Maza Maharashtra Nibandh In Marathi जय जय महाराष्ट्र माझा निबंध मराठी महाराष्ट्र राज्य बद्दल माहिती १ मे १९६० रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तरीही, यापूर्वीच महाराष्ट्राला मोठा इतिहास लाभला होता. महाराष्ट्र हा शब्द दोन शब्दांपासून तयार झाला आहे. ‘महा’ आणि ‘राष्ट्र’ म्हणजे याचा अर्थ महान राष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महान योध्दा छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे वीर पुत्र संभाजी महाराज याच भूमीत जन्माला आले, ह्याच मातीत स्वराज्याचे ते बीज पेरले गेले! इथेच ते फळालाही आले ! इथेच अनेक अनामी वीर स्वराज्यासाठी लढले आणि कैक धारातीर्थी पडले.
दलितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा जोतिबा फुले आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, जहाल मताचे प्रवर्तक लोकमान्य टिळक, अंगातील कणाकणात आणि रोमारोमांत देशप्रेम ओसंडून वाहणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशी अनेक अनमोल रत्ने याच मातीत जन्माला आली.
मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा||
जय जय महाराष्ट्र माझा निबंध मराठी – Maza Maharashtra Nibandh In Marathi
माझा महाराष्ट्र निबंध लेखन मराठी
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसारखे ज्ञानी आणि उदार संत इथेच जन्मले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, विक्रमादित्य सुनील गावसकर, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, स्वरसम्राट म्हणून ओळखले जाणारे पंडित भीमसेन जोशी, अविरत समाजकार्य करणारे बाबा आमटे या सर्वांचा या महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. या सर्वांनी आपल्यातील गुणांनी, ज्ञानाने, शौर्याने, कर्तबगारीने आणि सकारात्मक विचारांनी महाराष्ट्राचे नाव अजरामर केले.
राकट देशा! कणखर देशा! दगडांच्या देशा!
नाजुक देशा! प्रेमळ देशा! फुलांच्याहि देशा||
माझा महाराष्ट्र डोंगर – दरींनी, शिवाजी महाराजांच्या गड – किल्ल्यांनी सजला आहे. गोदावरीसारख्या मोठ्या नद्या, अजिंठा – वेरुळ सारखी प्राचीन देखणी लेणी, अमाप पान – फुल, कोकणचे निसर्गसौंदर्य यांनी नटलेला आहे. आपण ‘माझा महाराष्ट्र’ अस अभिमानाने म्हणतो; ते केवळ येथे आपण जन्म घेतला म्हणून नव्हे, तर आमची तीन हजार वर्षांची परंपरा इतकी उज्ज्वल आहे, आपल्याकडे महाराष्ट्राचे इतके वैभव लाभले आहे की हा आपणा सर्वांना वाटणारा अभिमान वृथा नाही.
प्रत्येक देशाला एक परंपरा असते. प्रत्येक देशातल्या छोट्या – मोठ्या राज्यांना त्यांचा स्वतःचा असा इतिहास असतो. समाजाची जडणघडण ही ठरलेली असते आणि त्यामुळे त्या मातीशी त्या – त्या राज्यातील माणसे जिव्हाळ्याने एकरुप झालेली असतात. हे तत्त्व महाराष्ट्रासही लागू होते.
महाराष्ट्र हा महानांचा देश आहे. आपल्याला कुणी आपल्या अगदी जवळच्या माणसाबद्दल थोडक्यात सांगायला सांगितले की आपल्याला ते जड जाते, तसेच महाराष्ट्राची संस्कृती काय आहे? हे थोडक्यात सांग, असा जर प्रश्न कुणी विचारला तर उत्तर देणे जड जाते, कारण थोडक्यात आपल्या जवळच्या माणसांबद्दल, आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल सांगणे कठीण आहे. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही अफाट आहे.
‘लाभले आम्हास भाग्य बोलती मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ….’
खरंच, किती भाग्यवान आहोत आपण की मराठी भाषा आपल्याला बोलायला, ऐकायला भेटते. कवी माधव ज्युलियन यांनी ‘मराठी असे आमुची मायबोली’ या कवितेत मराठीच्या वैभवाची खरी ओळख आपल्याला करून दिली आहे. पण, या वैभवाची आपण राखण केली आहे का? मराठी आपली मायबोली हे फक्त सांगण्यापुरतचं राहील आहे का? तर, नाही.
आपण तिचा ठेवा जपला पाहिजे. इंग्रजीच्या ओघात मराठी कुठंतरी हरवत चालली आहे, तिला वेळीच आपण जपलं पाहिजे. मराठीत पहिली काव्यरचना ज्ञानेश्वरांनी केली होती, असे मानले जाते. ज्ञानेश्वरीच्या निर्मितीने मराठी भाषेची माधुरी प्रकांड पंडितांना तसेच, जनसामान्यांनाही चाखायला मिळाली.
या अमृततुल्य भाषेचा ओघ संत आणि पंत मंडळींनी तिच्यात गंगा सोडून विस्तीर्ण केला. मुघलांच्या आक्रमक काळातही आपल्या शिवाजी महाराजांनी मायबोलीचे तेज नष्ट होऊ दिले नाही, शिवाय शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचा कारभार मराठी भाषेतूनच केला, म्हणूनच ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे –
” माझ्या मराठीची बोलू कौतुके |
परी अमृतातेही पैजा जिंके |
ऐसी अक्षरे रसिके | मेळविन ||”
नेहमी असे म्हटले जाते, की महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे केवळ ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्र संस्कृतीची ही मर्यादा नाही, तर प्रेरणा आहे. ती विशाल, व्यापक आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत संतांचा फार मोठा वाटा आहे. एक काळ असा होता, ज्यावेळी संपूर्ण समाज चातुर्वर्ण्य स्पर्धेच्या गर्तेत रुतलेला होता.
तेंव्हा हे जातीभेद समाजाला विसरायला लाऊन भक्ती साधनेचा अपूर्व मार्ग संतांनी समाजाला प्राप्त करून दिला. समाजात आलेले जातीभेद विसरून संपूर्ण समाज विठ्ठलभक्तीत रममाण झाला होता. याचा प्रभाव एवढा झाला की, आज एवढ्या वर्षांनंतरही विज्ञान इतके पुढे गेलेले असताना पंढरपूरला जाणारी आषाढी एकादशीची वारी आपल्याला भव्य दिसते.
ही वारी पाहिली की महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. अशी भक्तिमय वारी पाहिली की मन थक्क होऊन जाते. मानवी श्रद्धेची कमाल वाटते. आबालवृद्ध एवढे लांब अंतर पायी चालतात पण, एका आनंदात ते समाधानात बुडून गेलेले असतात .
मराठीला राजभाषेचा दर्जा ज्यावेळी नव्हता त्या काळातसुद्धा अनेक कविवर्यांनी मराठीविषयीची प्रेमभावना व्यक्त केली, पण आज तिला महाराष्ट्राच्या राजभाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे, तरी आम्ही तिची लेकरे तिच्यापासून दुरावत चाललो आहोत.
महाराष्ट्रीयन संगीताचीही एक खास परंपरा आहे. मराठी माणसाने जपलेले दोन महत्वाचे कविता प्रकार म्हणजे शाहिरी काव्यातील लावणी आणि पोवाडा होय. लावणी आणि पोवाडा हे महाराष्ट्राचे वैशिष्टय कुठेही दिसणार नाही. आपल्या महाराष्ट्र संस्कृतीत श्रद्धेला फार महत्त्व आहे. वेगवेगळे त्या – त्या महिन्याचे सण, वार, उत्सव आपल्या मातीत एकत्रितपणे साजरे केले जातात.
आपल्या सणांच्या निरनिराळ्या पद्धती आणि रीतीरिवाज आनंदाने साजरे केले जातात. हे सण सुरू होण्यामागे ही इतिहास आहे, घटना आहेत. साधा नागपंचमीचा सण घेतला तरी अनेक कथा ह्या नागपुजनामागे आहेत. ह्या दिवशी कुणी काही चिरत नाही, तोडत नाही, भाजत नाही की कापत नाही.
तर, काही सण इथे असे आहेत की ज्यादिवशी निसर्गाने केलेल्या कामाचे ऋण आपले महाराष्ट्रीयन शेतकरी बांधव तसेच, सगळेजण मानतात. उदाहरणार्थ, खेड्यात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. ही शेती बैलावर आधारलेली, अवलंबलेली असते. म्हणून, बेंदूर या दिवशी शेतकरी बैलांची पूजा करतात.
त्यांना गोडधोड खायला देतात. त्यादिवशी बैलांना कामासाठी ही सुट्टी असते. ह्या सणातून आपले महाराष्ट्रीयन किती प्रेमळ आहेत, त्यांना मुक्या प्राण्यांबद्दल किती काळजी आहे हे कळते. अशा पवित्र भूमीत आपला जन्म झाला त्या भूमीचे आभार मानताना माधव ज्युलियन आपल्या कवितेत बोलतात ते ब्रीद करायला हवे –
” हिचे पुत्र आम्ही ,हिचे पांग फेडू
वसे आमुच्या हीच हृमंदिरी
जगनमान्यता हीस अपूर्व प्रतापे
हिला बैसवू वैभवाच्या शिरी .”
विद्येचे माहेरघर असलेले पुणे शहर, भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आपल्या महाराष्ट्रामध्येच स्थित आहेत. महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई हे १६४६ मीटर आहे. महाराष्ट्राचा लोकसंख्ये च्या बाबतीत दुसरा क्रमांक तर, क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो.
महाराष्ट्र हे भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे एक प्रमुख केंद्र आहे. ज्यामुळे, राज्याला दरवर्षी देश – विदेशातून करोडो रुपयांचा महसूल प्राप्त होतो. माझ्या महाराष्ट्राचे राज्यफुल ‘ताम्हण’ तर , राज्यफळ ‘आंबा’ हे आहे . महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरु’ तर , राज्यपक्षी ‘हरियाल’ आहे . गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण उत्सव खूप उत्साहाने साजरा केला जातो. हा उत्सव संपूर्ण दहा ते बारा दिवस मोठ्या आनंदाने साजरा होतो. असा हा सर्वांगसुंदर महाराष्ट्र आपल्याला लाभला आहे .
विविध कला, बिद्री कला, सावंतवाडीची लाकडी खेळणी, कोल्हापुरी चप्पल हे महाराष्ट्रातील सारे प्रसिद्ध तर आहेच, शिवाय महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग पूर्वापार चालत आलेला आहे! पैठणी, नारायणी पेठ ह्या साड्या म्हणजे इथली शान आहेत. महाराष्ट्रीयन जेवण तर स्वर्गाहून वरचढ आहे, इतके चविष्ट, वेगवेगळ्या प्रकारचे जेवण महाराष्ट्रात मिळते.
इथली पुरणपोळी, थालीपीठ, मिरचीचा खेचा आणि भाकरी, खोबरी वड्या तसेच, चकली, चिवडा, भडंग यांसारखे फराळ या सगळ्यांचा जरी इथे शौक असला तरी इथल्या प्रत्येक शहराला स्वतःची अशी एक पाक संस्कृती आहे. मुंबईचा वडापाव, नागपूरच्या सावजी समुदायाचे तिखट जेवण, कोल्हापूरचा तांबडा – पांढरा रस्सा, सातारी कंदी पेढे, पुणेरी मिसळ आणि पाणीपुरी, कोकणी मासे इत्यादी.
महाराष्ट्र हा इतर राज्यांसारखा सुपीक प्रदेश नसतानाही, इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीने या भूमीला धनधाण्यानी समृद्ध केले आहे. तांदुळ, ऊस, साखर, कापूस, आंबे या पीक उत्पादनात महाराष्ट्र नेहमी आघाडीवर राहिला आहे.
नवल म्हणजे आपल्या महाराष्ट्रात भारतातील पहिला चित्रपट देखील तयार केला आहे. मराठी साहित्य म्हणजे रत्न – हिरे यांनी खचून भरलेली खाण आहे. पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, आचार्य अत्रे, रणजीत देसाई, शिवाजी सावंत, कवी ग्रेस, बालकवी ही ह्या खाणी मधील काही रत्ने आहेत. विनोदी, विडंबनात्मक, जी जी श्रेणी तुम्ही शोधाल त्या त्या श्रेणीत तुम्हाला मराठी पुस्तक सापडतील!
” बहु असोत सुंदर ,संपन्न की महा
प्रिय आमुचा महाराष्ट्र देश हा .”
– तेजल तानाजी पाटील
बागिलगे , चंदगड .
आम्ही दिलेल्या maza maharashtra nibandh in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “जय जय महाराष्ट्र माझा निबंध मराठी” maza maharashtra nibandh विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on maharashtra in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि maharashtra chi mahiti जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण maza maharashtra essay in marathi या लेखाचा वापर essay on maharashtra day in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट