माझे आवडते शिक्षक निबंध My Favourite Teacher Essay in Marathi

My Favourite Teacher Essay in Marathi – Maze Avadte Shikshak Nibandh in Marathi शिक्षक निबंध मराठी माझे आदर्श शिक्षक निबंध अर्थातच खालील ओळींचा अर्थ असा होतो की, गुरूंना ब्रह्मासारखे (निर्माता) मानले जाते. कारण, त्याने तुमच्यात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू केली आणि तुम्हाला योग्य दिशेने नेले. जगातील नकारात्मक प्रभावापासून गुरु तुमचे रक्षण करतो आणि तुमच्या प्रगतीस मदत करतो, म्हणून गुरु विष्णू (रक्षक) मानला जातो. गुरूंना शिव (विध्वंसक) मानले जाते. कारण, त्याने आपल्या दुःखाचा नाश केला आणि तिथूनच कर्मबंध हटविण्याचा मार्ग सुद्धा मोकळा केला. वास्तविक पाहता, आत्मा म्हणून गुरू हा परमब्रह्मांचा अवतार आहे.

गुरूर्ब्रह्मा, गुरूर्विष्णुः, गुरूर्देवो महेश्वरः

गुरूर्साक्षात् परब्रह्म् तस्मै श्री गुरवे नमः॥

गुरुर ब्रह्मा: गुरु ब्रह्मा (निर्माता) सारखा आहे.

गुरूर विष्णु: गुरु विष्णू (संरक्षक) सारखा आहे.

गुरूर देवो महेश्वरा: गुरु हा भगवान महेश्वर (विध्वंसक) सारखा आहे.

गुरु: साक्षात्: खरा गुरू, डोळ्यांसमोर आहे.

परब्रह्म: सर्वोच्च ब्राह्मण.

गुरुवे नम: त्या एकालाच: मी त्या खर्‍या गुरुला.

my favourite teacher essay in marathi
my favourite teacher essay in marathi

माझे आवडते शिक्षक निबंध मराठी – My Favourite Teacher Essay in Marathi

माझा आवडता शिक्षक निबंध

कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देवून त्यापासून सुंदर मडकी घडवतात, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला सुरेख असा आकार देवून त्यांना यशस्वी बनवण्याचे महान कार्य शिक्षक करत असतात. आई ही प्रत्येकाचा पहिला गुरु असते. पण, त्यानंतर मात्र प्रत्येक पाल्याला घडवण्याचे काम शिक्षकच करतात.

माझ्या आई – वडिलांप्रमाणेच मला घडवण्याचे काम माझ्या गुरूंनी केले. त्यातील मला सर्वात जास्त भावलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे माझे आवडते शिक्षक होनगेकर सर. माझं बारावीच शिक्षण गावी पुर्ण झाल्यानंतर, मी पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरला जायचं ठरवलं होत. कोल्हापुरात वसलेलं, उच्च प्रतिष्ठेच, नामांकित असलेलं, जिथं ज्ञानाची गंगा वाहते अस तेजोमय आणि सर्वश्रेष्ठ महाविद्यालय म्हणजे’ विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर’.

माझी आणि होनगेकर सरांची गाठभेट इथचं पडली. खरंतर , होनगेकर सर म्हणजे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य महोदय होते. अत्यंत प्रेमळ, मनमिळावू, शिस्तप्रिय आणि मैत्रीपूर्ण असा त्यांचा स्वभाव होता. मी तेराविमध्ये असताना आमच्या वर्गावर त्यांचा इंग्रजी हा शिकवण्याचा विषय होता. अस्खलित स्वरूपाचं त्यांचं इंग्रजी सगळ्यांनाच आवडायचं.

वर्गात आल्यावर पहिल्यांदा ते सगळ्या विद्यार्थ्यांची विचारपूस करायचे, विद्यार्थ्यांशी त्यांचं मैत्रीचं नात तर होतच पण, त्याला अजून पाण्यासारख निर्मळ आणि भिंतीसारख भक्कम बनवण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करायचे.

ते आमच्या वर्गावर लेक्चर द्यायला आले की सगळ्यात जास्त आनंद मला व्हायचा. त्यांचं लेक्चर कधीच संपू नव्हे ,ते असच अखंड चालावं अशी मनात इच्छा व्हायची. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी पटापट देत असायची.त्यामुळे, त्यांनाही मी आवडती झाली होती. शिवाय, अनेक राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा वेगवेगळया ठिकाणी आयोजित केल्या जायच्या.

त्यावेळी, मी त्याच्यात भाग घेत असायचे. अशी एकही स्पर्धा मी सोडली नाही की ज्याच्यात माझा प्रथम क्रमांक आला नाही. त्यामुळे, माझ्याबरोबर माझ्या कॉलेजचही नाव नावारूपाला येऊ लागलं होत. कॉलेजचे प्राचार्य म्हणून होनगेकर सरांना माझा खूप अभिमान वाटे. असच एकेदिवशी पुण्याजवळील बारामती या ठिकाणी राज्यातील प्रत्येक महाविद्यालयातील कोणतेही दोन विद्यार्थी याप्रमाणे राज्यस्तरीय  ‘युथ आयकॉन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

माझ्या महाविद्यालयातून माझी आणि नंदिनी नावाच्या एका मुलीची निवड करण्यात आली होती, स्पर्धेला जायच्या आदल्या दिवशी होनगेकर सरांनी मला ऑफिसमध्ये बोलवलं, त्यावेळी त्यांनी मला पाजलेल ज्ञान – अमृत मी कधीही माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही . ऑफिसमध्ये प्रवेश करताना मी त्यांची परवानगी घेतली आणि ऑफिसमध्ये प्रवेश केला.

आत जाताच मला त्यांचा अभिमानानं आनंदमय झालेला चेहरा दिसला , त्यांचा चेहरा पाहून मला खूप छान वाटलं होत. आता ते माझ्याशी काय बोलणार याची मी आतुरतेने वाट पाहत होते. सरांनी मला मायेनं जवळ घेतलं आणि बोलायला सुरुवात केली. ते बोलले, “बाळ तेजल आपलं महाविद्यालय खूप प्रसिद्ध आणि उच्चशिक्षणाच माहेरघरच आहे, आता आपल्या महाविद्यालयाच नाव अजून नावारूपाला आणण्याची तुला संधी मिळाली आहे, त्या संधीच तू सोन कर.

आता हे स्पर्धेबद्दल, महाविद्यालयाबद्दल झालं. पण, आयुष्यात तुला खूप मोठं देखील व्हायचं आहे, त्यासाठी मी आता ज्या गोष्टी तुला सांगणार आहे त्या लक्ष देऊन ऐक;”अस बोलून त्यांनी मला ती अमूल्य तत्व सांगायला सुरुवात केली, त्यातील पहिले तत्व म्हणजे;

१) काम असो अभ्यास असो वा कोणतीही चांगली गोष्ट ती नेहमी मन लावून , आनंदान कर. जर, ती गोष्ट तू कर्तव्य किंवा जबाबदारी म्हणून केलीस तर ती गोष्ट यशस्वी होईल पण, त्यातून तुला आनंद, समाधान नाही भेटणार. त्यामुळे, ती गोष्ट तू मनापासून आणि स्वतःच्या आनंदासाठी कर.

२)दुसरे तत्व – कामात रहा , रिकामी डोकं हे सैतानाच घर असत . नको ते विचार, विनाकारण नैराश्य हे रिकामी बसलेल्या माणसांनाच येत. त्यामुळे, नेहमी कामात रहा. कामात बदल म्हणजे विश्रांती. जर तुला एकच काम करून कंटाळा आला आणि तुला जर विश्रांती घ्यावी वाटली तर तू कामात बदल कर.

३)तिसरे तत्व – आनंद आणि सुख यांच्यामागे कधीच धावू नकोस, कारण ते क्षणभंगूर आहेत. त्यामुळे, तू या दोन गोष्टींच्या मागे लागण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत समाधान शोधण्याचा प्रयत्न कर. जेणेकरून तू आयुष्यात कधीच दुःखी नाही होणार .

४)चौथे तत्व – स्वतःशी प्रामाणिक रहा आणि एखाद्या गोष्टीत जर यश मिळाले नाही तर, निराश न होता अपयश पचवायला शिक. स्वतःमधील वेगळेपणासाठी लढ आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक मर्यादांवर मात कर.

५)पाचवे तत्व – सगळ्यात महत्वाच म्हणजे आयुष्यात कोणताही निर्णय ठामपणे घ्यायला शिक आणि घेतलेला निर्णय बरोबरच आहे हे सगळयांना सिध्द करून दाखव.

अशी अनेक तत्वे त्यांनी मला सांगितली. त्यांचा एक एक शब्द जसा कानावर पडत होता, तसा माझ्यातील स्वतःबद्दलचा आत्मविश्वास वाढत होता. शेवटी, सगळ सांगितल्यानंतर त्यांनी मला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि मी वर्गात जायला निघाले. बाहेर निघतानाच मी एक आदर्श व्यक्तिमत्त्व मनात तयार करून निघत होते. शेवटी, स्पर्धेचा दिवस उजाडला होत.

होनगेकर सरांनी दिलेल् पाठबळ सोबत घेऊन मी स्पर्धेला उतरले. मी पूर्ण तयारीनिशी या स्पर्धेत उतरले होते. त्यामुळे, आत्मविश्वास तर होताच. मी माझ्या आयुष्यात तेरावीपर्यंत केलेल्या कर्तुत्वाच  व्यवस्थित सादरीकरण केलं. मी सादरीकरण करत असताना समोर बसलेले सर्वजण एकटक नजरेने आणि खूप कौतुकाने माझ्याकडे पाहत होते, ते पाहून मला अजुन उमेद यायची.

एकदाची स्पर्धा झाली आणि निकालाचा दिवस आला. माझ्यापेक्षा होनगेकर सरांना खूप विश्वास होता की मी नक्की ‘युथ आयकॉन’ होणार, शेवटी सरांच्या मनातील इच्छा पूर्ण झाली आणि मी महाराष्ट्राची ‘युथ आयकॉन’ बनले . तो दिवस माझ्या आयुष्यातील खूप अनमोल असा दिवस होता.

स्पर्धा संपवून कोल्हापुरात परत आल्यावर, होनगेकर सरांनी माझ खूप कौतुक केलं आणि माझा सत्कार कार्यक्रम देखील आयोजित केला. त्यानंतर, सरांची आणि माझी चांगली मैत्री झाली. सर आणि मी नेहमी दुपारचं जेवण एकत्र करू लागलो. माझा हॉस्टेल मधील डब्बा सर अगदी आवडीने खायचे. एवढ्या मोठ्या महाविद्यालयाचे प्राचार्य असूनही त्यांना कधीच त्याचा गर्व नव्हता.

त्यांच्या वागण्यात, बोलण्यात आणि राहण्यात खूप साधेपणा होता. पण, त्यांचे विचार मात्र खूप महान होते.

होनगेकर सर हे फक्त इंग्रजीचे शिक्षक किंवा महाविद्यालयाचे प्राचार्य नव्हते तर, ते एक उत्तम कलाकार देखील होते. इंग्रजीमधील कोणताही धडा किंवा कविता ते कृतीसह शिकवत होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकताना मजा वाटायची आणि शिकवलेल लक्षातही रहायचं. पुस्तकातील धडे ते इतके तन्मयतेने शिकवायचे की आजही ते धडे मला तोंडपाठ आहेत.

त्यांचे हस्ताक्षर इतके सुंदर आणि मोत्यासारखे होते की फळ्यावर ते काही लिहायला गेले की त्यांचं अक्षर छापल्यासारख दिसायचं. त्यांचे व्यक्तिमत्त्व अगदी अष्टपैलू होते. त्यांना इंग्रजीशिवाय गणित, इतिहास, मराठी हे विषयदेखील खूप आवडायचे. होनगेकर सर आम्हाला इंग्रजी हा विषय शिकवत असताना आम्हाला अन्य विषयांचं महत्त्व देखील समजावून सांगायचे.

प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, प्रशिक्षणे करून त्यांनी आम्हाला व्यावहारिक ज्ञान आत्मसात करून दिलं. आमच्या सरांसोबत ते दिवस कसे पटपट गेले हे काळाच्या ओघात कधी कळलच नाही.

आमच्या महाविद्यालयात बाहेरच्या गावचे आणि खेड्यातील अनेक मुल – मुली लांबून शिकायला यायचे. त्यांच्याकडे रहायला, खायला पुरेसे पैसे नसायचे. अशावेळी, होनगेकर सरांनी अनेक गोर – गरीब विद्यार्थ्यांना वेळोवेळी आर्थिक मदत केली.

शिवाय, त्यांच्या पालकांशी प्रत्यक्षात बोलून त्यांना बहुमोल मार्गदर्शन दिलं आणि बिकट आर्थिक परिस्थीतीमुळे मुलांची शिक्षणं बंद करू नका अस सांगितलं. होनगेकर सरदेखील गरीब कुटुंबातून वाढल्यामुळे त्यांना त्याची जाणीव होती. सामान्य नोकरीपासून ते इतक्या उच्च महाविद्यालयाचा प्राचार्य होण्याचा त्यांचा प्रवास खूप मोठा आणि कष्टी होता.

त्यांना अनेक संकटांना, समाजातील विकृत प्रवृत्तीच्या माणसांना सामोरे जावं लागलं होत. तरीही, हार न मानता त्यांनी त्यांच्या आयुष्यात यशाचा मार्ग गाठला होता.

कोणतीही अपेक्षा न करता ते मनापासून ज्ञान दानाचे पवित्र असे कार्य करत होते. आज होनगेकर सरांच काम आणि कर्तृत्व आठवल की थक्क व्हायला होत. अस वाटते की इतकं उदार अंतःकरणाने काम करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये कुठून आली असेल? त्यांनी मला फक्त पुस्तकी ज्ञान दिले नाही तर, माझ्या आयुष्याला आकार देण्याचे असे मोलाचे काम त्यांनी केले आहे.

आपण जर सध्या अलीकडच्या शाळा आणि महाविद्यालयांकडे वळून पाहिलं तर, लक्षात येईल की आजचे शिक्षक फक्त जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी हुशार आहेत त्यांच्याकडे जास्त लक्ष देत आहेत. त्यामुळे, इतर मुलामुलींकडे दुर्लक्ष होत आणि त्यांची प्रगती न होता त्यांची अधोगती व्हायला सुरुवात होते.

खरंतर, ही पद्धत आजकाल सगळीकडे पहायला मिळते. आजचे शिक्षक फक्त तयार मूर्तीला रंग देण्याचं काम करत आहेत. पण, खरा आदर्श शिक्षक तोच असतो जो दगडाला आकार देवून, त्याची मूर्ती घडवून त्याला आकार देतो आणि शेवटी रंग देऊन सगळ्यांसमोर प्रदर्शित करतो. कोणताही विद्यार्थी जन्मतःच हुशार किंवा बुद्धिनिष्ठ नसतो.

