावळीच्या खोऱ्यातील पिलाजी गोळे यांनी खानाच्या सैन्याला घाबरवून सोडले, दुसर्या एका कमानीच्या हल्यात मुसाखान जखमी झाला आणि तो तिथून पळून गेला.
अफजलखानाच्या सैन्याची वाताहत झाली. नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली घोडदळाने वाईच्या तळावर अचानकपणे हल्ला चढवला व तेथेही त्यांची वाताहत केली. आदिलशाही सेनेसाठी हा जबरदस्त पराभव होता. अफजलखानाचा वध हा संपूर्ण आदिलशाहीसाठी धक्का देणारी फार मोठी घटना होती.
जवळपास ५,००० सैनिक मारले गेले व तितकेच जखमी झाले. जवळपास ३,००० सैनिक युद्धबंदी बनवण्यात आले. मराठ्यांचे देखील त्यांच्या सैनिकक्षमतेच्या दृष्टीने थोडेफार नुकसान झाले. राजेंनी विरोधी सैन्यातील बंदीवासांना योग्य तो मान दिला. जखमींची योग्य ती शुश्रुषा केली गेली. कोणत्याही बंदीवान स्त्री अथवा पुरुषांवर अत्याचार झाले नाहीत.
बऱ्याच जणांना परत विजापूरला देखील पाठवण्यात आले. पुढील १५ दिवसात महाराजांनी सातारा, कोल्हापूर व कोकणात किल्ले काबीज करायचा धडाका लावला व त्यात त्यांना नेत्रदीपक यश मिळाले. कोल्हापूर जवळील पन्हाळा किल्ल्यापर्यंत त्यांनी मजल मारली. या घटनेनंतर शिवाजी राजेंना एक कुशल नेता म्हणून ओळख प्राप्त झाली.
अफजलखानासारख्या बलाढ्य सेनापतीचा पार धुव्वा उडवल्यामुळे शिवाजी राजेंचा भारतभर लष्करी दरारा वाढला. शिवबांच्या जीवनावर आधारित प्रत्येक चित्रपटात ही लढाई खासकरून शिवाजी राजेंचे अफजलखानाबरोबरचे द्वंद्व दाखवतात. लेखक रणजित देसाई यांची ‘लक्ष्यवेध’ ही या लढाईवर आधारित कादंबरी आहे.
इ.स. १६६६ साली औरंगजेबाने शिवाजी राजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासोबत नऊ वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु, भर दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजी सारख्या राजाचा खानाने उपमर्द केला.
या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता, त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली. आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि लगोलग राजे स्वराज्याकडे न जाता मथुरेकडे गेले.
तेथे संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले. एका संन्याशाच्या वेषात त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. ते स्वतः अतिशय लांबच्या, तिरकस आणि वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात सापडायचे नाही.
शिवाजी भोसले हे अभिषिक्त राजे नसल्याचे अनेक व्यावहारिक तोटे शिवरायांना व त्यांच्या साथीदारांना जाणवत होते. शिवाजीराजांनी अनेक जमिनींवर स्वामित्व स्थापन केलेले असले आणि अपार धन मिळविले असले, त्यांच्याजवळ मजबूत लष्कर तसेच नौदल असले, असंख्य सैनिकांवर त्यांचा हुकूम चालत असला तरी सैद्धांतिकदृष्ट्या त्यांची स्थिती ही राजासारखी किंवा सम्राटासारखी नव्हती.
शिवाय, मुघलांकरिता ते एक जमीनदार तर, आदिलशहासाठी ते एका जहागीरदाराचे बंडखोर पुत्र होते. त्यामुळे, राजे तेंव्हा कोणत्याही राजासोबत समान दर्जाचा दावा करू शकत नव्हते. तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामीनिष्ठेची अथवा भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते.
राज्याभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञांना किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते. त्यामुळे ६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजी राजेंनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन देखील जारी केले.
राज्याभिषेकाच्या दिवशी शिवाजी राजे पहाटे उठून, मंत्रोच्चार संस्काराबरोबर अंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेकाला सज्ज झाले. त्यानंतर, गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळी आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. या पवित्र दिवशी शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते.
त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. खरंतर कोणत्याही राजाच्या राज्याभिषेकामध्ये राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब आणि दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी दुसऱ्या मंचावर उपरण्याला साडीचे टोक बांधलेली राजांची पत्नी सोयराबाई बसल्या होत्या, तर बाल संभाजीराजे थोडेसे मागे बसले होते.
अष्टप्रधानातील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर त्यांनी जलकुंभांनी शिवाजी महाराजांवर गंगेच्या पाण्याचा अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य देखील निनादत होते.
विधिप्रमाने शिवरायांना सोळा सुवासिनींनी पंचारती ओवळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. त्यांनी जडजवाहिर, अलंकार परिधान केले. गळ्यात पुन्हा नवीन फुलांचे हार घातले. सगळ्यांच्या साक्षीने त्यांनी स्वतःच्या मस्तकावर राजमुकुट चढवला. शिवाजी राजांनी आपल्या ढाल – तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली.
मुहूर्ताच्या वेळी त्यांनी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. यानंतर, साम्राज्यातील जनतेने महाराजांना आशीर्वाद दिला. ’शिवराय की जय , शिवराय जय’ अशा घोषणा दिल्या गेल्या. महाराजांवर सोन्याचांदीची फुले उधळली गेली. विविध तालवाद्य आणि सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले.
ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत ‘शिवछत्रपती’ असा उच्चार केला आणि माझ्या राजाचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
अशा या महान राजाला माझा कोटी कोटी प्रणाम!
– तेजल तानाजी पाटील
बागीलगे, चंदगड.
आम्ही दिलेल्या shivaji maharaj speech in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “छत्रपती शिवाजी महाराजांचे भाषण” shivaji maharaj bhashan marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या shivaji maharaj jayanti speech in marathi या speech on chhatrapati shivaji maharaj in marathi article मध्ये upadate करू,
मित्रांनो हि shivaji maharaj speech in marathi mp3 माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण shivaji maharajanche bhashan या लेखाचा वापर chhatrapati shivaji maharaj speech in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट