राजमाता जिजाऊ भाषण मराठी Rajmata Jijau Speech in Marathi

Rajmata Jijau Speech in Marathi राजमाता जिजाऊ भाषण आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आयोजक, सूत्रसंचालक तसेच, उपस्थित सर्व विद्यार्थी वर्ग यांना मी नमस्कार करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. खरंतर, राजमाता जिजाऊ यांचा विषय या व्यासपीठाला मिळणं हे आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की आजच्या या भाषण स्पर्धेमुळे मला राजमाता जिजाऊ यांचाबद्दल बोलण्याची संधी मिळतेय. मित्रहो, राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल कुणाला काही माहीत नाही, असे कधीच होऊ शकत नाही.

ज्यांनी आपल्या  स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात देखील उतरविले, त्या म्हणजे आपल्या माँसाहेब जिजाऊ. भारतीय पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख हा केलेला दिसतो. या आदिशक्तीचे दर्शन सर्व  जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडले. माँसाहेबांचा उल्लेख करताना आपल्याला कुठल्याही संदर्भाची गरज पडत नाही.

“मुजरा माझा माता जिजाऊंना,

जिने घडविले शुर शिवबाला.

साक्षात होती ती आई भवानी,

जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी!”

rajmata jijau speech in marathi
rajmata jijau speech in marathi

राजमाता जिजाऊ भाषण मराठी – Rajmata Jijau Speech in Marathi

राजमाता जिजाऊ भाषण

अशा या महान राजमाता असलेल्या जिजाऊंचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हयातील  सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी १५९८ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव, तर आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते. लहानपणापासूनच जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती.

या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार आणि ढाल घेत युद्धकौशल्य अंगीकृत केले. आपल्या महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून मुघल सत्ता ही चालून येत होती आणि दीनदुबळ्या जनतेला लुटत होती. या मुघल सत्तेतील जे अमानुष लोक होते ते आपल्या आया-बहिणींच्या अब्रूवर हात घालत होते.

कोण थांबवणार त्यांना ? कुणी काही म्हणू नये आणि कुणी काही सांगू नये अशी एकंदर त्यावेळची परिस्थिती होती. परंतु, यापुढे हा अत्याचार सहन केला जाणार नाही. मुळात कुणी अत्याचार करताना दहा वेळा विचार करायला हवा असे काही तरी केले पाहिजे.

हा विचार आपल्या उराशी आपल्या राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी केला. १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाऊंच्या पदरी शिवबा जन्मले. शिवबाच्या जन्मामुळे माँसाहेबांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपला पुत्र शिवबा, आपण बघितलेले स्वराज्याचे स्वप्न नक्की पूर्ण करेल हे त्यांना ठाऊक होते.

शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्य कथा त्यांनी सांगितल्या. तलवारबाजी, युद्धकौशल्य स्वतः माँसाहेबांनी शिवबांना शिकविले होते. स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेबांकडून मिळाले होते. त्यामुळे, जिजाऊ मातेने बघितलेले हे  स्वप्न शिवरायांनी देखील सत्यात उतरविले.

मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत तसेच, अनेक पुराणांमध्ये एक गोष्ट आपल्याला चांगली ज्ञात झालेली आहे ती म्हणजे अनंत काळापासून जेंव्हा जेंव्हा गरज पडली आहे, तेंव्हा तेंव्हा नारीशक्तीने आपला अवतार घेतला आहे.

हे वाक्य जर आपण राजमाता जिजाऊ संदर्भात बोलले तर त्यात काही वावगं ठरणार नाही. आपल्या  महाराष्ट्रातील मोठ-मोठ्या सरदारांना जे जमले नाही ते जिजाऊ माँसाहेबांनी करून दाखविले. शिवबाच्या जन्माच्या अगोदरच माँसाहेबांनी त्यांचे ध्येय निश्चित केले होते. शिवबांनी सुद्धा मातेचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रण घेतला.

येण केण प्रकारेण स्वराज्य मिळवायचे हे छत्रपती शिवाजी राजांनी ठरविले. कुठल्याही मातेला स्वतःच्या पुत्र मोहापेक्षा काहीही प्रिय नसते. परंतु माँसाहेबांनी असा विचार मात्र कधीच केला नाही. स्वराज्य निर्माण करण्यात माँसाहेब जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे.

फक्त मुघलांपासून रक्षण करणे एवढेच नव्हे तर, न्यायनिवाड्याची कामे, नेतृत्व कौशल्य आणि एक मुस्तद्दी राजकारणी असे स्वतःमधील अनेक गुण सुद्धा त्यांनी शिवबांना दिले. आज आपण शिवबांना ‘जाणता राजा’ संबोधतो ते केवळ आणि केवळ माँसाहेबांनी राजांवर केलेल्या संस्कारांमुळे.

माँसाहेबांचे कार्य केवळ एवढेच नाही तर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य आणि नीतिमत्तेचे धडे माँसाहेबांकडून मिळाले होते, हे आपण विसरता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आपल्या स्वराज्याची जबाबदारी ही संभाजी राजेंनी अगदी चोख निभावली.

यास कारणीभूत होत्या त्या फक्त जिजाऊ माँसाहेब आणि त्यांची ती थोर शिकवण. आज याठिकाणी एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे, आदर्श  जिजाऊसारख्या माँसाहेबांची गरज आज आपल्या  प्रत्येकाच्या घरी आहे. आपण म्हणतो, “राजे पुन्हा जन्माला या”, परंतु त्यासाठी काळजावर दगड ठेऊन मुलाला शिवबा बनविणारी माँसाहेब जिजाऊ आधी घडवाव्या लागतील.

माँसाहेब मनाने जेवढ्या हळव्या होत्या, तितक्याच कणखरही होत्या. आजच्या युगातील मातांना कदाचित ते जमणार नाही. त्यामुळे, प्रत्येक घरात जर शिवबा जन्माला यायचा असेल तर प्रत्येक घरातील माता ही जिजाऊ असली पाहिजेत.

“जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसते राहिले शिवबा अन शंभू छावा.

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा!”

आपल्या मुलांवर सुसंस्कार कशा पद्धतीने केले पाहिजेत, त्यांना सक्षम आणि खंबीर कसे बनवले पाहिजेत या सर्व गोष्टींचे उत्तम उदाहरण आपल्या राजमाता जिजाऊ माँसाहेब आहेत. एक आदर्श मुलगा जर प्रत्येक आईला घडवायचा असेल, तर त्यासाठी प्रत्येक आईने राजमाता जिजाऊंचे आचरण केले पाहिजेत.

हल्लीच्या मातांकडे आपण पाहिलं, तर एक भीषण दृष्य आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या काळात १०० टक्केंपैकी ९९ टक्के माता अशा आहेत, ज्या आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देऊन स्वतःची जबाबदारी पुर्ण करतात. खरंतर, आपल्या मुलांचे शरीर सदृढ बनवण्यास आपल्याला गरज असते ती फिरण्याची आणि व्यायामाची.

परंतू, आजची आई स्वतःच्या मुलांना मोबाईल देऊन गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित करते आहे. यांमुळे, आजची मुलं ही खूप हट्टी आणि आळशी बनत आहेत. मात्र, ही गोष्ट त्यांच्या मातेंच्या लक्षात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण कुणीही यात कोणताही बदल घडवून आणू शकत नाही. अशा या महान जिजाऊ माँसाहेबांबद्दल आपण  कितीही बोलले तरी कमीच आहे.

समुद्राची शाई आणि आकाशाचा कागद करून सुद्धा त्यांच्याबद्दल लिहिले तरी तेदेखील कमी पडेल, अशी जिजाऊ माँसाहेबांची कीर्ती आहे. खरंतर, जिजाऊच्या लग्नाआधी त्यांना चार मोठे भाऊ होते. माहेरी त्यांनी त्यांच्या राजनीतीत आणि युद्धकलेत प्रावीण्य मिळवले होते आणि याचाच उपयोग त्यांना पुढे त्यांच्या लग्नानंतर शिवबा जन्मल्यावर, शिवरायांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि अमूल्य असे संस्कार  देण्यासाठी झाला.

मित्रांनो, प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून काम करणारे शहाजीराजे यांची पत्नी जिजाबाईंनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये शिवाजींना जन्माला घातले. खरंतर, शिवबाच्या जन्माआधी जिजाबाईंचे पाच पुत्र मृत्युमुखी पडले होते.

शेवटी एकटे शिवाजी महाराज जगले. खरंतर , या प्रसंगातून एखादी दुसरी माता जर गेली असती तर तिने आपल्या पुत्राला कधीच अशा जीवघेण्या कार्यासाठी सज्ज केले नसते.

उलट त्या मातेने आपल्या पुत्राचे खूप लाड केले असते, त्याचे सर्व हट्ट पुरवले असते. पण, माझ्या राजमाता जिजाऊने मात्र आपल्या प्राणप्रिय असलेल्या शिवबा पुत्राला राष्ट्रहितासाठी तयार केले. त्यांनी तुळजाभवानीला प्रार्थना केली होती की कुळाला, देशाला, धर्माला अभिमान वाटेल असा पुत्र जन्माला येऊ दे आणि जेंव्हा शिवाजी महाराज जन्माला आले तेंव्हा तुळजाभवानीला केलेल्या प्रार्थनेनुसार त्यांनी शिवबांना घडवायला सुरुवात देखील केली. 

जेंव्हा पुण्याची जहागीर मिळाली, तेंव्हा राजे अवघे १४ वर्षांचे होते. तरीदेखील, लहान शिवाजी राजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या. तेंव्हा पुण्याची अवस्था ही अतिशय भीषण होती. त्यामुळे, पुण्यात येताच राजमाता जिजाऊंनी आपला पदर कंबरेत खोवला आणि पुण्याचे काम हाती घेतले.

त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्यासोबत पुणे शहराचा पुनर्विकास केला. शिवाजी राजेंना प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले.

राष्ट्र आणि धर्म यांसारखे थोर संस्कार शिवबांवर करण्यासाठी जिजाऊ माता त्यांना महाभारत आणि रामायण यांतील कथा सांगत असतं. खरंतर, न्यायनिवाडा करण्याचे धडे हे छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मातेकडूनच प्राप्त झाले. अशा पद्धतीने, राजमाता जिजाबाई या  शिवाजी महाराजांच्या खरंतर आद्यगुरूच होत्या.

याशिवाय, शिवरायांचे आठ विवाह करण्यामागे देखील विखुरलेल्या मराठा समाजाला एक करणे हाच  त्यांचा निर्मळ उद्देश होता. शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्यात कैद होते, तेंव्हा देखील स्वराज्याची सूत्रे ही  जिजाऊ मातेंच्या हाती होती.

अशा या मातेने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा सुवर्णाचा क्षण पाहिल्यानंतर अवघ्या बारा दिवसांतच वर्ष १६७४ मध्ये आपला देह ठेवला. मित्रांनो, अशा जिजाऊंमुळे आपल्या महाराष्ट्राच्या मातीला शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.

जिजाऊ माँसाहेब खरोखरच एक आदर्श माता होत्या. आपल्या मुलांना धैर्य, परोपकार, आत्मविश्वास, शौर्य, न्याय, निर्भय, राष्ट्र प्रेम या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांच्यात चांगले संस्कार रुजविण्याचे सामर्थ्य हे प्रत्येक आईमध्ये असते. गरज असते ती म्हणजे फक्त त्या स्त्रीने आपली शक्ती ओळखण्याची आणि आपल्या उज्ज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न करण्याची.

कोणतीही माता ही केवळ मायाळू नसून, महाकाली देवीसारखी वेळ आल्यावर सगळ्यांचा संहार करणारी ही असू शकते आणि याचच सर्वांत मोठं व उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या राजमाता  जिजाबाईचं असू शकतात. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले.

स्वराज्य संकल्पनेची बी राजमातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे,  असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये त्यांनी निर्माण केला शिवाय, बालपणापासून त्यांना त्यासाठी तयार देखील केले.

सासऱ्यांनी चाकरी केली, पतीने चाकरी केली पण माझा मुलगा मात्र अजिबात कुणाचीही चाकरी करणार नाही असं शिवाजींच्या जन्माआधीच ज्यांनी ठरवलं आणि शिवबाच्या जन्मानंतर शिवाजींना घडवण्यास देखील सुरुवात केली अशा थोर राजमाता म्हणजे राजमाता जिजाऊ ज्यांची आपण आज जयंती साजरी करण्यासाठी एकत्रित आलो आहोत.

मित्रांनो, ‘शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरी’ असं म्हणतात, कारण, आपल्या घरात ‘जिजाऊ’च नाहीय त्यामुळे शिवबा तरी कसा जन्माला येणार! मित्रांनो, शिवाजी महाराज होणं जेवढं कठीण होतं त्याहून कठीण जिजाऊ माता होणं कठीण आहे. खरंतर, जिजाऊंनी ठरवलं म्हणून आपला शिवबा घडला हे आपण विसरून चालणार नाही.

राजमाता जिजाऊने स्वराज्यासाठी अनेक गोष्टींचा त्यागदेखील केला आहे. मित्रांनो, मला तर याठिकाणी राजमाता जिजाऊंच्या आई-वडिलांचे देखील आभार व्यक्त करावेसे वाटतात. कारण, त्यांच्यामुळे जिजाऊ मातांच अस्तित्व निर्माण झालं आणि आपण सर्वजण आपल्या स्वराज्यात रहायला लागलो.

आपले शिवाजी महाराज जेंव्हा सुभेदार म्हणून पुणे परगण्यात आले तेंव्हा जिजाऊ राजमाता शिवबांना तिथला कारभार चालवण्यासाठी एक ठराविक रक्कम देत. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर, पॉकेटमनी देत. पण ते पैसे परगण्याचा खर्च चालवण्यासाठीच दिले जायचे. तेवढ्याच रक्कमेत शिवाजी महाराज सगळं नियोजित करायचे.

म्हणजे, अगदी प्रजेला दुष्काळाच्या काळात द्याव्या लागणाऱ्या नुकसान भरपाईपासून ठरलेले खर्च सगळंच काही. बरं हे सर्व नियोजन शिवाजी महाराज कितव्या वर्षी करत होते असेल, तर वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी! तीन वर्षांपर्यंत हा अशाप्रकारे सर्व डोलारा संभाळत शिवबांनी कारभार चालवला मग पंधराव्या वर्षी जेंव्हा त्यांनी रायरेश्वरासमोर शपथ घेतली.

तेंव्हा कुठे त्यांची या ‘पॉकेटमनी’ प्रकारातून सुटका झाली. राजमाता जिजाऊंच्या आज्ञेनुसार शिवाजी महाराज सर्व गोष्टी करत असत. राजमाता जिजाऊंचा एकही शब्द शिवबांनी कधीही खाली पडू नाही दिला.

आता वरच्या प्रसंगामध्येच आपल्या लक्षात येईल की राजमाता जिजाऊ या शिवबांना इतकी कमी रक्कम द्यायच्या, तरीदेखील राजेंनी त्यांच्या या आज्ञेत कोणत्याही प्रकारची त्रुटी न काढता, त्यांच्या आज्ञेचा आदर केला आणि दिलेल्या रक्कमेत राज्यकारभार देखील केला.

गंमतीचा भाग वगळता वयाच्या बाराव्या वर्षापासून पैसा कसा वापरावा हे मुलाला शिकवणारी जिजाऊ कुठे आणि आज ‘पॉकेटमनी’ ही परदेशी कन्सेप्ट वाटणारे आई-बाबा कुठे.

आज अनेकांना ‘मॅनेजमेंट’ शिकण्यासाठी मॅनेजमेंट कोर्सेस करावे लागतात. पण मॅनेजमेन्ट कोर्स पुर्ण करुन नाही शिकता येतं ते असं आचरणात आणून शिकवावं लागतं हे जिजाऊंना ठाऊक होतं म्हणून आपला राजा मोठा झाला. आजच्या मातेनेदेखील आपल्या शिवरायांचा इतिहास आणि त्यामध्ये राजमातेंचा असलेला विशेष वाटा लक्षात घेतला पाहिजेत. तरच, आजच्या काळातही आपल्याला आदर्श पुत्र मिळतील हे खरे!

शिवाजी महाराजांवरील कोणतही पुस्तक आपण वाचलं, अगदी कादंबऱ्यांपासून ते ज्यावरुन वाद उद्भवला असं ‘शिवाजी कोण होता?’ असं कोणतही पुस्तकं वाचलं तरी कळेल, समजेल असं शिवाजी महाराजांच आयुष्य पुस्तक असेल तर त्यामध्ये आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजेत ती म्हणजे या सर्व पुस्तकांमध्ये राजमाता जिजाऊ ते पुस्तक लिहीणारी शाई होती.

शिवाजी महाराज वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षापासूनच आपल्या नावाआधी छत्रपती लावायचे. या ‘छत्रपती’वरील छत्र म्हणजे जिजाऊच छत्र अर्थात, जिजाऊचा आशीर्वाद होय. म्हणूनच, राजमाता जिजाऊ समजल्या की छत्रपती शिवाजी महाराज देखील आपल्याला सहज समजतात.

पण मित्रांनो, जिजाऊ माँसाहेब समजून घेणं हे कोणत्याही येड्यागबाळ्याचं काम नाही हे खरं! राजमाता जिजाऊ समजावून घेण्यासाठी आपल्याला स्वतःला त्यांच्या जागी उभ करावं लागेल, तरच आपल्याला राजमाता जिजाऊ कळतील.

जिच्‍या हाती पाळण्‍याची दोरी ती जगाला उध्‍दारी, अशा उद्धृत केलेल्या ओळी म्हणजे आपल्या  मातृत्वाच्या महन्मंगल अविष्काराच्या परमोच्च क्षणाचा सुंदर रेखीव नमुनाच! युगपुरुष शिवराय घडले, वाढले आणि ‘निश्चयाचा महामेरू । बहुता जनांसी आधारू । श्रीमंत योगी।’ असे ज्यांचे वर्णन केले जाते, ती सारी कुणाची पुण्याई होती, तर ती एका ध्येयवेड्या आईची, निराग्रही मातेची आणि वीरमाता, माँसाहेब  जिजाऊंची!

राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी पुण्यातील शिवनेरीच्या अंगाखांदयावर शिवरायांना लहानाचा मोठा करताना, सह्याद्रीच्या कुशीत निर्भयपणे वावरायला शिकविताना त्यांनी शिवरायांना महाभारत आणि रामायणातील ‘राम आणि कृष्णांच्या’ गोष्टींचे बोधामृत पाजले. याशिवाय, त्यांनी शिवरायांना स्वराज्यस्थापनेचे बाळकडू देखील पाजले. ‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे’ असा मूलमंत्र ज्यांनी शिवरायांच्या मनात उतरविला, ती मातृत्वशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ.

महाराष्ट्र जशी वीर पुत्रांची भूमी आहे, तशीच वीर मातांची देखील भूमी आहे. मित्रांनो, राजमाता जिजाऊ या काही साधारण स्त्री नव्हत्या. जिजाऊने आपल्या मावळ्यांच्या रक्तात स्वाभिमान पेरला होता. मावळलेल्या जनतेला स्वराज्याचे स्वप्न दाखवून, त्यांना खऱ्या अर्थाने जिवंत करण्याचे काम राजमाता जिजाऊ यांनीच केले होते.

त्यांनी, शिवबांना लहानपणापासुनच स्त्रियांचा आदर करायला शिकवलं होत. त्यावेळी, मुघलांकडून आपल्या महाराष्ट्रातील स्त्रियांवर खूप अन्याय-अत्याचार व्हायचा, त्या अन्यायाविरुध्द लढण्यासाठी आणि स्त्रियांचा रक्षणकर्ता म्हणून उभ राहण्यासाठी त्यांनी शिवबांना तयार केलं होत.

मित्रांनो, ज्यावेळी शिवाजी महाराज हे पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्यात अडकले होते. तेंव्हा राजमाता जिजाऊ या स्वतः पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेल्या शिवाजींना मुक्त करण्यासाठी युद्धावर निघाल्या होत्या; पण नेताजी पालकर यांनी त्यांना त्या गोष्टीपासून परावृत्त केले. या प्रसंगात त्यांची पुत्रप्रेमाची आर्तता दिसून येते तसेच, विलक्षण आवेश गोष्टी देखील दिसून येतात.

इ. स. १६६४ साली दोदिगिरीच्या अरण्यात शहाजी राजांचा अपघात झाला होता आणि ते निवर्तले होते, हा वज्राघात झेलून राजमाता जिजाऊ या स्वतः सती जायला निघाल्या होत्या, पण शिवाजी राजांनी त्यांना विनवणी करून या निश्चयापासून राजमाता जिजाऊंना परावृत्त केले. जिजाबाईंच्या अंगी अनेक चांगले गुण होते.

त्या खूप मोठ्या कर्तबगार होत्या. शहाजी राजेंनी सर्व राज्यकारभार हा राजमाता जिजाऊंच्या हाती स्वाधीन केला होता. राजमाता जिजाऊंवर एक काव्य असे लिहिले आहे जे आपल्या राजमातेबद्दल उल्लेखनीय वर्णन करते. ते म्हणजे, ‘युगपुरुष घडविला जिने खास राज्याचे उभारले तोरण अदमास शिवनेरीच्या भूवरती, सह्याद्रीच्या कुशीत, उदयास आले एक अनमोल रत्न!

उभारली हिंदवी स्वराज्याची गुढी फलदुप झाली जिजाऊंची स्वप्ने वेडी. तिच्या योगदानाची किती वर्णावी महती तिच्या प्रत्येक कृतीतूनच झाली स्वराज्याची स्वप्ननिर्मिती!’ आपल्या महाराष्ट्राला स्वराज्याचे सुवर्णदिन दाखवणाऱ्या, महान स्वराज्य संप्रेरिका माँसाहेब राजमाता जिजाऊंना मी शतशः नमन करते आणि माझे दोन शब्द इथच संपवते. धन्यवाद!

जय जिजाऊ! जय शिवराय!

  • तेजल तानाजी पाटील

बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या rajmata jijau speech in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “शिक्षक दिन भाषण मराठी “ speech on rajmata jijau in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या jijamata information in marathi speech या jijau mata speech in marathi article मध्ये upadate करू, मित्रांनो हि marathi teachers day speech माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण jijamata speech in marathi या लेखाचा वापर rajmata jijau jayanti speech in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “राजमाता जिजाऊ भाषण मराठी Rajmata Jijau Speech in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!