त्याला हुशार, बुद्धिनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ आणि आदर्श अस व्यक्तिमत्त्व बनवण्यासाठी शिक्षकांनीच प्रयत्न करायचे असतात. आई – वडील आपल्या मुलांना बोलायला, चालायला, धावायला शिकवतात पण, ध्येयापर्यंत नेण्यासाठीचा मार्ग एक गुरूच त्याच्या शिष्याला दाखवू शकतो.

कळलंच नाही सर मला,

काय लिहावं तुमच्यावरती!

कार्यही तुमचे महान तेवढेच,

नि तेवढीच तुमची कीर्ती! “

आमचे होनगेकर सर हे असेच आदर्श गुरु आहेत. वर्गातील जी मुल अभ्यासात कमजोर होती, त्यांच्याकडे विशेष लक्ष देवून, सरांनी त्यांना इतर हुशार मुलांप्रमाणे परिपूर्ण बनवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले होते. त्यांनी वर्गातील सर्व मुलांना त्यांच्या यशाचा मार्ग दाखविला आणि ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत सुद्धा केली. सरांनी कधीच विद्यार्थ्यांमध्ये हुशार- मठ्, गरीब – श्रीमंत, उच्च – नीच असा भेदभाव  केला नाही.

ते सगळ्यांशी समानतेने वागायचे. महाविद्यालयातील इतर शिक्षकांशी ही त्यांची वागणूक समतेची आणि समानतेची असायची. एखाद्या वेळी जर महाविद्यालयातील शिक्षक किंवा शिक्षिका गैरहजर असतील तर, त्यादिवशी होनगेकर सर त्या शिक्षकाच लेक्चर ज्या वर्गावर असेल ते चुकू न देता स्वतः त्या वर्गावर लेक्चर घ्यायचे जेणेकरून विद्यार्थ्यांचं त्या विषयाचं नुकसान होऊ नये.

यावरून, लक्षात येईल की त्यांची शिक्षणाबद्दलची आस किती होती! अभ्यासाव्यतिरिक्त त्यांनी आम्हां सर्व विद्यार्थ्यांना चांगले संस्कार ही दिले. मी एक गोष्ट खूप खात्रीने सांगू शकते, आमच्या महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी जरी आज मोठ्या हुद्द्यावर नसला तरी, प्रत्येक विद्यार्थी हा आज एक उत्तम नागरिक असेल हे खरे.

विद्यार्थ्यांमध्ये लपलेला राजहंस ते स्वतः शोधून काढायचे आणि त्या कौशल्याचा विकास करण्यासाठी ते सर्व बाजूंनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करायचे. शब्दांनी ज्ञान वाढवणारे, जगण्यातून जीवन घडवणारे, मुल्यातून तत्व शिकवणारे, विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणारे गुरु म्हणजे आमचे होनगेकर सर.

तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले,

आदर्श विद्यार्थी घडावेत म्हणून.

थोडा मी ही प्रयत्न केला,

त्यात माझ ही नावं यावं म्हणून.”

प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये शिक्षकाला अमूल्य असे स्थान असते. आम्हां विद्यार्थ्यांच्या चिमुकल्या पंखात ताकद देण्याचे आणि आकाशाला गवसणी घालण्यासाठी आवश्यक असणारे सामर्थ्य देण्याचे काम होनगेकर सरांनी केले होते. होनगेकर सरांना फक्त शिक्षणामध्येच रस नव्हता तर, बाहेरच्या जगाकडे पण त्यांचं खूप लक्ष होत.

समाजकार्यात तर ते अग्रेसर होते. अनेक वेळी ते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच, ज्या मुलांना शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जावून शिकणं परवडत नाही त्यांना ते फुकट पुस्तक वाटायचे. याशिवाय, ज्यावेळी कोल्हापुरात हवा प्रदूषण वाढत होत तेंव्हा त्यांनी स्वतः कॉलेजला येताना सायकल घेऊन यायला सुरुवात केली.

ते नेहमी सायकलवरचा प्रवास करून कॉलेजला येत होते. त्यांचा हा आदर्श घेऊन महाविद्यालयातील इतर शिक्षक तसेच, विद्यार्थी – विद्यार्थिनी ही कॉलेजला सायकलवरून किंवा पायी यायला लागले.

होनगेकर सर महाविद्यालयात स्नेहसंमेलन, क्रिडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, एकांकिका यांसारखे अनेक कार्यक्रम राबवत असत. शिवाय जे विद्यार्थी स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करायचे त्यांच्यासाठी वर्षातून महाविद्यालयामार्फत स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. त्यांना अभ्यास करण्यासाठी उमेद मिळावी, त्यांच्यात जिद्द निर्माण व्हावी यासाठी नामांकित अधिकारी देखील बोलवले जायचे.

अनेक प्रसिध्द उद्योगपती, खेळाडू, कलाकार, अभिनेता – अभिनेत्री यांसारख्या अनेक व्यक्तींना महाविद्यालयात दरवर्षी आमंत्रित केले जायचे. मी त्यांना कधीच निवांत बसताना पाहिलं नाही. ते काहींना काही करतच असत. त्यांनी स्वतःच आत्मचरित्र पुस्तक देखील लिहल आहे. या पुस्तकात त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रवासाची मांडणी अत्यंत साध्या, सरळ आणि रेखीव शब्दात केली आहे.

मी जेंव्हा त्यांचं आत्मचरित्र वाचत होते, तेंव्हा माझ्या डोळ्यातून अश्रु वाहत होते. इतकं समोरच्या वाचणाऱ्या व्यक्तीच्या मनावर प्रभाव टाकणार त्यांचं आत्मचरित्र आहे.

शिक्षक कविता मराठी

तुम्ही नाही केलीत एल. एल. बी.

कायद्याच्या जगातील कधी .

पण, जीवनाच्या कायद्यातील पद्धत ,

सर , तुमची मात्र होती खूपच साधी !

तुम्ही बोललेले शब्दानं शब्द ,

रामबाण प्रमाणे खरे ठरत होते .

जीवनाच्या या रणांगणात मात्र ,

लढण्याचे सामर्थ्य देत होते ! “

अशा माझ्या आवडत्या आणि महान शिक्षकाला कॉलेजच्या कार्यालयात काम करत असताना अचानक पॅरालिसीस अटॅक आला. तरीही, माझे होनगेकर सर न चुकता कॉलेजला यायचे, त्यांचा कॉलेजमध्ये ठरलेला दिनक्रम करायचे. त्यांनी आपल्या दिनक्रमात कधीच खंड पडू दिली नाही.

पण, काही दिवसांतच त्यांचे निधन झाले आणि तेंव्हाच खरा त्यांच्या कार्यात खंड पडला. खरंच, मी खूपच नशीबवान होते की अशा महान व्यक्तिमत्व असलेल्या शिक्षकाची मी आवडती विद्यार्थिनी होते. त्यांचं अचानक अस जाणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. आज जरी सर माझ्यासोबत नसले तरी त्यांनी दिलेली शिकवण, त्यांनी दिलेले धडे, त्यांचे विचार, अमृतापेक्षा महान असलेले त्यांचे ज्ञान आजही माझ्यासोबत आहे; जे नेहमी मला होनगेकर सर सोबत असल्याची जाणीव करून देतात.

सर, तुमच्याविषयी खूप लिहायचं होत,

माझ्या आयुष्याच्या डायरीत.

पण, आज अक्षरच सापडेनासे झाले सर,

तुम्हीच शिकवलेल्या बाराखडित! “

अशा महान गुरूला माझा कोटी कोटी प्रणाम!

              – तेजल तानाजी पाटील

                  बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या my favourite teacher essay in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “माझे आवडते शिक्षक निबंध” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या maze avadte shikshak nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि majhe avadte shikshak माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण my teacher essay in marathi या लेखाचा वापर short essay on my favourite teacher in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!